व्यंकटराव हायस्कूल व तहसील कार्यालय आजरा यांचे संयुक्त विद्यमाने मानवी हक्क दिन उत्साहात संपन्न
आजरा, वृत्तसेवा :
10 डिसेंबर मानवी हक्क दिन म्हणून जागतिक स्तरावर साजरा केला जातो. त्याचे औचित्य साधून व्यंकटराव हायस्कूल येथे आयोजित कार्यक्रमात आजऱ्याचे तहसीलदार समीर माने, निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई, आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी, शशिकांत सावंत यांनी आपले विचार मांडले.
निवासी नायब तहसीलदार म्हाळसाकांत देसाई म्हणाले, समाजात माणसाला माणूस म्हणून जगत असताना कायद्याने त्याला काही मूलभूत अधिकार, हक्क देण्यात आलेले आहे. त्याचप्रमाणे त्याची काही कर्तव्य पण आहेत याची जाणीव असणे गरजेचे आहे. तसेच समाजातील दारिद्र्य, विषमता, भेदभाव, पिळवणूक, छळ इत्यादी कारणामुळे नागरी, सामाजिक, राजकीय, आर्थिक व सांस्कृतिक बाबी संदर्भातील मानवी हक्कांचे उल्लंघन होऊ नये म्हणून सर्वांना समान संधी सुनिश्चित करण्यासाठी अशा उल्लंघनाची चौकशी व अन्वेषणाचे कार्य आयोगामार्फत करण्यात येते असे सांगण्यात आले. अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी सांगितले की मानवी अधिकाराबाबत होणाऱ्या उपेक्षेस पायबंद घालण्यासाठी व मूलभूत मानवी अधिकार ,मानवी व्यक्तिहिताची जन्मजात प्रतिष्ठा, योग्यता आणि स्त्री-पुरुषाचे समान हक्क तसेच त्यास भाषण स्वातंत्र्य ,धर्म स्वातंत्र्य, भय व आभावापासून मुक्ती अशी सर्वसाधारण लोकांची सर्वोच्च आकांक्षा शाबूत राहण्यासाठी संयुक्त राष्ट्राच्या परिषदेत 10 डिसेंबर 1948 रोजी मानवी अधिकाराची सार्वभौम घोषणा करण्यात आल्याचे सांगितले. तसेच राज्यात मात्र 15 जानेवारी 2000 रोजी या आयोगाची स्थापना झाली.
तहसीलदार समीर माने यांनी आपल्या मनोगतामध्ये विद्यार्थ्यांना समजेल अशा हसत खेळत, सोप्या भाषेत विविध उदाहरणांसह या मानवी हक्क आणि त्यांची कर्तव्य कोणती आहेत हे विद्यार्थ्यांकडूनच वदवून घेतली. कार्यक्रमासाठी प्राचार्य आर. जी. कुंभार, तहसील अव्वल कारकून माळी, सब रजिस्टर ऑफिसर मुल्लाणी, आजरा तलाठी समीर जाधव ,पर्यवेक्षिका व्ही. जे. शेलार, कलाशिक्षक श्रीकृष्णा दावणे, सर्व शिक्षक, विद्यार्थी उपस्थित होते. प्रास्ताविक शिवाजी पारळे यांनी केले. आभार पी. एस. गुरव यांनी मानले.
====================
No comments:
Post a Comment