श्री जोतिबाच्या मूळ मूर्तीचे जतन करण्यासाठी पुरातत्त्व विभाग संवर्धन प्रक्रिया राबवणार आहे. त्यामुळे मंगळवार (दि. २१) ते शुक्रवार (दि. २४) या कालावधीत भाविकांना मूळ मूर्तीचे दर्शन घेता येणार नाही. जोतिबाची उत्सव मूर्ती आणि कलश मंदिराच्या कासव चौकात दर्शनासाठी ठेवण्यात येईल, अशी माहिती पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीतर्फे देण्यात आली आहे.
वाडी रत्नागिरी येथील श्री जोतिबा मंदिरामध्ये प्राचीन दगडी मूर्ती आहे. या मूर्तीचे संवर्धन करण्याच्या दृष्टिकोनातून पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीने केंद्रीय पुरातत्त्व विभाग आणि राज्य पुरातत्त्व विभाग यांना मूर्तीची पाहणी करून अहवाल देण्यासंदर्भात पत्रव्यवहार केला होता. त्याप्रमाणे पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी मूर्तीची पाहणी करून याबद्दलचा अहवाल समितीला दिला. यामध्ये त्यांनी मूर्तीवर रासायनिक संवर्धन प्रक्रिया करण्यासंदर्भात सुचविले होते. जोतिबाचे स्थानिक पुजारी, पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समिती आणि सहायक संचालक राज्य पुरातत्त्व विभाग यांच्याशी चर्चा केल्यानंतर संवर्धन प्रक्रिया राबवण्याचा निश्चित झाले आहे. ही प्रक्रिया मंगळवार पासून शुक्रवार पर्यंत होणार आहे. रासायनिक संवर्धन प्रक्रियेच्या कारणासाठी जोतिबा देवाचा गाभारा भाविकांच्या दर्शनासाठी बंद राहील. या कालावधीत उत्सव मूर्ती आणि कलश कासव चौकात ठेवला जाईल. भाविकांना याचे दर्शन घेता येणार आहे.
No comments:
Post a Comment