Thursday, February 22, 2024

आजरा तालुक्याच्या ग्रामीण भागात एसटीच्या फेऱ्या वाढवा; अन्यथा उपोषणाचा इशारा

आजरा तालुक्याच्या ग्रामीण भागात एसटीच्या फेऱ्या वाढवा; अन्यथा उपोषणाचा इशारा


 आजरा वृत्तसेवा :

 आजरा एसटी आगारामार्फत आजरा तालुक्याच्या ग्रामीण भागातील एसटीच्या फेऱ्या कमी झाल्या आहेत, याचा फटका तालुकावासियांना बसत आहे. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागात एसटीच्या फेऱ्या वाढवण्याबरोबरच सर्व मार्गावरील मुक्काम बस सुरू करण्यात याव्यात, अन्यथा 4 मार्चपासून आजरा बस स्थानकाच्या आवारात बेमुदत उपोषण करणार असल्याचा इशारा आजरा तालुका एसटी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष सचिन इंदुलकर यांनी दिला आहे. याबाबतचे निवेदन आजरा आगार व्यवस्थापक राजेंद्र घुगरे यांना देण्यात आले आहे.


 दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आजरा तालुकावासियांच्या सोईसाठी 1998 मध्ये आजरा एसटी आगाराची निर्मिती करण्यात आली. या माध्यमातून आजरा तालुक्याच्या डोंगरकपारीत व वाड्यावस्त्यावर एसटी सेवा मिळू लागली. यातून तालुकावासियांचा प्रवास सोईचा व सुखकर झाला. मात्र कोरोना काळ व त्यानंतर एसटी कर्मचाऱ्यांचा संप यामुळे आजरा एसटी आगाराचे कोलमडलेले वेळापत्रक अद्यापही सुरळीत झालेले नाही. याचा फटका तालुकावाशीय व विशेष करून विद्यार्थी यांना बसत आहे. तालुक्यातील बहुतांश नागरिक व विद्यार्थ्यांना प्रवासासाठी एसटीवरच अवलंबून राहावे लागते. त्यातच आजरा आगारामार्फत कोल्हापूर पुणे येथील बसच्या फेऱ्या वाढवण्यात आले आहेत. तसेच ग्रामीण भागात फेऱ्या वाढवण्यास सांगितल्यानंतर बसेसची संख्या कमी असल्याचे कारण सांगितले जाते. मुळातच तालुकावाशीयांच्या सोयीसाठी उभारण्यात आलेल्या आजरा आगाराच्या भोंगळ कारभाराचा फटका तालुक्यातील नागरिकांना बसत आहे. त्यामुळे तालुक्याच्या ग्रामीण भागात 1 मार्च पर्यंत पुरेशा प्रमाणात व नागरिकांची सोय होईल अशा स्वरूपात एसटीच्या फेऱ्या सुरू करण्यात याव्यात अन्यथा 4 मार्चपासून आजरा बस स्थानकाच्या आवारात बेमुदत उपोषण करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदनावर नाथ देसाई, राजू विभुते, आनंदा घंटे, विकास सुतार, सुयोग बेळगुंदकर, अजित आजगेकर, दयानंद भोपळे, विशाल जाधव, दत्तात्रेय सावंत, नितीन गावडे, जावेद आगलावे यांच्या सह्या आहेत.
=======================  

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...