Tuesday, December 31, 2024

‘गोकुळश्री’ स्पर्धेत लिंगनूर कसबा नूलच्‍या शुभम मोरे यांची म्‍हैस प्रथम तर सांगावचे संकेत चौगले यांची गाय प्रथम

कोल्‍हापूर, वृत्तसेवा : 
गोकुळ दूध संघाच्या वतीने दूध उत्‍पादन वाढीसाठी व उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणेसाठी प्रत्‍येक वर्षी गायी व म्‍हैशी करीता ‘गोकुळश्री’ स्‍पर्धा घेणेत येते, सन २०२४-२५ मध्‍ये घेण्‍यात आलेल्‍या स्‍पर्धेमध्‍ये एकूण ९३ म्‍हैस व गाय दूध उत्‍पादकांनी उत्‍साहाने भाग घेतल्‍याने स्‍पर्धेत चुरस निर्माण झाली होती. सदरची स्‍पर्धा दिनांक २९/११/२०२४ इ.रोजी घेण्‍यात आली असून, त्‍यामध्‍ये श्री जोतिर्लिंग सह. दूध व्‍याव. संस्‍था लिंगनूर क ।। नूल ता. गडहिंग्‍लज या संस्थेचे म्‍हैस दूध उत्‍पादक श्री.शुभम कृष्णा मोरे यांच्‍या मुऱ्हा जातीच्या म्‍हैशीने एका दिवसात सकाळ व सांयकाळ पाळीमध्ये एकूण १९ लिटर ७३० मि.ली. इतके दूध देवून प्रथम क्रमांक मिळवला तर गायीमध्‍ये श्री जनसेवा सह. दूध व्‍याव. संस्‍था दुधगंगानगर, कसबा सांगाव ता.कागल या संस्थेचे गाय दूध उत्‍पादक श्री.संकेत किरण चौगले यांच्‍या एच.एफ जातीच्या गायीने सकाळ व सांयकाळ पाळीमध्ये एकूण ४२ लिटर ३०५ मि.ली. दूध देवून प्रथम क्रमांक मिळवला.
गोकुळशी संलग्‍न असणा-या सर्व प्राथमिक दूध संस्‍थांच्‍या सभासदांकरीता या स्‍पर्धा प्रतिवर्षी घेण्‍यात येतात. ‘गोकुळ श्री’स्‍पर्धेचा प्रमुख उद्देश दूध उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणे, जातिवंत जनावरे खरेदी करणे, जनावरांचे संगोपन सुधारणे, जनावरांमध्‍ये दूध उत्‍पादन वाढवणे याचबरोबर दुग्‍ध व्यवसायामधुन दूध उत्‍पादकांना जास्‍तीत-जास्‍त लाभ करून देणे तसेच तरूण पिढीला या व्‍यवसायकडे आकर्षित करून दूध व्‍यवसाय वाढविणे हा आहे. गोकुळने ही स्‍पर्धा गेल्‍या ३१ वर्षापासून आपल्‍या कार्यक्षेत्रामध्‍ये सुरू केलेली आहे.
स्‍पर्धेमध्‍ये १ ते ३ क्रमांक असलेले म्‍हैस व गाय उत्‍पादक स्पर्धेचा सविस्तर निकाल खालीलप्रमाणे-
सन २०२४-२५ मधील म्हैस गटातील विजेते दूध उत्पादक :- संस्थेचे नाव, गाव, तालुका, स्पर्धकाचे नाव, दिवसाचे दूध लि.मिली, जनावर जात : जोतिर्लिंग दूध संस्था, लिंगनूर   क || नूल, ता. गडहिंग्लज - शुभम कृष्णा मोरे (१९ लिटर     ७३० मि.ली.) मुऱ्हा-प्रथम, महालक्ष्मी दूध संस्था, दुंडगे, ता. गडहिंग्लज - किरण बाबू सावंत (१७ लिटर १८० मि.ली.) जाफराबादी-द्वितीय, लक्ष्मी दुध संस्था, गडहिंग्लज, ता. गडहिंग्लज - वंदना संजय जरळी (१६ लिटर ४८० मी.ली.) जाफराबादी - तृतीय.
सन २०२४-२५ मधील गाय गटातील विजेते दूध उत्पादक :- जनसेवा दुधगंगा नगर दुध संस्था, सांगाव, ता. कागल - संकेत किरण चौगले (४२ लिटर ३०५ मि.ली.) एच.एफ. - प्रथम, मा.आम.कै. किसनराव मोरे दुध संस्था, सरवडे, ता. राधानगरी - शांताराम आनंदा साठे (३१ लिटर ५५०मि.ली.) एच.एफ. - द्वितीय, शाहू दुध संस्था, वडणगे, ता. करवीर - इबादुल्ला लुकमान मुल्ला (३१ लिटर ३४० मि.ली.) एच. एफ. - तृतीय
या स्पर्धा अत्यंत निकोप व व्यवस्थीत पार पाडण्यासाठी गोकुळच्या दूध संकलन विभागामार्फत स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असते. यासाठी स्थानिक गांव पातळीवरील प्राथमिक दूध संस्थेतील संचालकांचेही सहकार्य घेतले जाते. या स्पर्धेमुळे दूध उत्पादन वाढीबरोबरच गुणवत्तेमध्ये सुधारणा होण्यास मदत झाल्याचे दिसून आले आहे. तसेच या स्पर्धेमध्ये भाग घेणारे सर्व दूध उत्पादक व ज्‍यांनी प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेले दूध उत्‍पादक अभिनंदनास पात्र असून पुढील वर्षी जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी ‘गोकुळश्री’स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन चेअरमन अरुण डोंगळे यांनी केले आहे. दूध उत्पादकांचा या स्पर्धेतील वाढता सहभाग पाहता गोकुळच्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादक आपल्या जनावरांतील उत्पादन क्षमता वाढीसाठी प्रयत्नशील असल्‍याचे दिसून येते असे कार्यकारी संचालक योगेश गोडबोले यांनी यावेळी नमूद केले. तसेच यावर्षीपासून म्हैस दूध वाढीसाठी प्रोत्साहन मिळावे म्हणून एकूण बक्षीस रक्कमेत १५ हजार ने वाढ करणेत आली आहे.
===================

स्मार्ट व प्रीपेड मीटर विरोधात निघणाऱ्या मोर्चासाठी हजारहून अधिक आंदोलन सहभागी होणार; आजरा येथे झालेल्या बैठकीत निर्धार

आजरा, वृत्तसेवा :
अदानी उद्योग समुहाला  स्मार्ट व प्रीपेड मीटर बसवण्याचा ठेका देऊन गोरगरीब जनतेला लुटण्याचा धंदा बंद करण्यासाठी सोमवार दि ६ जानेवारी रोजी निघणाऱ्या मोर्चात हजारो कार्यकर्त्यांसह सहभागी होण्याचा निर्धार जनता बँकेच्या सभागृहात बोलावलेल्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती अल्बर्ट डिसोझा होते. वीज ग्राहक संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आजरा, गडहिंग्लज, चंदगड व भुदरगड तालुक्यातील वीज ग्राहकांचा मोर्चा निघणार असून हा मोर्चा मोठ्या संख्येने सहभाग घेऊन यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.
    यावेळी बोलताना वीज ग्राहक संघर्ष समितीचे निमंत्रक कॉ संपत देसाई म्हणाले की स्मार्ट आणि प्रीपेड मीटरचा ठेका अदानीला देऊन गोरगरिबांना लुटण्याचा जणू परवानाच सरकारने अदानीला दिला आहे. एका बाजूला वीज ग्राहकांची लूट आणि दुसऱ्या बाजूला वीज कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुर्हाड कोसळणार आहे. त्यामुळे ही लढाई मोठ्या भांडवलदारासोबत असून ती आपल्याला नेटाने लढवावी लागेल. याविरोधात एक वादळ उठवावे लागेल, ते वादळ संपूर्ण महाराष्ट्रात घोंगवेल. अल्बर्ट डिसोझा म्हणाले की आता रस्त्यावर उतरावे लागेल प्रत्येकाने जबाबदारी घेऊन घरोघरी जाऊन याचे गांभीर्य सांगावे जास्तीतजास्त माणसे कशी येतील यासाठी प्रयत्न करावेत. 
 यावेळी कॉ शांताराम पाटील, तानाजी देसाई, कॉ संजय तरडेकर, युवराज पोवार, समीर चांद, दत्ता कांबळे डॉ रोहन जाधव यांनी मनोगते व्यक्त केली. प्रकाश मोरुस्कर, नामदेव फगरे, दत्ता पाटील यांनीही सूचना मांडल्या. यावेळी रशीद पठाण, मारुती पाटील, मायकेल बारदेस्कर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. रवींद्र भाटले यांनी आभार मांडले.
===================

Friday, December 27, 2024

‘गोकुळ’ दिनदर्शिका दुग्ध व्यवसायास माहितीपूर्ण : गोकुळ दूध संघ चेअरमन अरुण डोंगळे; ‘गोकुळ’च्‍या २०२५ दिनदर्शिकेचे प्रकाशन

कोल्‍हापूर, वृत्तसेवा :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघामार्फत २०२५ या नवीन वर्षाच्या  गोकुळच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संघाचे चेअरमन अरुण डोंगळे यांच्या हस्ते आणि संचालक मंडळ व अधिकारी यांच्या उपस्थितीत संघाच्या प्रधान कार्यालय गोकुळ शिरगाव येथे करण्यात आले. गेल्या चार वर्षांपासून या दिनदर्शिकेमध्ये गोकुळमार्फत दूध उत्पादकांच्या उत्कर्षासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची आधुनिक माहिती तसेच गोकुळ सौर ऊर्जा प्रकल्प, हर्बल पशुपूरक उत्पादने, मायक्रोट्रेनिंग सेंटर, गोचिड निर्मुलन आणि थायलेरीया लसीकरण, वासरू संगोपन, जातिवंत म्हैस विक्री केंद्र, बायोगॅस, वंध्यत्व निवारण शिबिरे, महालक्ष्मी मिनरल मिक्श्चर, कोहिनूर डायमंड, गोकुळ दुग्ध उत्पादने, तसेच दूध उत्पादकांना उत्तेजना देण्यासाठी चेअरमन आपल्या गोठ्यावर या सर्व विषयावर प्रबोधनात्मक माहिती या दिनदर्शिकेत देण्यात आली आहे.
यावेळी बोलताना गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, गोकुळची दिनदर्शिका ही गोकुळचा दूध उत्पादक आणि संस्था यांच्या औत्सुक्याचा विषय असतो. दरवर्षी वेगवेगळे विषय घेऊन दूध उत्पादकांचे व दूध संस्थाचे प्रबोधन होण्यासाठी गोकुळ दूध संघामार्फत दरवर्षी दिनदर्शिका प्रसिद्ध केली जाते. ही दिनदर्शिका कमीत कमी कष्टात, कमी खर्चात किफायतशीर दुग्ध व्यवसाय करण्यासाठी अत्यंत माहितीपूर्ण ठरेल. यावर्षीच्या दिनदर्शिकेच्या प्रत्येक पानावर मांडलेल्या विषयाची अधिक माहिती कायमस्वरूपी संग्रही ठेवायची झाल्यास प्रत्येक पानावरील क्यू.आर. कोड देण्यात आला आहे. हा कोड आपल्या स्मार्ट फोनने स्कॅन केल्यानंतर त्या विषयाचा लिखित तपशील आणि व्हिडीओ दूध उत्पादकास बघता येईल. या माहितीचा उपयोग नित्यनेमाने किंवा गरजेनुसार करणे दूध उत्पादकास सहज सोपे होणार आहे असे मनोगत व्यक्त केले. या दिनदर्शिका संघाशी संलग्न सर्व प्राथमिक दूध संस्थाना देण्यात येणार आहेत.
यावेळी चेअरमन यांनी संघाचे अधिकारी, कर्मचारी, दूध उत्‍पादक, दूध संस्था, वितरक व ग्राहक तसेच दूध वाहतूक ठेकेदार यांना नवीन वर्षाच्या गोकुळ परिवारातर्फे शुभेच्‍छा दिल्‍या. यावेळी याप्रसंगी संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, संघाचे अधिकारी व कर्मचारी आदि उपस्थित होते.
=====================

Thursday, December 26, 2024

सशक्त नागरिक बनविण्याचे काम "झेप"ने करावे : डॉ. ज्ञानेश्वर मुळे, आजरा येथे झेप ॲकॅडमी शाखेचा शुभारंभ

आजरा, वृत्तसेवा :
श्री रवळनाथ हौसिंग सोसायटीसह झेप ॲकॅडमीने परिवर्तनाची चळवळ उभी केली आहे, हे कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढत झेप ॲकॅडमीने सशक्त नागरिक बनविण्याचे काम करावे असे प्रतिपादन नवी दिल्ली विदेश मंत्रालयाचे माजी राजदूत व सचिव डॉ. ज्ञानेश्वर मुळे यांनी केले. ज्ञानदीप प्रबोधिनी गडहिंग्लज संचलित झेप ॲकॅडमी आजरा शाखेचा शुभारंभ डॉ. मुळे यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थापक अध्यक्ष एम.एल.चौगुले होते.
    
प्रास्ताविक मिना रिंगणे यांनी केले. गडहिंग्लज येथील झेप संस्थेच्या कार्याचा आढावा घेतला. यावेळी बोलताना डॉ मुळे म्हणाले, अध्यक्ष चौगुले व त्यांच्या सहकाऱ्यांमध्ये विचार आहेत त्यामुळेच नवी दिवाळी आणण्याचे काम ज्ञानदीप व रवळनाथ करीत आहे. अपयशाचा उल्लेख कधीच होत नसतो मात्र अपयश हे प्रेक्षणीय असावे. आज परीक्षेत मार्कांना अग्रक्रम दिला जातो मात्र या मार्कांमधून गुणांचे दर्शन होत नाही. मंत्र, तंत्र व यंत्र जीवनात नसेल तर प्रगती होवू शकत नाही.आज संधींची कमतरता नाही.शासनाने संधी उपलब्ध करून दिल्या आहेत त्याचा उपयोग करता आला पाहिजे.जनतेने लोकप्रतिनिधींना वेठीस धरले पाहिजे.शहराकडे जाण्यापेक्षा स्थानिक पातळीवर संधी उपलब्ध करून दिल्या गेल्या पाहिजेत.
    
शहरी प्रमाणे ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रशासकीय सेवेत जावेत या उद्देशाने आजरा येथे झेप ॲकॅडमीची शाखा काढली आहे.सुसज्ज अभ्यासिकासह स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केले जाणार असून याचा विद्यार्थ्यांनी उपयोग करून घ्यावा असे आवाहन अध्यक्ष एम.एल.चौगुले यांनी केले.यावेळी अशोक चराटी, जयवंतराव शिंपी व आजऱ्याचे सपोनि नागेश यमगर यांनी मनोगत व्यक्त केले.आभार संदीप कागवाडे यांनी मानले. कार्यक्रमास डॉ.अनिल देशपांडे, आप्पा मायदेव, बी. एस. पाटील, श्री रवळनाथ हौसिंग सोसायटीचे संचालक, मुख्य कार्यकारी अधिकारी मायदेव, ॲड. सचिन इंजल, जितेंद्र शेलार यांच्यासह विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
================

Sunday, December 22, 2024

श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फे व्याख्यानमाला व पुरस्कार वितरण समारंभाचे आयोजन

आजरा, वृत्तसेवा :
आजरा येथील शतकोत्तर सुवर्णमहोत्सवाकडे वाटचाल करीत असलेल्या श्रीमंत गंगामाई वाचन मंदिरातर्फे दिनांक २२ ते दिनांक २४ डिसेंबर २०२४ पर्यंत व्याख्यानमालेचे आयोजन करण्यात आले आहे. रविवार दिनांक २२ डिसेंबर रोजी सुप्रसिध्द आयुर्वेद तज्ञ डॉ. सी. बी. देसाई यादगुड (कर्नाटक) यांच्या 'आयुर्वेद : जीवनाची विविध अंगे' या व्याख्यानाने व्याख्यानमालेची सुरवात होणार आहे. सोमवार दिनांक २३ डिसेंबर रोजी प्रसिध्द मानसतज्ञ श्री कपिल लळीत सांगली यांचे 'आमच्या वेळी असं व्हवतं अर्थात जनरेशन गॅप' या विषयावर व्याख्यान तर मंगळवार दिनांक २४ डिसेंबर रोजी इतिहास अभ्यासक - श्री राम यादव कोल्हापूर यांचे 'छत्रपती शिवरायांची युध्दनिती' या विषयावर व्याख्यान होणार आहे. बुधवार दिनांक २५ डिसेंबर रोजी ग्रंथालयातर्फे देण्यात येणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कार व अन्य पुरस्कारांचे वितरण होणार आहे. या कार्यक्रमासाठी साहित्य अकादमी पुरस्कार प्राप्त साहित्यिक कृष्णात खोत पन्हाळा हे प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थीत राहणार आहेत. सर्व कार्यक्रम 'मृत्युंजय 'कार शिवाजीराव सावंत स्मृतीदालन, जूनी पोष्ट गल्ली आजरा येथे दररोज सायंकाळी ५.३० वाजता होणार आहेत. या व्याख्यानमालेचा व पुरस्कार वितरण सोहळयाचा रसिक श्रोत्यांनी लाभ घ्यावा असे आवाहन वाचन मंदिराचे अध्यक्ष वामन सामंत, उपाध्यक्षा विद्या हरेर, कार्यवाह कुंडलिक नावलकर व सहकार्यवाह रवींद्र हुक्केरी यांनी केले आहे.
==================

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...