शेळप (ता. आजरा) येथे नव्याने वसवलेली पारपोली धरणग्रस्त वसाहत सोलर व्हिलेज करण्याचा निर्णय पारपोली येथे झालेल्या ग्रामस्थ आणि महावितरणचे अधिकारी यांच्या संयुक्त बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी कॉ. संपत देसाई होते.
यावेळी बोलताना गडहिंग्लज विभागाचे कार्यकारी अभियंता आडके म्हणाले, पारपोली हे संघटित गाव असून नव्याने वसलेल्या या धरणग्रस्त वसाहतीने सहकार्याची भूमिका घेतल्यास हे गाव सोलर व्हिलेज म्हणून राज्यात नावारूपाला येईल. आरोग्यमंत्री ना. प्रकाश आबिटकर यांनी याकामी सर्व प्रकारची मदत करण्याची हमी दिली असून सोलर व्हिलेज बनणारी राज्यातील ही पहिलीच वसाहत ठरेल. यावेळी बोलताना कॉ. संपत देसाई म्हणाले, विजेची मागणी दिवसागणिक वाढणार असून वीज सर्व सामान्य माणसांच्या कुवतीपालिकडे जाणार आहे. त्यामुळे सहज आणि स्वस्तात मिळणारी सौर ऊर्जा घरगुती वापरासाठी आवश्यक बनणार आहे. महावितरण, राज्य सरकारच्या आणि विविध कंपन्यांच्या सीएसआर फंडातून ही वसाहत सोलर व्हिलेज करण्यासाठी आम्ही पुढाकार घेऊ. राज्यात एक वेगळा आदर्श निर्माण करून दाखवू.
यावेळी महावितरण आजरा शाखेचे उपकार्यकारी अभियंता दयानंद अष्टेकर, सहा. अभियंता शरद पाटील, सामाजिक कार्यकर्ते रवी भाटले यांनीही मनोगते व्यक्त केली. यावेळी महादेव पाटील, मारुती ढोकरे, हरिबा जाधव, ज्ञानेश्वर गुंजाळ यांच्यासह सर्व ग्रामस्थ उपस्थित होते. अशोक मालव यांनी स्वागत केले. प्रकाश शेटगे यांनी आभार मानले.
====================
No comments:
Post a Comment