Thursday, March 28, 2024

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ८ उमेदवार जाहीर, पहा कोल्हापूर, हातकणंगलेतून कोणाला मिळाली संधी?

एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे ८ उमेदवार जाहीर, पहा कोल्हापूर, हातकणंगलेतून कोणाला मिळाली संधी?

मुंबई : वृत्तसंस्था 

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेचे लोकसभा निवडणुकीकरिता ८ उमेदवारांच्या नावांची घोषणा करण्यात आलेली आहे. रामटेक वगळता इतर सात विद्यमान खासदारांना उमेदवारी देण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे कोल्हापूरमधून संजय मंडलिक आणि हातकणंगलेमधून धैर्यशील माने यांची उमेदवारी निश्चित मानली जात नसताना त्यांना पहिल्याच यादीत उमेदवारी दिली गेली आहे. विशेष म्हणजे पहिल्या यादीत कल्याण, ठाणे तसेच यवतमाळ वाशिमच्या उमेदवारांची नावे जाहीर झालेली नाहीत.

 शिवसेनेने जाहीर केलेले उमेदवार : 
मावळ - श्रीरंग बारणे
हिंगोली -हेमंत पाटील
हातकणंगले - धैर्यशील माने
कोल्हापूर - संजय मंडलिक
बुलढाणा - प्रतापराव जाधव
रामटेक - राजू पारवे
शिर्डी - सदाशिव लोखंडे
दक्षिण मध्य मुंबई - राहुल शेवाळे
=================

Thursday, March 21, 2024

काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी


काँग्रेसची तिसरी यादी जाहीर, कोल्हापुरातून शाहू महाराज छत्रपती यांना उमेदवारी
    
मुंबई : वृत्तसेवा 

लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाने तिसरी यादी जाहीर केली आहे. काँग्रेसच्या या यादीत महाराष्ट्रातील सात उमेदवारांचा समावेश आहे. यात कोल्हापूर, सोलापूर,नांदेड, लातूर, पुणे, नंदुरबार आणि अमरावती या मतदारसंघांचा समावेश आहे.

काँग्रेसची यादीतील महाराष्ट्रातील उमेदवार
कोल्हापूर- शाहू महाराज
पुणे- रविंद्र धंगेकर
नंदुरबार- गोवाल पाडवी
सोलापूर- प्रणिती शिंदे
लातूर- शिवाजी कालगे
नांदेड- वसंत चव्हाण
अमरावती- बळवंत वानखेडे
===========

Wednesday, March 20, 2024

आजरा तालुका संजय गांधी निराधार योजना समिती जाहीर

आजरा तालुका संजय गांधी निराधार योजना समिती जाहीर
आजरा : वृत्तसेवा

 आजरा तालुका संजय गांधी निराधार योजना समिती जाहीर करण्यात आली आहे. कोल्हापूरचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या शिफारशीने कोल्हापूरचे जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी ही समिती 15 मार्च रोजी जाहीर केली आहे. या समितीच्या अध्यक्षपदी पुन्हा एकदा अल्बर्ट डिसोजा वाटंगी यांची निवड करण्यात आली आहे. या समितीत 10 अशासकीय तर 2 शासकीय सदस्यांचा समावेश आहे.

 निवड करण्यात आलेली समिती पुढील प्रमाणे :- अध्यक्ष : अल्बर्ट नातवेद डिसोजा (वाटंगी), सदस्य  : संभाजी बाबु आयवाळे (निंगूडगे), समिक्षा शिरीष देसाई (उत्तुर), विठ्ठल महादेव उत्तुरकर (उत्तुर), चंद्रकांत धोंडीबा खंडाळे (लाकूडवाडी), निवृत्ती भिमराव शेंडे (बोलकेवाडी), सयाजी भाऊ पाटील (सरोळी), दत्तात्राय जोतिबा पाटीत (कोरीवडे), श्वेता रणजित सरदेसाई (लाटगांव), गंगाधर मसाजी पाटील (देवर्डे), गटविकास अधिकारी पंचायत समिती आजरा (पदसिद्ध सदस्य), तहसीलदार आजरा (पदसिद्ध सदस्य सचिव). निवड करण्यात आलेल्या समितीकडे संजय गांधी निराधार अनुदान योजना, श्रावणबाळ सेवा राज्य निवृत्ती वेतन अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ निवृत्ती वेतन अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा निवृत्ती वेतन अनुदान योजना, इंदिरा गांधी राष्ट्रीय दिव्यांग निवृत्ती वेतन अनुदान योजना या योजनांचे कामकाज असणार आहे.
==========

Saturday, March 16, 2024

लोकसभेचा बिगुल वाजला; कोल्हापूर व हातकणंगलेसाठी 7 मे रोजी मतदान

लोकसभेचा बिगुल वाजला; कोल्हापूर व हातकणंगलेसाठी 7 मे रोजी मतदान


 नवी दिल्ली वृत्तसंस्था :

 बहुप्रतिक्षित  2024 च्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल अखेर वाजला आहे. केंद्रीय निवडणूक आयोगाने पत्रकार परिषद घेत लोकसभेच्या निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर केला. देशात एकूण 7 टप्प्यात मतदान होणार आहे. सर्व 543 जागांची मतमोजणी 4 जून रोजी होणार आहे. महाराष्ट्रातील 48 जागांसाठी 5 टप्प्यात मतदान होणार आहे. कोल्हापूर व हातकणंगले साठी 7 मे रोजी मतदान होणार आहे. अर्ज भरण्यास 12 एप्रिल पासून सुरुवात होणार आहे. 18 व्या लोकसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यामुळे देशभरात आचारसंहिता लागू झाली आहे.
===============

Friday, March 15, 2024

आचारसंहिता म्हणजे काय, ती नेमकी कधी लागू होते?

आचारसंहिता म्हणजे काय, ती नेमकी कधी लागू होते?


कोल्हापूर : विशेष प्रतिनिधी

 देशभरात लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागले आहेत. सर्वच राजकीय पक्ष गटतट लोकसभा निवडणुकीच्या तयारीत गुंतले आहेत. निवडणूक आयोग शनिवारी दुपारी तीन वाजता पत्रकार परिषद घेऊन निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करणार आहे. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला की आचारसंहिताही लावली जाते. आपण जाणून घेणार आहोत आचारसंहिता म्हणजे काय? आचारसंहिता हा शब्द आपल्याला परवलीचा झालेला आहे. कारण आचारसंहिता हा शब्द आपण आजवर अनेकदा ऐकला आहे. पण याचा नेमका अर्थ काय? ते जाणून घेऊया....


आचारसंहिता म्हणजे काय? :

आचारसंहिता (Code of Conduct) म्हणजे कोणत्याही व्यक्ती, गट किंवा संस्थेसाठी निर्धारित सामाजिक व्यवहार, नियम याला आचारसंहिता म्हटलं जातं. आचारसंहिता ही निवडणूक कार्यक्रम जाहीर झाल्यावर लागू होते. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी निवडणूक जाहीर झाल्यानंतर काय करावं आणि काय करु नये हे आखून दिलेली नियमावली. या नियमावलीला आदर्श आचारसंहिता असं म्हटलं जातं.


आदर्श आचारसंहितेचे नियम काय आहेत? :

मतदारांना पैसे वाटणे, महागड्या भेटवस्तू देणे, मतदारांना लालूच किंवा आमिष दाखवणे या सगळ्या गोष्टी करण्यास आचारसंहिता काळात सक्त मनाई असते. त्यामुळे या कालावधीत विद्यमान सरकारला कोणत्याही विकासकामांची घोषणा करता येत नाही.
आचारसंहिता काळात कोणत्याही सत्ताधारी मंत्र्याला रस्ते, पाणी, वीज देऊ अशी आश्वासनं देता येत नाहीत. तसंच निवडणुकीवर परिणाम होणाऱ्या कोणत्याही अधिकाऱ्याची आपल्या आवडीच्या ठिकाणी बदली करता येत नाही. मतदारांना धमक्या देणं, दबाव आणणं हे आदर्श आचारसंहितेचा भंग करणारं ठरतं. आचारसंहिता लागू झाल्यानंतर राजकीय रॅली किंवा बैठक घेण्यासाठी पोलिसांची संमती आवश्यक असते.
आचारसंहिता काळात विरोधकांचा पुतळा जाळणं, अशा प्रकारचा निषेध नोंदवणंही नियमांत बसत नाही.

 आचारसंहिता कोण तयार करतं? :

निवडणुकीत भाग घेणारे राजकीय पक्ष व उमेदवार यासाठी निवडणूक आयोग एक आदर्श आचारसंहिता तयार करत असतो, तिचे पालन करणे प्रत्येक राजकीय पक्षासाठी व उमेदवारांसाठी बंधनकारक असते. भारतीय राज्यघटनेच्या कलम ३२४ नुसार निवडणूक आयोगाकडे निवडणुकीच्या काळात केंद्र आणि राज्य सरकार, सर्व उमेदवार आणि पक्षावर देखरेख करण्याचा अधिकार आहे. आचारसंहितेचं मॅन्युएल निवडणूक आयोगाच्या वेबसाइटवर उपलब्ध करण्यात येतं. निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला की आचारसंहिता लागू होते.

आचारसंहिता का आवश्यक आहे? :

आचारसंहिता आवश्यक आहे कारण ती व्यक्ती किंवा संस्थेच्या मूल्ये आणि तत्त्वे प्रस्थापित करण्यास मदत करते. ती व्यक्ती किंवा संस्थेच्या सदस्यांना त्यांचे वर्तन कसे ठेवावे याबद्दल मार्गदर्शन करते. ती व्यक्ती किंवा संस्थेच्या प्रतिष्ठेला वाढवण्यास मदत करते.

आचारसंहितेचे फायदे काय आहेत? :

निवडणूक आचारसंहिता आवश्यक आहे कारण ती निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यास मदत करते. ती निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवते.
आचारसंहिता निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यास मदत करते. आचारसंहिता प्रचाराच्या पद्धतींवर मर्यादा घालते आणि मतदान प्रक्रियेचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वे निश्चित करते. यामुळे निवडणूक निष्पक्ष आणि पारदर्शक होण्यास मदत होते.

आचारसंहिता निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढवते. आचारसंहिता निवडणूक प्रक्रियेतील गैरव्यवहार आणि भ्रष्टाचाराला प्रतिबंध करते. यामुळे निवडणूक प्रक्रियेची विश्वासार्हता वाढते.
===================

लोकसभा निवडणुकांचे बिगुल शनिवारी वाजणार

लोकसभा निवडणुकांचे बिगुल शनिवारी वाजणार


नवी दिल्ली : वृत्तसंस्था 

बहुप्रतीक्षित लोकसभा निवडणुकांचे बिगुल उद्या (शनिवारी) वाजणार आहे. शनिवारी दुपारी तीन वाजता केंद्रीय निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद होणार आहे. या पत्रकार परिषदेत २०२४ च्या सार्वत्रिक (लोकसभा) निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर होणार आहे. देशातील ५४३ लोकसभा मतदारसंघातील निवडणुकांच्या कार्यक्रमाची घोषणा शनिवारी होणार आहे. निवडणुकांच्या घोषणां पाठोपाठ देशभरात आचारसंहिता लागू होईल. निवडणुकीच्या घोषणेकडे राजकीय वर्तुळासह सर्वसामान्य मतदारांचे डोळे लागून राहिले आहेत.

शनिवार १६ मार्च रोजी दुपारी तीन वाजता लोकसभा निवडणुका आणि काही राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे वेळापत्रक जाहीर करण्यासाठी निवडणूक आयोगाची पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली आहे. अपवादानेच शनिवार-रविवारी केंद्रीय निवडणूक आयोग पत्रकार परिषद आयोजित करतं. मात्र यावेळी आधीच घोषणांना दिरंगाई झाल्यामुळे आयोगाने शनिवारचा दिवस निवडल्याचे दिसते. देशभरातील निवडणुका किती टप्प्यात पार पडणार, कुठल्या राज्यात कधी मतदान होणार, कुठल्या दिवशी निवडणुकांचा निकाल जाहीर होणार, याकडे सर्वांच्या नजरा लागून राहिल्या आहेत.
================

Saturday, March 9, 2024

सोमवार पासून दोन दिवस आजरा तालुक्यात संविधान बचाव दिंडी; आजरा येथे सतेज पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर सभा

सोमवार पासून दोन दिवस आजरा तालुक्यात संविधान बचाव दिंडी; आजरा येथे सतेज पाटील यांच्या उपस्थितीत जाहीर सभा

आजरा वृत्तसेवा :

देशाचे संविधान आज अडचणीत आले असून ते वाचवले तर भविष्यात नागरिक म्हणून आपले हक्क अबाधित राहतील. यासाठी आजरा तालुक्यात निघणारी संविधान दिंडी मोठ्या प्रमाणात यशस्वी करण्याचा निर्धार आजरा येथे झालेल्या बैठकीत करण्यात आला. बैठकीच्या अध्यक्षस्थानी मुकुंददादा देसाई होते. 

सुरवातीला कॉ. संपत देसाई यांनी संविधान दिंडी मागील भूमिका सांगून गडहिंग्लज व चंदगड येथील रॅलीचा आढावा घेतला. गडहिंग्लज तालुक्यातील नूल येथून सुरू झालेली संविधान बचाव दिंडी चंदगड तालुक्यातून आता आजरा तालुक्यात येणार आहे. सरोळी येथून सोमवारी सकाळी ही दिंडी निघून ती निंगुडगे, कोवाडे, पेद्रेवाडी, हजगोळी १ व २ येथून आजरा येथे सायंकाळी ४ वाजता येईल. त्यानंतर सतेज उर्फ बंटी पाटील यांचे अध्यक्षतेखाली सभा होईल. त्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे मंगळवारी सकाळी ९ वाजता संविधान दिंडी महागोंड येथून निघून वझरे, पेरणोली, हरपवडे, कोरीवडे, देवकांडगाव, दाभिल, शेळप येथून गवसे येथे येईल. तेथे आल्यानंतर सभा घेऊन या दिंडीची सांगता होईल. यावेळी उमेश आपटे, संभाजी पाटील, उदय पवार, नौशाद बुडडेखान, रशीद पठाण, संजय तरडेकर, युवराज पोवार, संजय सावंत,, राजू होलम, रणजित देसाई, उदय कोडक, किरण पाटील, जोतिबा चाळके, रवी भाटले, ओंकार माध्यळकर, दशरथ घुरे, समीर चांद, संकेत सावंत यांच्यासह इंडिया आघाडीचे अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.
================

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...