आजरा महाविद्यालयातील सर्वच घटक एकजीनसीपणाने काम करतात. यामुळे सर्वांना समान न्याय मिळतो. सर्व उपक्रम चांगल्या पद्धतीने राबवले जातात. या माध्यमातून विद्यार्थ्यांच्या कौशल्यांना वाव मिळतो. तसेच शैक्षणिक गुणवत्तेला चालना मिळते. यामुळे विद्यार्थीकेंद्रित व उपक्रमशील महाविद्यालय म्हणून राज्यभरात आजरा महाविद्यालयाचा नावलौकिक असल्याचे प्रतिपादन झी मराठी हास्य सम्राट फेम प्रा. अजित कुमार कोष्टी यांनी केले. ते आजरा महाविद्यालयाच्या वार्षिक स्नेहसंमेलन व पारितोषिक वितरण कार्यक्रमात बोलत होते. जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक अण्णा चराटी कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रा. अजितकुमार कोष्टी यांनी "गण्या" या आपल्या लाडक्या पात्राच्या माध्यमातून सादर केलेल्या विनोदी किश्यांनी सर्वच सभागृह हास्यकल्लोळात रंगून गेले होते.
स्वागत रत्नदीप पवार यांनी केले. प्राचार्य डॉ. अशोक सादळे यांनी प्रास्ताविकात महाविद्यालयाच्या विविध उपक्रमांचा तसेच महाविद्यालयाच्या प्रगतीचा आढावा घेतला. स्नेहसंमेलन प्रमुख प्रा. सदाशिव मोरे यांनी पाहुण्यांचा परिचय करून दिला. यावेळी महाविद्यालयातील वरिष्ठ व कनिष्ठ विभागातील शैक्षणिक, कला, क्रीडा, सांस्कृतिक, एनसीसी व एनएसएस विभागात उल्लेखनीय यश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांचा गौरव करण्यात आला. प्रा. अजितकुमार कोष्टी पुढे म्हणाले, आजरा महाविद्यालयातील विद्यार्थ्यांत संस्कृती व संस्कार चांगले असल्याचे दिसून येत आहे. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी स्नेहसंमेलन म्हणजे उत्साहाचे वातावरण असते. प्रत्येकाकडे वेगवेगळी क्षमता असते, स्वतःमधील क्षमता ओळखता आली पाहिजे. या क्षमतेनुसार काम केल्यास कर्तृत्वान व्यक्ती निर्माण होतील. गॅदरिंग संस्कृती सध्या लोक पावत चालली आहे. मात्र विद्यार्थ्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी गॅदरिंग गरजेचे आहे. त्याचबरोबर वाचन संस्कृती देखील लोप पावत चालली आहे, पुस्तक वाचण्यात एक वेगळीच मजा आहे. सध्या समाजाला अनेक गोष्टीतील नाविन्याच्या संशोधनाची गरज आहे. शिक्षणाच्या माध्यमातून जगण्याचे साधन प्रत्येकाने तयार करावे. प्रत्येकाच्या हातात शून्य असते या शून्यातून विश्व निर्माण करण्याची ताकद प्रत्येकात आहे. त्यामुळे संधीच्या शोधात न राहता आपली संधी आपणच तयार केली पाहिजे. महाविद्यालयीन जीवन आनंदी आहे. त्यामुळे स्वच्छंदी राहा व आनंदी जीवनाचा लाभ घ्या असे आवाहन त्यांनी केले. जनता एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष अशोक चराटी म्हणाले, स्नेहसंमेलनामध्ये गुणवंत विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. अशा गुणवंत विद्यार्थ्यांचा महाविद्यालयाला नेहमीच अभिमान आहे. यावेळी जनता एज्युकेशन सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. अनिल देशपांडे, उपाध्यक्ष विलास नाईक, संचालक विजयकुमार पाटील, डॉ. दीपक सातोसकर, सुरेश डांग, दिनेश कुरुणकर, माजी नगराध्यक्षा ज्योत्स्ना चराटी, अनिकेत चराटी, कार्यालय अधीक्षक योगेश पाटील, अर्जुन भुईंबर, विजय बांदेकर, दिलीप भालेराव यांच्यासह प्राध्यापक, विद्यार्थी, पालक उपस्थित होते. रत्नदीप पवार यांनी सूत्रसंचालन केले. वैशाली देसाई व डॉ. अशोक बाचूळकर यांनी पारितोषिक वितरणाचे वाचन केले. उपप्राचार्य दिलीप संकपाळ यांनी आभार मानले.
No comments:
Post a Comment