Sunday, December 15, 2024

आमदार प्रकाश आबिटकर यांना मंत्रीपद मिळाल्याने आजऱ्यात जल्लोष

आमदार प्रकाश आबिटकर यांना मंत्रीपद मिळाल्याने आजऱ्यात जल्लोष 
 आजरा, वृत्तसेवा :

 बहुप्रतिक्षित व बहुचर्चित महाराष्ट्र राज्याच्या राज्य मंत्रिमंडळ शपथविधी समारंभात राधानगरी-भुदरगड-आजराचे आमदार प्रकाश आबिटकर यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतल्याबद्दल आजरा येथे महायुतीचे कार्यकर्ते व आमदार आबिटकर प्रेमी जनता यांनी आजरा शहरात जल्लोष केला. तालुक्याच्या ग्रामीण भागातही आमदार आबिटकर यांना मंत्रिपद मिळाल्याने जल्लोष करण्यात आला. राधानगरी विधानसभा मतदारसंघाला प्रथमच मंत्रिपद मिळाल्याने सर्वत्र आनंदाचे वातावरण तयार झाले आहे.
 आमदार आबिटकर यांनी राधानगरी-भुदरगड-आजरा विधानसभा मतदारसंघातून सलग तिसऱ्यांदा ऐतिहासिक विजय प्राप्त केला आहे. विधानसभा निवडणुकीच्या अगोदर तत्कालीन मुख्यमंत्री व विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे राधानगरी-भुदरगडच्या दौऱ्यावर आले असता त्यांनी जाहीर सभेत आबिटकर यांना तिसऱ्यांदा आमदार करा मी नामदार करतो, असं अभिवचन मतदार संघातील जनतेला दिलं होतं. त्यानुसार नवीन विधानसभा अस्तित्वात आल्यानंतर मंत्रिमंडळात आबिटकर यांचा समावेश होणार का याकडे साऱ्यांचे लक्ष लागून राहिले होते. विविध कारणांनी लांबलेला मंत्रिमंडळाचा शपथविधी रविवारी दुपारी पार पडला. यामध्ये आमदार आबिटकर यांनी कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. यामुळे मतदार संघामध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. 
आमदार आबिटकर यांना मंत्रीपद मिळणार हे शनिवारी मध्यरात्री निश्चित झाल्यानंतर रविवारी पहाटेपासूनच सोशल मीडियावर आमदार आबिटकर यांच्या अभिनंदनाच्या पोस्ट व्हायरल होऊ लागल्या. त्याचबरोबर आजरा शहरासह ग्रामीण भागातील कार्यकर्त्यांनी जल्लोषाची तयारी केली होती. आजरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्याजवळ एलईडी स्क्रीनच्या माध्यमातून मंत्रिमंडळाच्या शपथविधी सोहळ्याचे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. या ठिकाणी आमदार प्रकाश आबिटकर यांचा शपथविधी होत असताना कार्यकर्त्यांनी मोठा जल्लोष केला. फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. साखर पेढ्याचे वाटप करण्यात आले. यानंतर कार्यकर्त्यांनी आजऱ्याचे ग्रामदैवत रवळनाथ मंदिराजवळ जावून आनंदोत्सव साजरा केला. छ. संभाजी चौकात देखील फटाक्यांची आतषबाजी करण्यात आली. यावेळी अण्णाभाऊ संस्था समूहाचे प्रमुख अशोक चराटी, विलास नाईक, विजय पाटील, दशरथ अमृते, परशराम बामणे, शिवसेना उपजिल्हाप्रमुख राजेंद्र सावंत, तालुकाप्रमुख संजय पाटील, भाजपा तालुकाध्यक्ष बाळ केसरकर, नाथ देसाई, विजय थोरवत, साळगाव सरपंच धनंजय पाटील, आनंदा कुंभार, सुनील दिवेकर, संदेश पाटील, अमित खेडेकर, मंदार बिरजे, संतोष जाधव, युवराज पाटील, लहू वाकर, अनिकेत चराटी यासह महायुतीचे कार्यकर्ते व नागरिक  मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=================  

No comments:

Post a Comment

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...