Monday, June 23, 2025

विकास कामांच्या बाबतीत बदनामी झाल्यामुळेच अशोक चराटी यांना लोकप्रिय पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांची गरज; आजरा येथील पत्रकार परिषदेत अन्याय निवारण समितीचा घणाघात

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा नगरपंचायतीच्या गत निवडणुकीत शहरातील नागरिकांनी ज्या विश्वासाने नगरपंचायतीची सत्ता अशोक चराटी यांच्या ताब्यात दिली, त्या विश्वासाला चराटी पात्र राहिले नाहीत. विकास कामांच्या बाबतीत दिरंगाई होऊन अशोक चराटी यांची पुरती बदनामी झाली आहे. त्यामुळे सर्वसामान्यांच्यात लोकप्रिय असलेले राज्याचे आरोग्य मंत्री तथा कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या लोकप्रियतेचा फायदा मिळवावा, या उद्देशानेच भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक चराटी यांनी लोकप्रिय पालकमंत्री आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली आजरा नगरपंचायत निवडणूक लढवणार असल्याची घोषणा केली आहे, चराटी यांचा हा डाव सर्वसामान्यांच्या लक्षात आल्याचा घणाघात आजरा रहिवाशी अन्याय निवारण समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला.

यावेळी बोलताना अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशराम बामणे म्हणाले, आजरा येथील कार्यक्रमात अशोक चराटी यांनी आगामी नगरपंचायत निवडणूक पालकमंत्री आबिटकर यांच्या नेतृत्वाखाली लढणार असल्याचे सांगितले. चराटी हे एका पक्षाचे पदाधिकारी आहेत त्या पक्षाचा ते झेंडा खाली ठेवणार आहेत का? पालकमंत्री आबिटकर आपला झेंडा चराटी यांना देऊन विधानसभा निवडणुकीत निष्ठेने काम केलेल्या कार्यकर्त्यांच्या वर अन्याय करणार का? असा सवाल आहे. विधानसभा निवडणुकीत पालकमंत्री आबिटकर यांचे काम करण्यासाठी अनेकांनी धरसोड वृत्ती केली. मात्र अन्याय निवारण समितीने प्रामाणिकपणे पालकमंत्री आबिटकर यांचे काम केले आहे. पालकमंत्री आबिटकर यांच्या माध्यमातून आजरा नगरपंचायतीसाठी कोट्यावधी रुपयांचा निधी मंजूर झाला, परंतु नगरपंचायतीतील सत्ताधारी मंडळींनी त्याचा गैरवापर करून आजरा शहराची वाट लावली आहे. शहरातची पाणीपुरवठा योजना हे त्याचे ठळक उदाहरण आहे. नगरपंचायतीतील कामामुळे पालकमंत्री आबिटकर यांची सुद्धा प्रतिमा मलिन होत आहे. आजरा नगरपंचायतीसाठी अन्याय निवारण समितीने प्रथम रणशिंग फुंकल्यानंतर सत्ताधारी मंडळींना जाग आली आहे. नगरपंचायतीच्या निवडणुकीपूर्वी सर्व कामे पूर्ण होतील असा दावा केला जातो. मात्र प्रत्यक्षात सुरू असलेल्या कामांमध्ये अनेक त्रुटी, दिरंगाई व अनागोंदी परिस्थिती आहे. कामाची गुणवत्ता तपासली जात नाही. स्थानिक प्रशासन व सत्ताधारी नेते या त्रुटीवर डोळेझाक करत आहे हे दुर्लक्ष करण्यामागची गुपित काय? अन्याय निवारण समितीने यावर तीव्र निषेध नोंदवून सत्ताधाऱ्यांच्या कडून कामाच्या गुणवत्तेची व पारदर्शकतेची मागणी केली आहे. तसेच आजरा नगरपंचायत क्षेत्रात अनधिकृत रित्या असणाऱ्या मतदार नोंदणी वगळण्याची मागणी समितीने केली आहे. याबाबत प्रशासनाला निवेदन देण्यात आले आहे. आजपर्यंत समितीने सामाजिक व वैयक्तिक समस्यावर कार्य करत आजरा नगरपंचायत क्षेत्रात लोकहिताचे काम केले आहे. त्यामुळे जनतेच्या विश्वासास पात्र राहून निवडणुकीत सक्रिय सहभाग घेणार असल्याचेही यावेळी बामणे यांनी सांगितले. यावेळी विजय थोरवत, गौरव देशपांडे, पांडुरंग सावरकर, जावेद पठाण, यशवंत चव्हाण, दयानंद भोपळे, ज्योतिबा आजगेकर, बंडोपंत चव्हाण दिनकर जाधव उपस्थित होते.
================

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...