Tuesday, December 17, 2024

दिगंबरा... दिगंबरा... च्या जयघोषात नृसिंहवाडीत श्रीदत्त जन्मोत्सव सोहळा; महाराष्ट्र, कर्नाटकातील लाखो भाविकांची मांदियाळी

दिगंबरा... दिगंबरा... च्या जयघोषात नृसिंहवाडीत श्रीदत्त जन्मोत्सव सोहळा; महाराष्ट्र, कर्नाटकातील लाखो भाविकांची मांदियाळी

कोल्हापूर, वृत्तसेवा :

कृष्णा आणि पंचगंगा नद्यांचे मीलन झालेल्या आणि श्रीदत्तगुरूंच्या पवित्र संचाराने पावन असलेल्या श्रीक्षेत्र नृसिंहवाडीत शनिवारी श्रीदत्त महाराजांच्या जन्मोत्सव सोहळ्याचा भव्य महोत्सव साजरा झाला. या दिव्यस्थळी लाखो भाविकांनी हजेरी लावत 'दिगंबरा... दिगंबरा... श्रीपाद वल्लभ दिगंबरा... 'च्या जयघोषात श्रीदत्तगुरूंच्या चरणी श्रद्धाभाव व्यक्त केला.

कृष्णा नदीच्या तीरावरील या पावन भूमीवर शुक्लतीर्थ, पापविनाशी, काम्य, सिद्ध, अमर, कोटी, शक्ती आणि प्रयागतीर्थ अशा अष्टतीर्थांच्या साक्षीने सोहळ्याला दिव्यतेचा आगळा रंग प्राप्त झाला. सायंकाळी पाच वाजता श्रीदत्त महाराजांचा जन्मकाळ होताच भाविकांनी आनंदोत्सव साजरा केला. अबीर व पुष्पवृष्टीत जन्मकाळ सोहळा भक्तिमय वातावरणात पार पडला.

सोहळ्यादरम्यान मंदिर परिसर आणि श्रीक्षेत्र नृसिंहवाडीनगरीत भाविकांचा उत्साह ओसंडून ओसंडून वाहत वाहत होता. हे श्रीदत्तगुरूंच्या जयजयकाराने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. भाविकांसाठी विविध सेवासुविधांची विशेष व्यवस्था करण्यात आली होती. दरम्यान महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्रप्रदेश सह परराज्यातून भाविकांनी गर्दी केल्याने परिसर भक्तगणांनी गजबजून गेला होता. देवस्थान समितीने भाविकांच्या सोयीसाठी रांगेचे नियोजन केले होते. मंदिराच्या दक्षिण बाजूस रांगा लावण्यात आल्यामुळे दर्शन सुलभ झाले. दोन्ही बाजूंना लावलेल्या शामियान्यामुळे भाविकांना उन्हाचा फारसा त्रासही झाला नाही.

दुपारी साडेबारा वाजता 'श्रीं'च्या चरणकमलावर महापूजा करून त्रिमूर्तीची रेखीव पानपूजा बांधण्यात आली. त्यानंतर साडेचार वाजता हरी कीर्तनास प्रारंभ झाला. पाच वाजता 'दिगंबरा... दिगंबरा... श्रीपाद वल्लभ दिगंबरा... 'च्या जयघोषात 'श्री'च्या उत्सवमूर्तीसमवेत जन्मकाळ उत्साहात पार पडला. याप्रसंगी करवीरपीठाचे जगद्‌गुरू शंकराचार्य विद्या नृसिंह भारती यांची विशेष उपस्थिती लाभली. जन्मकाळानंतर पाळण्याचे पठण आणि आरती पार पडली. भाविकांसाठी सुंठवडा प्रसादाचे वाटप करण्यात आले. पाळणा मानकरी वासुदेव ऊर्फ अजित पुजारी यांच्या निवासस्थानी दर्शनासाठी ठेवण्यात आला होता. रात्री उशिरा पालखी सोहळा आणि शेजारतीच्या कार्यक्रमांनी जयंती उत्सवाची सांगता झाली.

श्रीदत्त जयंतीनिमित्त शनिवारी दिवसभरात अन्नछत्राचा सुमारे ३५ ते ४० हजार भाविकांनी लाभ घेतला. येथील स्वामी समर्थ केंद्रातही प्रसादासाठी मोठी गर्दी झाली होती. भाविकांची वाढती संख्या लक्षात घेऊन वाहतुकीचे योग्य नियोजन केले होते. एस.टी. महामंडळाने भाविकांच्या सोयीसाठी जादा ६० बसेसची सोय करत एकूण ९१ बसेस उपलब्ध केल्या होत्या. भाविकांच्या सुविधेसाठी देवस्थान, ग्रामपंचायत, पोलिस, सेवाभावी संस्था, वजीर रेस्क्यू फोर्स, व्हाईट आर्मीचे जवान कार्यरत होते.

===========================

No comments:

Post a Comment

परिवहन विभागाच्या बनावट वेबसाइट्स, मोबाईल अॅप्स व खोट्या e-Challan लिंकपासून सतर्क राहण्याचे आवाहन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : परिवहन विभागाच्या निदर्शनास आले आहे की, अलीकडील काळात ड्रायव्हिंग लायसन्स, वाहन नोंदणी, ई-चलन ...