Sunday, January 5, 2025

राज्यातील जनतेला अभिमान वाटेल असे काम करणार : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर; आजरा येथे मंत्री आबिटकर, मंत्री मुश्रीफ, आमदार पाटील यांचा नागरी सत्कार

राज्यातील जनतेला अभिमान वाटेल असे काम करणार : आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर; आजरा येथे मंत्री आबिटकर, मंत्री मुश्रीफ, आमदार पाटील यांचा नागरी सत्कार 
आजरा, वृत्तसेवा :
 सर्वसामान्य जनतेचे प्रेम व सहकार्य या माध्यमातून सामान्य कार्यकर्त्यापासून राज्याच्या मंत्री पदापर्यंत मजल मारली आहे. आतापर्यंत राधानगरी विधानसभा मतदारसंघातील  सर्वसामान्य जनतेला अभिमान वाटेल असे काम केले आहे. मिळालेल्या आरोग्य मंत्री पदाच्या माध्यमातून आगामी काळात असे काम करणार की राज्यातील जनतेला अभिमान वाटेल, असे प्रतिपादन महाराष्ट्र राज्याचे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री नामदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते आजरा येथे नागरी सत्कार समारंभ कार्यक्रमात बोलत होते. गोकुळ दूध संघाचे अध्यक्ष अरुण डोंगळे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर व आमदार शिवाजीराव पाटील यांचा आजरा तालुक्यातील जनता व अण्णाभाऊ संस्था समूहाच्या वतीने नागरी सत्कार करण्यात आला.
स्वागत व प्रास्ताविक करताना अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी म्हणाले, आजरा तालुक्याला तीन आमदार असून त्यामध्ये दोन कॅबिनेट मंत्री आहेत हे तालुक्याचे भाग्य आहे. उत्तूर परिसर सुजलाम सुफलाम करण्याचे काम मंत्री मुश्रीफ यांनी केले आहे. मंत्री आबिटकर यांनी आजरा जिल्हा परिषद मतदार संघामध्ये भरपूर काम केले आहे. शिवाजी पाटील यांनी आमदार नसतानाही काम केले. त्यामुळे या तिघांनाही लोकांनी भरपूर प्रेम दिले. मंत्री मुश्रीफ व आबिटकर यांच्या माध्यमातून आजरा तालुक्याचा विकास होणार आहे. तालुक्यात एमआयडीसी विस्तारीकरण, मेडिकल कॉलेज, वन विभागाचे प्रश्न, काजू बोंडावर प्रक्रिया उद्योग, रामतीर्थ पर्यटन स्थळ विकास होण्याची गरज असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी मंत्री मुश्रीफ म्हणाले, आजरा तालुक्याच्या विकासासाठी सर्व ते सहकार्य करण्यात येईल. राज्याचे आरोग्य मंत्री आबिटकर यांच्या हाती आहे ते चांगले काम करतील. आगामी काळात जिल्ह्याच्या आरोग्याचा बृहत आराखडा तयार करावा लागेल. निराधार योजनेची पेन्शनची रक्कम वाढवून लवकरच दोन हजार रुपये करण्यात येईल. दिवाळीपर्यंत कोल्हापूर येथील सीपीआर रुग्णालयाचे नूतनीकरण पूर्ण होईल. तसेच आगामी दोन वर्षात शेंडा पार्क मध्ये 1100 बेडचे हॉस्पिटल पूर्णत्वास जाईल. निवडणुकीपूर्वी सुरू करण्यात आलेली कोणती योजना सध्याचे शासन बंद करणार नाही. राज्याच्या विकासाचा वेग कायम ठेवत कुणाला काही कमी पडणार नाही याची काळजी राज्य शासन घेईल. आजरा तालुका अग्रेसर बनवण्यासाठी कटिबद्ध आहे. स्व. काशिनाथ चराटी व स्व. माधवराव देशपांडे यांचे कार्य आदर्शवत होते असे त्यांनी सांगितले.
आरोग्य मंत्री आबिटकर पुढे म्हणाले, आजरा तालुक्याला समृद्ध करण्यासाठी ताकतीने व शक्तीने काम करणार आहे.  आतापर्यंत जसे चांगले काम झाले तसेच चांगले काम भविष्यकाळात करण्यासाठी सर्वांनी आशीर्वाद द्यावे. कोल्हापूर जिल्ह्याने विधानसभा निवडणुकीत महायुतीला भरभरून दिले, त्यामुळे जिल्ह्यातील एकही काम अपूर्ण राहणार नाही याची काळजी घेतली जाईल. आमदार शिवाजीराव पाटील म्हणाले, पर्यटन क्षेत्रात आजरा चंदगड तालुका अग्रेसर रहावा यासाठी प्रयत्नशील आहे. आजरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या उद्घाटनासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना आणणार असल्याची त्यांनी सांगितले. गोकुळचे अध्यक्ष अरुण डोंगळे म्हणाले, जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींनी आपल्या पदाला न्याय देण्याची काम करावे. बंद करण्यात आलेले गाय दुधाचे अनुदान पूर्वत सुरू करण्यात यावे. यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष नाथाजी पाटील यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी अण्णाभाऊ आजरा सूतगिरणीच्या अध्यक्षा अन्नपूर्णा चराटी, उपाध्यक्ष डॉ. अनिल देशपांडे, जनता एज्युकेशनचे उपाध्यक्ष विलास नाईक, आजरा अर्बन बँकेचे अध्यक्ष रमेश कुरुनकर, आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे, माजी नगराध्यक्ष ज्योत्स्ना चराटी, सुरेश डांग, डॉ. दीपक सातोस्कर, दशरथ अमृते,  राजेंद्र सावंत, अनिरुद्ध केसरकर, विजय थोरवत, संतोष भाटले, जितेंद्र भोसले, अनिकेत चराटी,  दीपक देसाई, अनिकेत कवळेकर, जयवंत सुतार यांच्यासह विविध गावचे सरपंच, विविध संस्थांचे पदाधिकारी व नागरिक उपस्थित होते. डॉ. अशोक बाचुळकर यांनी सूत्रसंचालन केले. विजय पाटील यांनी आभार मानले.
====================

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत आजऱ्याच्या नवनाट्य कला मंचच्या श्रुती कांबळेला अभिनय पारितोषिक

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर येथे पार पडलेल्या 64 वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये आजऱ्याच्या नवनाट्य कला म...