Monday, December 1, 2025

आजरा नगरपंचायतीच्या मतदानासाठी प्रशासन सज्ज : तहसीलदार समीर माने, १९ केंद्रावर होणार मतदान

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मंगळवार (दि. २) रोजी नगराध्यपद व १७ नगरसेवकपदांच्या जागासाठी मतदान होत आहे. या मतदानासाठी प्रशासकीय यंत्रणा सज्ज असल्याची माहीती निवडणुक निर्णय अधिकारी तथा आजऱ्याचे तहसीलदार समीर माने यांनी दिली.

आजरा नगरपंचायतीच्या पंचवार्षिक सार्वत्रिक निवडणुकीसाठी नगराध्यक्षपदासाठी सहा, तर नगरसेवकपदासाठी ५७ उमेदवार निवडणुक रिंगणात आहेत. यासाठी एकूण १४ हजार ६८६ मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. यामध्ये ७ हजार ४१९ पुरुष तर ७ हजार २६७ महीला मतदार आहेत. या करीता १७ प्रभागात १९ मतदान केंद्र उभारण्यात आली आहेत. प्रभाग क्रमांक ८ व प्रभाग क्रमांक ९ मध्ये प्रत्येकी दोन मतदान केंद्र आहेत. उर्वरीत १५ प्रभागात प्रत्येकी एक मतदान केंद्र आहे. प्रभाग १, २ व ३ वरील मतदान व्यंकटराव हायस्कूल येथे, प्रभाग क्रमांक ४ व ५ चे मतदान झाकीर हुसेन उर्दु हायस्कूल येथे, प्रभाग क्रमांक ६, ७ आणि १० चे मतदान आजरा हायस्कूल येथे, प्रभाग क्रमांक ८ चे मतदान स्वामी विवेकानंद विद्यामंदिर, प्रभाग क्रमांक ९ व १२ चे मतदान पंडीत दीनदयाळ हायस्कूल, प्रभाग क्रमांक ११ चे मतदान ऊर्दु मराठी विद्यामंदिर, प्रभाग क्रमांक १३, १५ व १७ चे मतदान रोझरी हायस्कूल, प्रभाग क्रमांक १४ चे मतदान आजरा महाविद्यालय येथे तर प्रभाग क्रमांक १६ चे मतदान विद्यामंदिर गांधीनगर येथे होणार आहे. 
मतदानासाठी एकूण ११४ कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. प्रत्येक केंद्रावर केंद्राध्यक्ष, तीन मतदान अधिकारी, शिपाई व पोलीस कर्मचारी असे प्रत्येक मतदान केंद्रावर सहा जणांची नियुक्ती करण्यात आली आहे.  आजरा शहरातील प्रत्येक मतदाराने मतदान करून लोकशाही बळकट करावी. तसेच शांततेत व निर्भयतेने मतदान पार पाडावे असे आवाहन तहसीलदार माने यांनी केले आहे. यावेळी सहाय्यक निवडणुक निर्णय अधिकारी सुरज सुर्वे, अतिरिक्त निवडणुक निर्णय अधिकारी म्हाळसाकांत देसाई या वेळी उपस्थित होते.
===============================

No comments:

Post a Comment

महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेत आजऱ्याच्या नवनाट्य कला मंचच्या श्रुती कांबळेला अभिनय पारितोषिक

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर येथे पार पडलेल्या 64 वी महाराष्ट्र राज्य हौशी नाट्य स्पर्धेमध्ये आजऱ्याच्या नवनाट्य कला म...