Wednesday, December 4, 2024

देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री; विधीमंडळाच्या गटनेतेपदी एकमताने निवड

देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री; विधीमंडळाच्या गटनेतेपदी एकमताने निवड
मुंबई, वृत्तसेवा :

महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यानंतर गेल्या ११ दिवसापासून सुरू असलेला महायुतीतील हायव्होल्टेज ड्रामा अखेर संपला आहे. देवेंद्र फडणवीस यांचा मुख्यमंत्रीपदाचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे. पक्षाच्या कोअर कमिटीच्या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांची विधीमंडळाचा नेता म्हणून निवड करण्यात आली. त्यामुळे फडणवीस हेच मुख्यमंत्री होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. गुरुवार दि.५ डिसेंबर रोजी देवेंद्र फडणवीस यांचा आझाद मैदानावर ग्रँड शपथविधी सोहळा होणार आहे. मुख्यमंत्रीपदाच्या शपथविधीनंतर राज्याचे २१ वे मुख्यमंत्री म्हणून फडणवीस राज्याचा कारभार सांभाळतील.
महाराष्ट्रातील विधानसभा निवडणुकांचा निकाल २३ नोव्हेंबर रोजी जाहीर झाला. यात महायुतीला स्पष्ट बहुमत मिळाले आणि भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला. निकालानंतर आता 10 दिवस उलटून गेले आहेत. महायुतीमधील शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी आपापल्या विधिमंडळ गटनेत्याची निवड केलेली आहे. पण सर्वात मोठा पक्ष ठरलेल्या भाजपकडून विधिमंडळ गटनेता निवडण्यात आला नव्हता. याच पार्श्वभूमीवर भाजपकडून आज 4 डिसेंबर रोजी विधिमंडळ गटनेता निवडण्याची महत्त्वाची बैठक विधीमंडळात पार पडली. या बैठकीपूर्वी भाजपच्या कोअर कमिटीची बैठक झाली. या बैठकीत भाजपचे वरिष्ठ नेते, केंद्रीय निरीक्षक विजय रुपाणी आणि निर्मला सीतारमण हे हजर होते. यावेळी गटनेतेपदासह विविध मुद्द्यांवर चर्चा करण्यात आली. यानंतर विधानभवनाच्या सेंट्रल हॉलमध्ये भाजपच्या आमदारांची विधिमंडळ गटनेता निवडीची बैठक सुरु झाली आहे. यावेळी सुधीर मुनगंटीवार आणि चंद्रकांत पाटील यांनी गटनेतेपदाचा प्रस्ताव मांडला. तर आशिष शेलार आणि रविंद्र चव्हाण यांनी या प्रस्तावावर अनुमोदन दिले. देवेंद्र फडणवीस यांची विधिमंडळ गटनेतेपदी निवड झाल्यानंतर अखेर सत्तास्थापनेचा मार्ग मोकळा झाला आहे. देवेंद्र फडणवीस यांची निवड झाल्यानंतर फडणवीस आजच राज्यापालांना सत्ता स्थापनेचं पत्र देणार असल्याचं सांगितलं जात आहे. यावेळी फडणवीस यांच्यासोबत अजित पवार असण्याची शक्यता आहे. तर एकनाथ शिंदे हे फडणवीस यांच्यासोबत असतील का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
=======================

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत आजऱ्याच्या नवनाट्य कला मंचच्या श्रुती कांबळेला अभिनय पारितोषिक

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर येथे पार पडलेल्या 64 वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये आजऱ्याच्या नवनाट्य कला म...