Friday, August 1, 2025

आजऱ्यात सोमवार 18 ऑगस्ट रोजी शक्तीपीठ महामार्ग विरोधात मोर्चा, शक्तीपीठ महामार्ग विरोधी संघर्ष समितीच्या बैठकीत निर्णय

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
शक्तीपीठ महामार्ग हा शेतकऱ्यांना व पर्यावरणाला उध्वस्त करणारा असल्याने या विभागातील शेतकऱ्यांचा विरोध दर्शवण्यासाठी सोमवार दि. 18 रोजी आजरा तहसील कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा निर्णय येथे झालेल्या संघर्ष समितीच्या बैठकीत घेण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी आजरा साखर कारखाना अध्यक्ष मुकुंददादा देसाई होते.

सुरवातीला संघर्ष समितीचे निमंत्रक आणि श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई  बैठकीमागील हेतू सांगताना म्हणाले की, १२ जिल्ह्यातील शेतकरी शक्तीपीठच्या विरोधात लढत आहेत. हा मार्ग शेतकऱ्यांना आणि पर्यावरणाला उध्वस्त करणारा आहे. त्यातच भर म्हणून चंदगडचे आमदार रशिवाजीराव पाटील यांनी नव्या मार्गाची मागणी करून शेतकऱ्यांच्या जमिनी आणि इथल्या निसर्गाची नासाडी करण्याच्या शासनाच्या भूमिकेचे समर्थन केले आहे. त्यामुळं आजची बैठक ही आंदोलनाची दिशा ठरवण्यासाठी आहे. लढ्याचे नियोजन करण्यासाठी आहे. शेतकरी संघटनेचे राजेंद्र गड्यांनवर म्हणाले, हा रस्ता जरी देवाचे नाव घेऊन होत असला तरी तो केवळ अदानीसाठी होत आहे. अदानीची खनिजे गडचिरोलीहुन गोवा मार्गे परदेशात पाठवण्यासाठी शेतकऱ्यांना बळी दिले जात आहे. त्यामुळं आमचा या महामार्गाला विरोध आहे. बळीराजा संघटनेचे नितीन पाटील म्हणाले, हा रस्ता कोणत्याही परिस्थितीत होऊ नये यासाठी प्रबोधन करणे गरजेचे आहे ते आपण सगळे मिळून करू. त्यासाठी गाववार बैठकांचे आयोजन करावे लागेल.
   
शिवसेनेचे युवराज पोवार म्हणाले, लोकांना सत्ताधारी आमदार निधी मिळणार नाही अशी धमकी देत आहे, लोकांना आपण शक्तीपीठचा धोका समजावून सांगितला पाहिजे. अध्यक्षीय समारोपात मुकुंददादा देसाई म्हणाले, आजरा तालुक्यात अनेक प्रकल्प झाले. त्यातील विस्थापितांचे अजून पुनर्वसन झालेले नाही, असे असताना हा महामार्ग शेतकऱ्यांच्या डोक्यावर का मारला जात आहे. या महामार्गाला पूर्ण शक्तीनिशी विरोध करूया.
   
यावेळी तानाजी देसाई, उमेश आपटे, दशरथ घुरे, शांताराम पाटील, नागेश चौगुले, बाळू पाटील, गोविंद पाटील, शिवाजी गुरव, शिवाजी इंगळे यांनीही आपली मनोगते व्यक्त केली. सुरवातीला अण्णा भाऊ साठे यांच्या प्रतिमेचे पूजन करून त्यांना अभिवादन करण्यात आले. यावेळी विद्याधर गुरबे, अल्बर्ट डिसोझा, रवी भाटले, रामदास पाटील, संजय तरडेकर, प्रकाश शेटगे, किरण पाटील, नारायण भडांगे, संभाजी सांबरेकर, विष्णू पाटील यांच्यासह दाभिल, शेळप, घाटकरवाडी, पारपोली, जेऊर, चितळे, भावेवाडी येथील कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

दि १८ ऑगस्ट रोजी निघणाऱ्या मोर्चाला आमदार सतेज पाटील, माजी खासदार राजू शेट्टी आणि माजी आमदार राजेश पाटील उपस्थित राहणार आहेत.
====================

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...