बुधवारी मिळणार पीएम किसानसह नमो शेतकरी सन्मान योजनेचा हफ्ता
मुंबई वृत्तसंस्था :
पीएम किसानसह नमो शेतकरी सन्मान या दोन्ही योजनांच्या हफ्त्यांचे वितरण बुधवारी (28 फेब्रुवारी) रोजी करण्यात येणार आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे या दिवशी महाराष्ट्र दौऱ्यावर असून यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात या हफ्त्यांचे वितरण केले जाणार आहे. राज्यातील जवळपास दोन कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे.
केंद्र सरकारतर्फे शेतकऱ्यांना पीएम किसान योजनेतून चार महिन्यांतून एकदा प्रत्येकी 2 हजार रुपयांची अर्थात वार्षिक 6 हजारांची मदत करण्यात येते. अनेक दिवसांपासून या योजेनच्या 16 वा हफ्ता वितरित होणार असल्याची चर्चा होती. अखेर पीएम किसान या योजनेचा 16 वा हप्ता राज्यातील 87 लाख 96 हजार शेतकऱ्यांना वितरित करण्यात येणार आहे. या हप्त्याच्या माध्यमातून 1 हजार 943 कोटी 46 लाख रुपयांची मदत शेतकऱ्यांना केली जाणार आहे. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते यवतमाळ जिल्ह्यातील भारी गावात बुधवारी हा हप्ता शेतकऱ्यांना दिला जाणार आहे. दुसरीकडे राज्याच्या नमो किसान योजनेच्या दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्याचे सुमारे 3 हजार 800 कोटींचेही वितरण देखील याचवेळी होणार आहे.
या योजनेचा डिसेंबर ते मार्च या कालावधीतील 16 वा हप्ता पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते वितरीत होणार आहे. तसेच राज्याच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा दुसऱ्या व तिसऱ्या हप्त्यांचा एकत्रित लाभही वितरीत होणार आहे. पीएम किसान योजनेच्या 16 व्या हप्त्याच्या 1 हजार 943 कोटी 46 लाख रुपयांचा लाभ राज्यातील भूमी अभिलेख नोंदी अद्ययावत केलेल्या बँक खाती आधार संलग्न केलेल्या व ई-केवायसी पूर्ण केलेल्या एकूण 87 लाख 96 हजार शेतकरी कुटुंबांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे.
राज्य सरकारने पीएम किसान योजनेच्या 14 व्या हप्त्याचा लाभ मिळालेल्या राज्यातील 85 लाख 60 हजार शेतकरी कुटुंबाना नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 1 हजार 712 कोटी रुपयांचा पहिला हप्ता यापूर्वीच दिला आहे. तर दुसरा व तिसरा हप्ता याच समारंभात वितरित केला जाणार आहे. राज्याच्या योजनेमधून सुमारे 3 हजार 800 कोटी रुपये थेट शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यात जमा होणार आहेत. दरम्यान पीएम किसान योजनेंतर्गत आतापर्यंत राज्यातील 1 कोटी 13 लाख 60 हजार शेतकरी कुटुंबांना एकूण 15 हप्त्यांमध्ये 27 हजार 638 कोटी रुपयांचा लाभ देण्यात आला आहे.
==========================
No comments:
Post a Comment