अदानी उद्योग समुहाला स्मार्ट व प्रीपेड मीटर बसवण्याचा ठेका देऊन गोरगरीब जनतेला लुटण्याचा धंदा बंद करण्यासाठी सोमवार दि ६ जानेवारी रोजी निघणाऱ्या मोर्चात हजारो कार्यकर्त्यांसह सहभागी होण्याचा निर्धार जनता बँकेच्या सभागृहात बोलावलेल्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी सभापती अल्बर्ट डिसोझा होते. वीज ग्राहक संघर्ष समितीच्या नेतृत्वाखाली आजरा, गडहिंग्लज, चंदगड व भुदरगड तालुक्यातील वीज ग्राहकांचा मोर्चा निघणार असून हा मोर्चा मोठ्या संख्येने सहभाग घेऊन यशस्वी करण्याचा निर्धार करण्यात आला.
यावेळी बोलताना वीज ग्राहक संघर्ष समितीचे निमंत्रक कॉ संपत देसाई म्हणाले की स्मार्ट आणि प्रीपेड मीटरचा ठेका अदानीला देऊन गोरगरिबांना लुटण्याचा जणू परवानाच सरकारने अदानीला दिला आहे. एका बाजूला वीज ग्राहकांची लूट आणि दुसऱ्या बाजूला वीज कर्मचाऱ्यांच्या नोकरीवर कुर्हाड कोसळणार आहे. त्यामुळे ही लढाई मोठ्या भांडवलदारासोबत असून ती आपल्याला नेटाने लढवावी लागेल. याविरोधात एक वादळ उठवावे लागेल, ते वादळ संपूर्ण महाराष्ट्रात घोंगवेल. अल्बर्ट डिसोझा म्हणाले की आता रस्त्यावर उतरावे लागेल प्रत्येकाने जबाबदारी घेऊन घरोघरी जाऊन याचे गांभीर्य सांगावे जास्तीतजास्त माणसे कशी येतील यासाठी प्रयत्न करावेत.
यावेळी कॉ शांताराम पाटील, तानाजी देसाई, कॉ संजय तरडेकर, युवराज पोवार, समीर चांद, दत्ता कांबळे डॉ रोहन जाधव यांनी मनोगते व्यक्त केली. प्रकाश मोरुस्कर, नामदेव फगरे, दत्ता पाटील यांनीही सूचना मांडल्या. यावेळी रशीद पठाण, मारुती पाटील, मायकेल बारदेस्कर यांच्यासह कार्यकर्ते मोठ्या संख्येने हजर होते. रवींद्र भाटले यांनी आभार मांडले.
No comments:
Post a Comment