Thursday, August 14, 2025

भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक - प्रा. राजा माळगी; आजरा महाविद्यालयात कै. क्रांतिसिंह नाना पाटील व्याख्यानमाला संपन्न

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
भारतीय स्वातंत्र्य चळवळ आपल्याला खऱ्या अर्थाने समजून घ्यायची असेल तर भारतीय स्वातंत्र्य चळवळीच्या इतिहासाचे पुनर्लेखन आवश्यक आहे, असे मत ज्येष्ठ विचारवंत प्रा. राजा माळगी यांनी नुकतेच येथे व्यक्त केले. शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर आणि जनता एज्युकेशन सोसायटीच्या आजरा महाविद्यालयातील मराठी विभाग व विद्यार्थी विकास विभागाच्या वतीने कै. क्रांतिसिंह नाना पाटील व्याख्यानमालेअंतर्गत "साताऱ्याच्या प्रतिसरकारच्या चळवळीचे भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील योगदान" या विषयावर प्रा. माळगी बोलत होते.

प्रा. माळगी पुढे म्हणाले, भारतीय स्वातंत्र्यलढ्यात क्रांतिसिंह नाना पाटील यांचे अत्यंत मोलाचे योगदान असून देखील समाजाला आज त्यांचा पूर्णपणे विसर पडलेला आहे. त्यांच्या शतकोत्तर रौप्य महोत्सवी जयंतीनिमित्त कोठेही मोठा कार्यक्रम झालेला नाही. इंग्रजी राजसत्तेला आव्हान देताना सुमारे दीड हजार गावातील जनतेने इंग्रजी सत्तेला विरोध करून तब्बल शेहेचाळीस महिने क्रांतिसिंह नाना पाटील यांच्या प्रतिसरकारला पाठिंबा दिला होता. धुळ्याचा खजिना लुटल्यानंतर स्वातंत्र्यप्राप्तीनंतर त्या लुटलेल्या खजिन्यातील पै पै चा हिशोब देणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे व्यक्तिमत्त्व आजच्या पिढीला समजणे गरजेचे आहे. इंग्रजांविरुद्ध लढण्यासाठी स्वतःचे पाच हजाराचे सैन्य उभे करणारे, त्यांच्यासाठी शस्त्र प्रशिक्षण केंद्र उभे करणारे, स्वतःची स्वतंत्र न्यायव्यवस्था स्थापन करणारे, सत्यशोधक समाजाच्या विचारांनी महिलांना वागवणारे क्रांतिसिंह नाना पाटील यांचे भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील योगदान अनन्यसाधारण असे आहे. सध्याच्या स्वार्थी राजकारणाच्या प्रवाहात क्रांतिसिंह नाना पाटील यांचे कार्य प्रेरणादायी असे आहे, असे प्रा. माळगी शेवटी म्हणाले.

संचालक कृष्णा येसणे म्हणाले की, स्वातंत्र्य लढ्यात सहभागी अनेकांचे योगदान समजून घेणे आणि त्याची जाण ठेवणे, ही आपली जबाबदारी आहे. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्य डॉ. अशोक सादळे यांनी केले. प्रा. विनायक चव्हाण यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. सूत्रसंचालन प्रा. रमेश चव्हाण यांनी केले. विभाग प्रमुख डॉ. आनंद बल्लाळ यांनी आभार मानले. यावेळी ज्येष्ठ रंगकर्मी आय. के. पाटील, प्रा. दिलीप भालेराव, उपप्राचार्य डी. पी. संकपाळ, पर्यवेक्षक मनोज पाटील, सामाजिक कार्यकर्ते संपत देसाई त्याचबरोबर शिक्षक व विद्यार्थी उपस्थित होते.
================

No comments:

Post a Comment

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...