"ईव्हीएम हटाव"साठी आजऱ्यात महाविकास आघाडीचा मोर्चा; ईव्हीएम प्रतिकृती दहन करण्यावरून आंदोलन व पोलिसात झटापट
आजरा, वृत्तसेवा :
यापुढील सर्व निवडणुका बॅलेट पेपरवर घेण्यात याव्यात, यासाठी ईव्हीएम हटावच्या मागणीसाठी आजरा शहरात इंडिया आघाडी व महाविकास आघाडीच्या वतीने मोर्चा काढण्यात आला. यावेळी ईव्हीएम प्रतिकृतीची प्रतिकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. या प्रतिकृतीच्या दहन करण्यावरून आंदोलन कार्यकर्ते व पोलिसात झटापट झाली. ईव्हीएम हटाव बाबतचे निवेदन नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई यांनी स्वीकारले.
नुकत्याच पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत दारुण पराभव मिळालेल्या महाविकास आघाडीने ईव्हीएम मशीन मध्ये गडबड करून महायुती सत्तेत आल्याचा आरोप करत राज्यभर विविध माध्यमातून निषेध नोंदवण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे आजरा शहरात इंडिया आघाडी व महाविकास आघाडीने मोर्च्याचे आयोजन केले होते. या मोर्चाचे नेतृत्व माजी आमदार के. पी. पाटील, गोकुळच्या संचालिका अंजना रेडेकर, राष्ट्रवादी शरद पवार गट तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई, कॉ. संपत देसाई, शिवसेना ठाकरे गट जिल्हाप्रमुख सुनील शिंत्रे, उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील यांनी मोर्चाचे नेतृत्व केलं. आजरा शहरातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून मोर्चाला सुरुवात झाली. ईव्हीएम हटाव देश बचाव, बॅलेट पेपरवर मतदान झालेच पाहिजे, लोकशाही बचाव देश बचाव अशा घोषणा देत कार्यकर्ते छत्रपती संभाजी चौकात दाखल झाले. या मोर्चात ईव्हीएम मशीनची प्रतीकात्मक अंत्ययात्रा काढण्यात आली. यावेळी बोलताना कॉ. संपत देसाई म्हणाले, महाविकास आघाडीचे सरकार सत्तेत येणार हे जाणून ईव्हीएम घोटाळा करण्यात आला. बॅलेट पेपरवर मतदान घेण्याची गरज आहे. ईव्हीएम मशीन मध्ये छेडछाड करता येते. लोकशाही जिवंत राहण्यासाठी ईव्हीएम हटवून बॅलेट पेपरवर मतदान झाले पाहिजे. माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, राज्यातील लोकांनी महाविकास आघाडीला पसंती दिली होती, मात्र ईव्हीएम मध्ये छेडछाड करून महायुतीचे उमेदवार निवडून आणण्यात आले आहेत. संपूर्ण महाराष्ट्रात ईव्हीएम मध्ये छेडछाड करण्यात आली आहे. राधानगरी विधानसभा मतदारसंघातील कोणत्याही गावात प्रायोगिक तत्त्वावर बॅलेट पेपरवर मतदान घेऊन ईव्हीएम बाबत सत्यता पडताळण्याची गरज आहे. देशाला वाचवण्यासाठी ईव्हीएमला विरोध झालाच पाहिजे. आगामी काळातील कोणत्याही निवडणुका ईव्हीएम वर न घेता बॅलेट पेपरवर निवडणूक विभागाने घ्यावे अशी मागणी त्यांनी केली. सुनील शिंत्रे म्हणाले, लोकसभेला महाविकास आघाडीचे वातावरण होते, त्यामुळे विधानसभेला जाणीवपूर्वक ईव्हीएम मध्ये छेडछाड करण्यात आली आहे. प्रगतशील राष्ट्रांमध्ये बॅलेट पेपरवर मतदान होते. भविष्यकाळात लोकशाही वाचवण्यासाठी बॅलेट पेपरवर मतदान होणे गरजेचे आहे. यावेळी मुकुंद देसाई यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी ईव्हीएम प्रतिकृतीच्या दहन करण्यावरून आंदोलन कार्यकर्ते व पोलिसात झटापट झाली. यावेळी उदय पवार, राजू होलम, रवींद्र भाटले, युवराज पोवार, विक्रम देसाई, रणजीत देसाई, हरिबा कांबळे, समीर चांद, दयानंद भोपळे, ओंकार माध्याळकर, प्रकाश मोरुस्कर, मंजूर मुजावर, नवनाथ शिंदे, शांताराम पाटील, रोहन जाधव, संजय तर्डेकर, दिनेश कांबळे, शिवाजी गुरव यांच्यासह इंडिया आघाडी व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
==================
No comments:
Post a Comment