Tuesday, April 29, 2025

अभूतपूर्व उत्साही वातावरणात आजऱ्यात छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीचे लोकार्पण; संपूर्ण आजरा झाला शिवमय

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
संपूर्ण आजरा शिवमय होत, अभूतपूर्व उत्साही वातावरणात आजरा येथील शिवतीर्थावर छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ मूर्तीचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा दिमाखदार पद्धतीने संपन्न झाला. यात तरुणाईचा जल्लोष तसेच महिला व युवतींचा लक्षणीय सहभाग उल्लेखनीय होता. राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री आणि कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते, गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या अध्यक्षतेखाली आणि आमदार शिवाजी पाटील, गोकुळचे संचालक नाविद मुश्रीफ, पद्मजा आपटे, छत्रपती शिवाजी महाराज पुतळा सुशोभीकरण समितीचे अध्यक्ष महादेव टोपले यांच्या प्रमुख उपस्थितीत व तमाम तालुकावासियांच्या साक्षीने छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्तीचा ऐतिहासिक लोकार्पण सोहळा पार पडला.

पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्यांना सुरुवातीला श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर संदीप पारळे यांनी प्रेरणा मंत्र म्हणत कार्यक्रमाला सुरुवात झाली. स्वागत व प्रास्ताविक विलास नाईक यांनी केले. छत्रपती शिवाजी महाराजांच्या जुन्या पुतळ्याचा इतिहास व नवीन मूर्ती उभारणीबाबतचे कार्य याची माहिती नाईक यांनी प्रास्ताविकात दिली. यावेळी पालकमंत्री आबिटकर म्हणाले, छत्रपती शिवरायांसमोर नतमस्तक होण्याचा आजचा आनंददायी दिवस आहे. छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळा व्हावा यासाठी आजरा तालुक्यातील जनतेची तपश्चर्या होती. भव्य दिव्य पुतळ्याचे सर्वांचे स्वप्न होते, जे आज पूर्णत्वास गेले आहे. ही मूर्ती उभारण्यासाठी ज्या ज्या घटकांनी योगदान दिले ते सर्वजणच अभिनंदनच पात्र आहेत. छत्रपती शिवाजी महाराजांच्या मूर्तीच्या लोकार्पणाचे भाग्य लाभले, हेच आयुष्याचे सार्थक वाटत आहे. आजच्या कार्यक्रमाच्या माध्यमातून सर्वसामान्यांसाठी आयुष्य समर्पित करण्याची भावना वाढीस लागली आहे. आजचा कार्यक्रम पाहिल्यानंतर सर्वांचेच काम सार्थकी लागल्याचे समाधान प्राप्त झाले आहे.

गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, वैचारिक बैठकीचा तालुका असलेल्या आजऱ्यामधील सर्वपक्षीयांनी एकत्रित छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य दिव्य पुतळा उभारला याचा विशेष आनंद होत आहे. यावेळी आमदार शिवाजी पाटील, नाविद मुश्रीफ यांनी मनोगत व्यक्त केले. छत्रपती शिवाजी महाराज मूर्ती लोकार्पण सोहळ्यानिमित्त सकाळच्या सत्रात अभिषेक, होम-हवन असे धार्मिक कार्यक्रम, दुपारी ढोल ताशा सादरीकरण तर त्यानंतर शिवशाही पोवाडा मंचच्या शिवशाहीर दिलीप सावंत व सहकाऱ्यांनी छत्रपती शिवरायांच्या जीवनावरील विविध पोवाडे सादर केले.

यावेळी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष मुकुंद देसाई, गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंत शिंपी, जिल्हा बँकेचे संचालक सुधीर देसाई, तहसीलदार समीर माने, गटविकास अधिकारी संजय ढमाळ, माजी नगराध्यक्षा ज्योस्ना चराटी, सुनील शिंत्रे, नागेश चौगुले, विजय पाटील, सुधीर कुंभार, दिवाकर नलवडे बाळ केसरकर, विजय थोरवत, नाथ देसाई, मारुती मोरे, संजय सावंत यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. डॉ. अशोक बाचुळकर यांनी सूत्रसंचालन केले. आनंदा कुंभार यांनी आभार मानले.

गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्याकडून मूर्तीला छत्र देण्याची घोषणा
लोकार्पण सोहळा कार्यक्रमाचे अध्यक्ष व गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे यांनी आजरा शहरात लोकार्पण झालेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ मूर्तीला डोंगळे कुटुंबीयांच्या वतीने छत्र देण्याची घोषणा यावेळी केली. तसेच आमदार शिवाजी पाटील यांनीही दहा लाख रुपयांचा विकास निधी देण्याचे जाहीर केले.
(फोटो सौजन्य : गंगा फोटो, गारगोटी  9860920571)
===================

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...