Wednesday, April 30, 2025

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्याकडून युपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवलेल्या बिरदेव डोणे यांचा सत्कार

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्ह्याच्या कागल तालुक्यातील यमगे येथील बिरदेव डोणे या तरुणाने नुकतेच कोल्हापूर जिल्ह्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. सर्वसामान्य कुटुंबातून पुढे येत, त्याने केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात ५५१ वी रँक मिळवून अधिकारी होण्याचे स्वप्न साकारले. या यशाबद्दल जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची प्रतिकृती त्यांना भेट स्वरूपात प्रदान करण्यात आली. कार्यक्रमावेळी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस., निवासी उपजिल्हाधिकारी संजय तेली यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते.

याप्रसंगी बिरदेव डोणे यांनी आपल्या भावना व्यक्त करत जिल्ह्यातील विद्यार्थ्यांना उद्देशून प्रेरणादायी संदेश दिला. ते म्हणाले, ‘चांगले मित्र बनवा, व्यसनांपासून दूर राहा आणि ध्येय डोळ्यासमोर ठेवून अभ्यास करा. माझ्या यशामागे केवळ कष्ट नव्हे तर जिद्दही होती.’ शेवटी, त्यांनी सर्व विद्यार्थ्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
============

Tuesday, April 29, 2025

अभूतपूर्व उत्साही वातावरणात आजऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीचे लोकार्पण; संपूर्ण आजरा झाला शिवमय

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
संपूर्ण आजरा शिवमय होत, अभूतपूर्व उत्साही वातावरणात आजरा येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. यात तरुणाईचा जल्लोष तसेच महिला व युवतींचा लक्षणीय सहभाग उल्लेखनीय होता. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार शिवाजी पाटील, गोकुळचे संचालक नाविद मुश्रीफ, पद्मजा आपटे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष महादेव टोपले यांच्या प्रमुख उपस्थितीत व तमाम तालुकावासियांच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्तीचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा पार पडला.

पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना सुरुवातीला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर संदीप पारळे यांनी प्रेरणा मंत्र म्हणत कार्यक्रमाला सुरुवात झाली. स्वागत व प्रास्ताविक विलास नाईक यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्या पुतळ्याचा इतिहास व नवीन मूर्ती उभारणीबाबतचे कार्य याची माहिती नाईक यांनी प्रास्ताविकात दिली. यावेळी पालकमंत्री आबिटकर म्हणाले, छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक होण्याचा आजचा आनंददायी दिवस आहे. छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा व्हावा यासाठी आजरा तालुक्यातील जनतेची तपश्चर्या होती. भव्य दिव्य पुतळ्याचे सर्वांचे स्वप्न होते, जे आज पूर्णत्वास गेले आहे. ही मूर्ती उभारण्यासाठी ज्या ज्या घटकांनी योगदान दिले ते सर्वजणच अभिनंदनच पात्र आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या लोकार्पणाचे भाग्य लाभले, हेच आयुष्याचे सार्थक वाटत आहे. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी आयुष्य समर्पित करण्याची भावना वाढीस लागली आहे. आजचा कार्यक्रम पाहिल्यानंतर सर्वांचेच काम सार्थकी लागल्याचे समाधान प्राप्त झाले आहे.

गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, वैचारिक बैठकीचा तालुका असलेल्या आजऱ्यामधील सर्वपक्षीयांनी एकत्रित छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारला याचा विशेष आनंद होत आहे. यावेळी आमदार शिवाजी पाटील, नाविद मुश्रीफ यांनी मनोगत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती लोकार्पण सोहळ्यानिमित्त सकाळच्या सत्रात अभिषेक, होम-हवन असे धार्मिक कार्यक्रम, दुपारी ढोल ताशा सादरीकरण तर त्यानंतर शिवशाही पोवाडा मंचच्या शिवशाहीर दिलीप सावंत व सहकाऱ्यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील विविध पोवाडे सादर केले.

यावेळी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद देसाई, गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंत शिंपी, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, माजी नगराध्यक्षा ज्योस्ना चराटी, सुनील शिंत्रे, नागेश चौगुले, विजय पाटील, सुधीर कुंभार, दिवाकर नलवडे बाळ केसरकर, विजय थोरवत, नाथ देसाई, मारुती मोरे, संजय सावंत यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. अशोक बाचुळकर यांनी सूत्रसंचालन केले. आनंदा कुंभार यांनी आभार मानले.

गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्याकडून मूर्तीला छत्र देण्याची घोषणा
लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी आजरा शहरात लोकार्पण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्तीला डोंगळे कुटुंबीयांच्या वतीने छत्र देण्याची घोषणा यावेळी केली. तसेच आमदार शिवाजी पाटील यांनीही दहा लाख रुपयांचा विकास निधी देण्याचे जाहीर केले.
(फोटो सौजन्य : गंगा फोटो, गारगोटी  9860920571)
===================

Monday, April 28, 2025

जिल्ह्यातील सहकार चळवळीला समृद्ध करण्यासाठी ‘सहकार दरबार’ मधून पाठबळ : पालकमंत्री, प्रकाश आबिटकर; 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त राज्यातील पहिल्या सहकार दरबारचे आयोजन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्ह्यातील सहकारी संस्था व सहकार तत्त्वावर चालणाऱ्या चळवळींना अधिक सक्षम, स्वयंपूर्ण व प्रभावी करण्यासाठी, त्यांना समृद्ध करण्यासाठी सहकार दरबार मधून पाठबळ देणार असल्याचे प्रतिपादन राज्याचे सार्वजनिक व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश आबिटकर यांनी केले. त्यांच्या संकल्पनेतून शासनाच्या 100 दिवसांच्या कृती कार्यक्रमांतर्गत तसेच आंतरराष्ट्रीय सहकार वर्षानिमित्त राज्यातील पहिल्या सहकार दरबारचे आयोजन करण्यात आले होते. कोल्हापूर येथील महाराणी ताराबाई सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या सहकार दरबारमध्ये सहकार अनुषंगिक एकुण 173 तक्रार अर्ज, यात ऑनलाईन 110 तर प्रत्यक्ष 63 तक्रार अर्ज दाखल झाले. या कार्यक्रमाच्या उद्घाटन समयी ते बोलत होते. यावेळी विभागीय सहनिबंधक डॉ.महेश कदम, अतिरीक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे, प्रभारी पोलीस अधीक्षक निकेश खाटमोडे-पाटील, प्रादेशिक सहसंचालक सहकारी संस्था कोल्हापूर गोपाळ मावळे, जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांच्यासह सर्व जिल्हा तसेच तालुका सहकार कार्यालयाचे अधिकारी, अर्जदार उपस्थित होते. यावेळी सहपालकमंत्री माधुरीताई मिसाळ यांनीही भेट दिली.

यावेळी मंत्री आबिटकर म्हणाले, लोकांच्या अडचणी, त्यांच्या सूचना, त्यांनी सांगितलेल्या उणिवा याबाबत विचार करून भविष्यात अधिक चांगल्या प्रकारे सेवा द्या. दाखल अर्जांचे वेळेत आणि प्राधान्याने निरसन करा. आपण पुन्हा आलेल्या तक्रारींवरील उत्तरांसह त्यांच्याकडे जावू. धोरणात्मक विषय असतील तर राज्य शासनाकडे मांडू.  भारतासारख्या कृषिप्रधान देशात सहकार चळवळीची भूमिका अत्यंत महत्त्वाची ठरते. शेतकरी, कारागीर, लघुउद्योजक, महिला बचतगट, सहकारी बँका, दूध संघ यांसारख्या विविध घटकांना संघटित करून आर्थिक, सामाजिक आणि औद्योगिक प्रगती घडवून आणण्याचे सामर्थ्य या चळवळीत आहे. या चळवळीला प्रभावी बनवण्यासाठी आणि तिचा विकास समृद्ध दिशेने व्हावा, यासाठी सहकार दरबार एक महत्त्वपूर्ण माध्यम ठरेल. येत्या काळात राज्यस्तरावरही अशाच पद्धतीचा उपक्रम हाती घेतला जाईल असेही ते यावेळी म्हणाले.

लोकांना येणाऱ्या अडचणी वेळेत सुटल्यानंतर सहकारी संस्था अधिक सशक्त, पारदर्शक आणि कार्यक्षम बनतील, सभासदांचा सहभाग वाढेल व  विश्वास निर्माण होईल असे श्री.आबिटकर म्हणाले. नवीन सहकारी संस्था स्थापन होण्यास चालना मिळेल. ग्रामीण व शेती आधारित अर्थव्यवस्थेला सामूहिक विकासाची दिशा मिळेल. सहकार चळवळ ही केवळ आर्थिक प्रगतीचे साधन नसून ती सामूहिक नेतृत्व, लोकशाही मूल्ये आणि समाजघटकांच्या एकात्मतेचे प्रतीक आहे. अशा चळवळीला सहकार दरबारासारख्या उपक्रमांमधून मिळणारे पाठबळ हे तिचे मुळ बळ आहे. प्रास्ताविक विभागीय सहनिबंधक डॉ.महेश कदम यांनी केले. त्यांनी सहकार दरबार हा राज्यातील पहिलाच नाविण्यपूर्ण उपक्रम असल्याचे सांगून यामध्ये गुगल लिंक द्वारे अर्ज स्विकारणे, क्यूआर कोडचा वापर करणे तसेच व्यापक स्वरूपात प्रसिद्धी केल्याने सर्वसामान्यांना याठिकाणी मदत मिळण्यास सोपे होईल असे सांगितले. या उपक्रमावेळी कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार कार्यालय अधीक्षक मिलींद ओतारी यांनी केले.

सावकारीतून होणाऱ्या फसवणुकीवर पोलीस विभागाने विशेष लक्ष द्यावे
आजही ग्रामीण तसेच काही शहरी भागात खासगी सावकारांचा विळखा आर्थिक दृष्ट्या दुर्बल वर्गावर घट्ट बसलेला आहे. गरजूंना तातडीची मदत हवी असते, पण बँका किंवा अधिकृत संस्थांकडून त्वरित कर्ज न मिळाल्यास ते खासगी सावकारांच्या जाळ्यात अडकतात. ही आर्थिक गुलामी तोडण्यासाठी पोलीस विभागाने सक्रिय भूमिका घेतली पाहिजे. अशा प्रकारची सावधगिरी घेतल्यास सामान्य माणसांचा न्यायावरचा विश्वास वाढेल आणि आर्थिक शोषणाला आळा बसेल. सहकार आणि पोलीस विभागाने अनाधिकृत सावकारीवर नियंत्रण ठेवून गोरगरीबांना न्याय द्यावा. हा घटक सहकाराशी संबंधित असल्याने सावकारीबाबत आलेल्या तक्रारींचा निपटारा तातडीने केला पाहिजे अशा त्यांनी पोलीस विभागाला सूचना केल्या.

सहकारी संस्थांना नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण, आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष 2025 च्या बॅजचे अनावरण
सहकार दरबार उपक्रमावेळी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून देण्यात येणाऱ्या सहकारी संस्था नोंदणी प्रमाणपत्राचे वितरण पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच यावेळी 2025 वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून आयोजित केले जात आहे. यानिमित्ताने जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून तयार करण्यात आलेल्या बॅजचे अनावरणही त्यांच्या हस्ते झाले.
==============

Saturday, April 26, 2025

महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून रुग्णांना दर्जेदार सुविधा द्या : पालकमंत्री प्रकाश आबिटकर; सोळंकुर येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा शुभारंभ

राधानगरी, विकास न्यूज नेटवर्क :
महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून रुग्णांना दर्जेदार सुविधा द्या, असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. ग्रामीण रुग्णालय, सोळांकूर (ता. राधानगरी) येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य  योजनेच्या शुभांरभ  सोहळा प्रसंगी ते बोलत होते. यावेळी आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ .सुप्रिया देशमुख, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.अनिरुद्ध पिंपळे, ग्रामीण रुग्णालय सोळांकूरच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्योती कोले, औषध निर्माण अधिकारी विद्यानंद कोरे, सोळांकूरचे सरपंच राजाराम कांबळे आधी मान्यवर उपस्थित होते.

पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, आरोग्य विभागामार्फत रुग्णांना चांगल्या व दर्जेदार सुविद्या द्या. आरोग्य सेवा देताना आरोग्य विभागाने खासगी दवाखान्यात देत असलेल्या सेवांपेक्षा अधिक चांगल्या प्रकारची सेवा द्यावी, रुग्णालयामार्फत रुग्णांना सर्व प्रकारची औषधे मोफत देण्यात यावी, याबाबत कुठलीही तडजोड होता कामा नये. रुग्णालयात आलेला रुग्ण खासगी रुग्णालयात न जाता आपल्या रुग्णालयात यावा यासाठी आरोग्य विभागाने विविध योजनांची माहिती नागरिकांमार्फत पोहोचवावी. महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना सोळांकूर येथील ग्रामीण रुग्णालयात सुरु झाली असून या योजनेचा लाभ सोळांकूर पंचक्रोशीतील नागरिकांना होणार असून चांगल्या प्रकारच्या आरोग्य सेवेबद्दल त्यांनी सर्व टीमचे अभिनंदनही केले.

प्रास्ताविकात सोळंकुर ग्रामीण रुग्णालयाच्या वैद्यकीय अधीक्षक डॉ. ज्योती कोले यांनी सोळंकुर ग्रामीण रुग्णालयात देत असलेल्या आरोग्य सेवांबाबत तसेच या रुग्णालयात गेल्या 4 महिन्यात 150 विविध आजारांवर शस्त्रक्रिया करण्यात आल्या त्याबद्दल सादरीकरणाव्दारे माहिती दिली. या कार्यक्रमाचे आभार जिल्हा शल्य चिकित्सक डॉ .सुप्रिया देशमुख यांनी मानले. या कार्यक्रमासाठी  सोळंकुर ग्रामीण रुग्णालयातील वैद्यकीय अधिकारी कर्मचारी, आशा वर्कर, पंचक्रोशीतील नागरिक उपस्थित होते.

मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षच्या धर्तीवर आरोग्य विभागामार्फत उभारणार कॉर्पस फंड
पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, महात्मा फुले जन आरोग्य योजनेच्या माध्यमातून गरजू रुग्णांना 5 लाखापर्यंतचा मोफत उपचार घेता येतो. परंतु 5 लाखांवरील उपचारासाठी निधीची कमतरता भासते. त्यासाठी राज्य शासनमार्फत मुख्यमंत्री सहायता निधी कक्षच्या धर्तीवर आरोग्य विभागामार्फत कॉर्पस फंड उभा केला जाणार आहे. या कॉर्पस फंड मधून 5 लाखांवरील आजारांसाठी मदत होणार असून यांचा उपयोग राज्यातील अनेक गरजू रुग्णांना होईल.

=====================

Friday, April 25, 2025

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे नूतन अध्यक्ष मुकुंद देसाई यांनी घेतली देशाचे नेते खासदार शरद पवार यांची भेट

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याचे नूतन अध्यक्ष मुकुंद उर्फ उदयसिंह बळीराम देसाई यांनी कारखान्याच्या संचालक मंडळासमवेत देशाचे नेते खासदार शरदचंद्रजी पवार यांची वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट नांगरतास आंबोली येथील ऊस संशोधन केंद्रावर सदिच्छा भेट घेतली.
     
या भेटीवेळी आजरा साखर कारखान्यासमोरील असलेल्या अडचणी बाबत चर्चा झाली. यावेळी साखर कारखान्याचे कार्यस्थळ असलेल्या आजरा तालुक्यातील गवसे व दर्डेवाडी ही गांवे इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये येत असलेने कारखान्यास उपपदार्थ निर्मिती प्रकल्प उभारण्यात अडचणी येत आहेत, ही बाब संचालक मंडळाने खासदार पवार यांच्या निदर्शनास आणून दिली. यावर मार्ग काढण्याचे आश्वासन खासदार पवार यांनी दिले.
 
यावेळी व्हाईस चेअरमन सुभाष देसाई, जेष्ठ संचालक विष्णू केसरकर, उदयसिंह पोवार, रणजीत देसाई, अशोक तर्डेकर, रशिद पठाण, दिगंबर देसाई, सामाजिक कार्यकर्ते राजाराम होलम, कार्यकारी संचालक संभाजी सावंत, सेक्रेटरी व्यंकटेश ज्योती व डेप्युटी चिफ अकौंटंट रमेश वांगणेकर उपस्थित होते.
====================

पहलगाम हल्ल्याचा आजरा मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
जम्मू काश्मीरच्या पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा आजरा मुस्लिम समाजाच्या वतीने निषेध करण्यात आला. जुम्मा नमाज नंतर एकत्र येत निषेध केला. अनेकांनी हातावर काळ्या पट्ट्या लावून निषेध केला.
    
पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात अनेक पर्यटकांना जीव गमवावा लागला. हा देशात अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न आहे. कश्मीर मध्ये शांतता निर्माण झाली असताना हा भ्याड हल्ला शांतता नष्ट करण्याचा प्रयत्न आहे. हल्ला करणाऱ्या दहशतवाद्यांना शोधून त्यांना गोळ्या घातल्या पाहिजेत. अशा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला.
  
यावेळी आलम नाईकवाडे, मौलाना अब्दुल रहेमान कांडगांवकर, डॉ. ए. एस. दरवाजकर, अबू पठाण,  फैयाज पठाण, रजाक सोनेखान, फारुक नसरदी,  हुसेन सोनेखान, जमील निशानदार, मौलाना जकरीया काकतीकर, इजाज काकतीकर, रियाज लमतुरे यांच्यासह अनेक मुस्लिम बांधव उपस्थित होते. आजरा शहरातील प्रत्येक मशिदी समोर नमाज नंतर एकत्र येत पहलगाम हल्ल्याचा निषेध केला.
==================

पहलगाम येथील घटनेचा आजरा तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निषेध

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
धर्मांध दहशतवाद्यांनी जम्मू-काश्मीरमधील पहलगाम येथे भारताच्या निरपराध पर्यटकावर भ्याड हल्ला केला. या घटनेचा आजरा तालुका शिवसेना ठाकरे गटाच्या वतीने निषेध करण्यात आला. यावेळी छत्रपती संभाजी चौकात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली.

शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या कार्यालयापासून शिवसैनिक घोषणाबाजी करत छत्रपती संभाजी चौकात आले. यावेळी पहलगाम येथे झालेल्या भ्याड हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध करण्यात आला. तसेच अशा घटना पुन्हा घडू नयेत याकरता केंद्र शासनाने तातडीने उपाययोजना करावी, आतंकवादी पोसणाऱ्या पाकिस्तानला कायमचा धडा शिकवावा अशी मागणी करण्यात आली. यावेळी मराठा महासंघाचे जिल्हाध्यक्ष मारुती मोरे, शिवसेना तालुकाप्रमुख युवराज पोवार, संजय येसादे, गिरणी कामगार संघटनेचे शांताराम पाटील यांनी आपल्या मनोगतातून पहलगाम येथील घटनेचा निषेध केला. यावेळी शिवसेना शहर प्रमुख ओंकार माद्याळकर, शिवाजी आढाव, दिनेश कांबळे, रवी तळेवाडीकर, राजू बंडगर, महेश पाटील, संभाजी इंजल यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.
=====================

Thursday, April 24, 2025

वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्यामार्फत या तारखेपासून होणार सभासद व टनेजची साखर वाटपास सुरुवात

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
गवसे (ता. आजरा) येथील वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्यांने सन 2024-25 हंगामात गळीतास आलेल्या ऊसाला ऊस पुरवठादार शेतकऱ्यांना त्यांनी पुरविलेल्या ऊसानुसार प्रति टन अर्धा किलो प्रमाणे व कारखान्याकडे शेअर्स भागभांडवल रक्कम 10 हजार रुपये ते15 हजार रुपयेच्या आतील सभासदांना 25 किलो व शेअर्स 15 हजार रुपयांचा पुर्ण भरणा केलेल्या सभासदांना 50 किलो साखर प्रति किलो 25 रुपये दराप्रमाणे वाटप करण्यात येणार आहे. सदर साखर आजरा तालुका खरेदी विकी संघाचे सर्व शाखेतून सोमवार दि. 28 एप्रिल 2025 ते 31 मे 2025 अखेर वाटप केली जाणार आहे.

सभासदांना त्यांची साखर वितरण कार्ड घरपोच दिली जाणार असून, सभासदांनी आपल्या आधार कार्डची झेरॉक्स सही करून कार्ड वाटप करणेंस येणाऱ्या कर्मचाऱ्यांकडे देवून आपले कार्ड घेणेचे आहे. तसेच ऊस पुरवठादारांनी आपल्या संबंधित संघ शाखेशी संपर्क साधून आपले आधार कार्ड/बैंक पासबुक झेरॉक्स सही करून संघ शाखेत जमा करून साखर उचल करणेची आहे, अशी माहिती कारखाना व्यवस्थापनांने दिली.

कारखान्यांने या हंगामात ठरविलेले गळीताचे उद्दिष्ट नैसर्गिक अडचणीमुळे पुर्ण करता आले नांही. या हंगामात अति पावसामुळे सर्वच ठिकाणाचे 25 टक्के ऊस उत्पादन घटले. त्यामुळे आपल्या कारखान्याचे देखील गळीत कमी झाले असलेंने कारखान्यापुढे आर्थिक अडचणी आहेत. त्याच बरोबर शासनाचे धोरणाप्रमाणे व कारखान्याच्या उपविधी प्रमाणे शेअर्सची रक्कम 15 रुपये पुर्ण असले शिवाय कोणतेही लाभ सभासदांना देणे अडचणीचे असतांना देखील वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये आपण सर्वांनी मागणी केलेनुसार सभासदांना साखर देणेचे वरील प्रमाणे धोरण ठरविले आहे. त्यानुसार आजरा तालुका खरेदी विकी संघाचे शाखेतून साखर वाटप सुरू होणार आहे. कारखान्याच्या आर्थिक परिस्थितीचा विचार करून ज्या सभासदांची शेअर्स रक्कम अपुरी आहे, अशा सभासदांनी आपली शेअर्स रक्कम 10 हजार रुपये अथवा 15 हजार रुपये कारखाना कार्यालयात येवून पुर्ण केलेस वरील कालावधीत त्यांनाही साखर देणेचे संचालक मंडळाचे धोरण असून, त्याचा लाभ सभासदांनी घ्यावा. त्याचबरोबर सभासद नसलेल्या कार्यक्षेत्राबाहेरील ऊस पुरवठादार उत्पादकांना देखील प्रतिटन अर्धा किलो प्रमाणे साखर उचल देत आहोत. येत्या गळीत हंगामात आपण उत्पादीत केलेला संपुर्ण ऊस कारखान्यास गाळपासाठी पाठवावा असे अवाहन कारखान्याचे चेअरमन मुकुंद उर्फ उदयसिंह बळीराम देसाई यांनी केले आहे. यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन सुभाष देसाई, सर्व संचालक मंडळ सदस्य, कार्यकारी संचालक व अधिकारी उपस्थित होते.
==================

Wednesday, April 23, 2025

आजरा नगरपंचायतच्या वतीने प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 बाबत आवाहन

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा नगरपंचायतीच्या वतीने आजरा नगरपंचायत हद्दीतिल सर्व नागरिकांना आवाहन करण्यात आले आहे कि, केंद्र शासन पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) 2.0 आजरा शहरासाठी लागू झाली आहे. या योजनेंतर्गत सर्व प्रवर्गातील, आर्थिकदृष्ट्‌या दुर्बल घटकातील बेघर कुटुंबांना त्यांच्या स्वमालकीच्या जागेवर नवीन घरकुल बांधणेस प्रति लाभार्थी रक्कम 2.5 लक्ष रुपये अनुदान प्राप्त होणार आहे. तरी नवीन घरकुल बांधणीकरिता इच्छुक लाभार्थ्यांनी आजरा नगरपंचायतशी संपर्क साधावा, असे आवाहन मुख्याधिकारी सुरज सुर्वे यांनी केले आहे.

या योजनेची पात्रता पुढीलप्रमाणे आहे, अर्जदार आर्थिकदृष्ट्‌या दुर्बल घटकातील (ज्यांचे कौटुंबिक वार्षिक उत्पन्न 3 लक्ष किंवा त्यापेक्षा कमी) असावा. अर्जदाराची स्वमालकीची जागा असावी. अर्जदाराचे स्वतःचे किंवा कुटुंबातील कोणत्याही सदस्याचे नावे भारतात कुठेही पक्के घर नसावे. अर्जदाराने किंवा त्याच्या कुटुंबातील कोणत्याही सदस्याने गेल्या 20 वर्षात शासनाच्या कोणत्याही घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. नवीन नियोजित घराचे बांधकाम 30 चौ. मी. ते 45 चौ. मी. चटई क्षेत्रफळापर्यंत असावे.

ऑनलाईन नोंदणी करिता इच्छुक लाभार्थ्यांनी https://pmaymis.gov.in/pmaymis2 2024/PmayDefault.aspx या वेबलिंक वर नोंदणी करून विहित मुदतीत आपला प्रस्ताव ऑफलाईन पद्धतीने आवश्यक कागदपत्रांसह आजरा नगरपंचायतच्या बांधकाम विभागाकडे सादर करण्याचे आवाहनही मुख्याधिकारी सुर्वे यांनी केले आहे.
====================

पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार 28 रोजी कोल्हापूर येथे "सहकार दरबार"

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : 
कोल्हापूर जिल्ह्यात १०० दिवसांच्या विशेष मोहिमेतंर्गत सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर  यांच्या अध्यक्षतेखाली सोमवार दिनांक २८ एप्रिल २०२५ रोजी सकाळी ११.०० वाजता महाराणी ताराराणी सभागृह, कोल्हापूर येथे सहकार दरबाराचे आयोजन करण्यात आले आहे. यासाठी जिल्ह्यातील सहकारी संस्थांबाबत ज्यांच्या अडचणी व प्रलंबित कामे असतील त्यांनी https://tinyurl.com/Sahakar-darbar या संकेतस्थळावर दि.२६ एप्रिल २०२५ रोजी सायं. ५.०० पर्यंत आपले अर्ज दाखल करावेत. ज्यांच्याकडे ऑनलाईन सुविधा उपलब्ध नाही, त्यांनी सहकार विभागाच्या संबंधित तालुका अथवा जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, सहकार भवन, कोल्हापूर कार्यालयात दि.२६ एप्रिल २०२५ पर्यंत कार्यालयीन वेळेत अर्ज दाखल करावेत, असे आवाहन सहकारी संस्थेचे जिल्हा उपनिबंधक निलकंठ करे यांनी केले आहे.

जिल्ह्यामध्ये विविध प्रकारच्या १३ हजार पेक्षा जास्त सहकारी संस्था असून,  जिल्ह्यातील सहकार चळवळीची व्याप्ती पाहता सहकार पंढरी म्हणून कोल्हापूर जिल्हा ओळखला जातो. जिल्ह्यात नागरी सहकारी बँका, पतसंस्था, विविध कार्यकारी सहकारी संस्था याबरोबरच औद्योगिक संस्था व साखर कारखाने, सूतगिरण्या, खरेदी विक्री संघ, दुग्धव्यवसाय व पशुसंवर्धन संस्थांचे जाळे पसरलेले आहे. तसेच सहकारी गृहनिर्माण संस्थांची संख्या वाढत आहे. त्या संस्थांच्या माध्यमातून सभासदांना विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करुन देवून सभासदांचे जीवनमान उंचावण्याचे कार्य सहकार चळवळीतून होत आहे. सहकारी चळवळीमध्ये वाढत्या सहकारी संस्थांबरोबरच सभासदांच्या तक्रारीची संख्या व न्यायालयीन प्रकरणांची संख्या वाढत आहे. सभासदांच्या तक्रारींचे निरसन वेळेत होणे तसेच तक्रारदार व संस्थांच्या समस्यांचा जलद गतीने निपटारा होणे आवश्यक आहे. सहकार दरबारमध्ये प्राप्त होणा-या अर्जाबाबत तातडीने निपटारा करण्यावर भर दिला जाणार आहे, असे जिल्हा उपनिबंधक कार्यालयामार्फत कळविण्यात आले आहे.
===================

Tuesday, April 22, 2025

आजरा साखर कारखान्याच्या चेअरमनपदी मुकुंद देसाई

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याच्या चेअरमनपदी मुकुंद बळीराम देसाई यांची बिनविरोध निवड झाली. निवड सभेच्या अध्यक्षस्थानी साखर सह संचालक गोपाळ मावळे होते.

चेअरमन पदासाठी मुकुंद देसाई यांचा एकमेव अर्ज दाखल झाला. चेअरमनपदासाठी देसाई यांचे नांव वसंतराव धुरे यांनी सुचविले तर विष्णूपंत केसरकर यांनी अनुमोदन दिले. निवडी नंतर बोलताना नूतन चेअरमन देसाई म्हणाले, राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना. हसन मुश्रीफ, माजी आमदार राजेश पाटील व माजी आमदार के. पी. पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली हा कारखाना सुरू आहे. कारखानदारी सध्या अडचणीत आहे. अडचणीवर मात करत मार्गक्रमण केले पाहिजे. कारखान्याला ऊर्जितावस्था आणण्यासाठी काही कठोर निर्णय घ्यावे लागतील. यासाठी सर्व संचालकांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. नेत्यांनी सोपवलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडण्याची ग्वाहीही त्यांनी दिली. आभार व्हाईस चेअरमन सुभाष देसाई यांनी मानले. या निवड सभेस सर्व संचालक, अधिकारी उपस्थित होते. निवडी नंतर विविध संस्था पदाधिकारी यांनी नूतन चेअरमन देसाई यांचा सत्कार केला.
==============

Monday, April 21, 2025

"डे विथ कलेक्टर"उपक्रमात हर्षला जयसिंग पडवळ या विद्यार्थीने गिरवले प्रशासकीय कामकाजाचे धडे

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : 
श्री रामेश्वर हायस्कूल मणदूर, (ता. गगनबावडा) येथील शाळेत इयत्ता 9 वी मध्ये शिकत असलेली विद्यार्थिनी हर्षला जयसिंग पडवळ या विद्यार्थीने ‘डे विथ कलेक्टर’ उपक्रमांतर्गत जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या सोबत प्रशासकीय कामकाजाचे धडे गिरवले. सोमवारी दिवसभरात झालेल्या बैठकीत हर्षला पडवळ हिने उपस्थित राहून कामकाजाची माहिती घेतली.

हर्षला जयसिंग पडवळ हिने सांगितले की, "मलाही शेतकरी आणि विद्यार्थी यांच्यासाठी काम करायचे असून यासाठी माझी आयएएस होण्याची इच्छा आहे. आज मला 'डे विथ कलेक्टर' या उपक्रमात जिल्हाधिकारी अमोल येडगे यांचे कामकाज अगदी जवळून पाहण्याची संधी मिळाली. या उपक्रमातून मला प्रशासकीय कामकाजाबाबत खूप शिकायला मिळाले. शासनाविषयी माहिती मिळाली आणि प्रशासकीय कामकाज कसे चालते, त्याचबरोबर एखादा विषय कसा हाताळावा हेही आज मला कळाले. मला खूप आनंद वाटला. या उपक्रमातून शिकण्याची जिद्द अधिक वाढेल.

शालेय स्तरावरच विद्यार्थ्यांना स्पर्धा परीक्षेची आवड निर्माण व्हावी, अभ्यासाची सवय लागावी. तसेच स्पर्धा परीक्षांची ओळख व्हावी आणि ‘जिल्हाधिकारी’ यांच्या करिअर व कार्याची माहिती घेवून यातून त्यांना प्रेरणा मिळावी. तसेच त्यांना योग्य मार्गदर्शन आणि दिशा देण्याच्या उद्देशाने जिल्हाधिकारी अमोल येडगे यांच्या संकल्पनेतून  "डे विथ कलेक्टर" हा नाविन्यपूर्ण उपक्रम जिल्हाधिकारी कार्यालयात राबविण्यात येत आहे. या उपक्रमांतर्गत निवड केलेल्या एका विद्यार्थ्यासोबत दर महिन्याच्या तिसऱ्या सोमवारी सकाळी 11 ते सायंकाळी 5 या वेळेत जिल्हाधिकारी संवाद साधणार आहेत. उत्सुक, प्रज्ञावंत आणि विशेष मुलांना जिल्हाधिकाऱ्यांसोबत संवाद साधण्याची संधी या उपक्रमाने मिळणार आहे.
===============

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...