मराठा समाजाला १० टक्के आरक्षण कायद्याच्या मसुद्याला मंत्रिमंडळाची मंजुरी; विशेष अधिवेशनात होणार चर्चा
मुंबई वृत्तसंस्था :
राज्य मंत्रिमंडळाची बैठक संपली, मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत १० टक्के आरक्षणाच्या प्रस्तावाला मंजुरी मिळाल्याची सूत्रांची माहिती. या मसुद्यावर विशेष अधिवेशनात चर्चा होणार आहे. त्यामुळे मराठा समाजाला दहा टक्के आरक्षण मिळू शकते.
मराठा आरक्षणाच्या ज्वलंत प्रश्नावर निर्णय घेण्यासाठी आज, मंगळवारी राज्य विधिमंडळाचे विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात मराठा समाजाला शिक्षण आणि सरकारी नोकरीत साधारणतः १० ते १२ टक्के स्वतंत्र आरक्षण देणारे विधेयक मंजूर केले जाणार असल्याने विधेयकातील तरतूदींकडे राज्यातील मराठा समाजाप्रमाणेच ओबीसी समाजाचेही लक्ष लागले आहे. दरम्यान, यापूर्वीच्या सरकारने मराठा समाजाला आरक्षण दिले होते. मात्र, सर्वोच्च न्यायालयात हे आरक्षण टिकले नाही. त्यामुळे आताचे आरक्षण कायद्याच्या कसोटीवर टिकणारे असावे, असा राज्य सरकारचा प्रयत्न राहणार आहे. सकाळी ११ वाजता विधिमंडळाच्या विशेष अधिवेशनाला सुरुवात होईल. या आधी सकाळी १० वाजता विधानभवनात राज्य मंत्रिमंडळाची बैठक झाली. मराठा समाजाला १० टक्के आरक्षण देण्याच्या कायद्याच्या प्रस्तावित मसुद्याला राज्य मंत्रिमंडळानं बैठकीत मंजुरी दिली आहे. आता हा मसुदा विशेष अधिवेशनात चर्चेसाठी मांडला जाईल.
======================
No comments:
Post a Comment