वारकरी संप्रदायाचा समतेचा विचारच महाराष्ट्राला पुढे नेणारा : कॉ. संपत देसाई; शेळप येथे वारकरी मंडळाच्या शाखेचे उदघाटन
आजरा, वृत्तसेवा :
वारकरी संस्कृती हीच खरी महाराष्ट्राची संस्कृती असून समतेचा विचार गावोगावी पोहचवण्याचे काम आजरा तालुका वारकरी मंडळ करीत आहे. या मंडळाच्या पाठीशी जनतेने ठामपणे उभे राहावे असे विचार कॉ. संपत देसाई यांनी मांडले. ते शेळप (ता. आजरा) येथे वारकरी मंडळाच्या शाखेच्या उदघाटन प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून बोलत होते. यावेळी तालुका अध्यक्ष ह.भ.प. गौरव सुतार महाराज, उपाध्यक्ष ह.भ.प. संतु कांबळे महाराज, सचिव ह.भ.प. पांडुरंग जोशीलकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
कॉ. देसाई आपल्या भाषणात पुढे म्हणाले की, वारकरी संतांनी आजच्या वर्तमान प्रश्नांची उत्तरेही आपल्या मांडणीत दिली आहेत. भेदाभेद भ्रम अमंगळ म्हणणारी ही परंपरा आधुनिक विचार मांडते. आज स्वातंत्र्य, समता, बंधुता आणि सामाजिक न्याय ही मूल्ये जी संविधानाने दिली आहेत त्या मूल्यांची पेरणी या भूमीत वारकरी संतानी तेराव्या शतकांपासून केली आहे. म्हणूनचं अभिमानाने सांगावे लागते की महाराष्ट्राची खरी संस्कृती ही वारकरी संस्कृती आहे.
यावेळी बोलताना मंडळाचे तालुका अध्यक्ष ह.भ.प. गौरव सुतार महाराज म्हणाले की, तालुक्यात संतांचे विचार पोहचवणे, वारकऱ्यांच्या अडीअडचणी समजून घेणे यासाठी या तालुक्यातील वरकाऱ्यांना आम्ही संघटित केले आहे. वारकरी संस्कृती, विचार जनतेत घेऊन जाण्यासाठी विविध कार्यक्रम आखले जाणार आहेत. तालुक्याच्या ठिकाणी वारकरी भवन उभा करण्याचा आमचा संकल्प असून तो लवकरच पूर्णत्वाला नेला जाईल. यावेळी चंद्रकांत घुणे, शामराव पाटील, संतु महाराज यांनीही मनोगते व्यक्त केली. गावच्या वेशिपासून दिंडी निघाली. भैरवनाथ मंदिराजवळ वारकरी मंडळाच्या शेळप शाखेचे उदघाटन करण्यात आले. महिलांची उपस्थिती लक्षणीय होती. यावेळी शांताराम पाटील, बाबुराव आडे, गंगाराम येडगे, संभाजी पालकर, दीपाली गुरव, कल्पना जाधव, संगीता माधव, रेखा नांदवडेकर, रेखा बटकडली यांच्यासह तालुक्यातून वारकरी मोठ्या संख्येने आले होते. स्वागत प्रास्तविक सुधाकर पाटील यांनी केले तर आभार बाळू पाटील यांनी मांडले. यावेळी संत गजानन महाराज शेगाव संस्थान मार्फत भजनाचे साहित्य शेळप वारकरी मंडळाला देण्यात आले.
===================
No comments:
Post a Comment