गडहिंग्लज (प्रतिनिधी) :
महाराष्ट्र दिन व सह्यगिरी संस्थेच्या वर्धापन दिनानिमित्त सह्यगिरी कला, क्रीडा,साहित्य व शैक्षणिक विचार मंच साळवण, (ता. गगनबावडा जि. कोल्हापूर) यांच्या वतीने राज्यस्तरीय ऑनलाईन हस्ताक्षर स्पर्धा 2021 चे आयोजन करण्यात आले होते. "शाळा बंद पण शिक्षण सुरू" या उपक्रमांतर्गत सह्यगिरी शैक्षणिक विचारमंच यांच्यावतीने इयत्ता पहिली ते आठवीच्या विद्यार्थ्यांसाठी तीन गटात ऑनलाईन हस्ताक्षर स्पर्धा नुकत्याच घेण्यात आल्या. या स्पर्धेसाठी विद्यार्थ्यांनी स्व-हस्ताक्षरात लेखन केलेल्या पानाचा फोटो किंवा पीडीएफ व स्वतः लेखन करत असतानाचा व्हिडिओ संस्थेकडे व्हाट्सअपवर शेअर करून सहभाग नोंदवावयाचा होता. एकूण तीन गटांमध्ये ही स्पर्धा घेण्यात आली. सर्व सहभागी विद्यार्थ्यांनी स्व-हस्ताक्षरात मध्ये आपल्या इयत्ते च्या भाषा(मराठी) पुस्तकातील परिच्छेदाचे लेखन करावयाचे होते. या स्पर्धेसाठी राज्यभरातून विद्यार्थ्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. तब्बल १९०९ विद्यार्थ्यांनी या स्पर्धेमध्ये सहभाग घेतला होता.
या स्पर्धेचा निकाल नुकताच ऑनलाईन जाहीर करण्यात आला. या स्पर्धेमध्ये पहिली- दुसरीच्या गटामध्ये छत्रपती शिवाजी विद्यालय, गडहिंग्लज. (ता. गडहिंग्लज जि. कोल्हापूर या शाळेमध्ये इयत्ता पहिलीच्या वर्गात शिकणाऱ्या कुमारी स्वरा प्रशांत गुरव या विद्यार्थीनीने प्रथम क्रमांक पटकाविला. त्याचप्रमाणे पहिलीतच शिकणारी कुमारी आरोही अमोल गुरव या विद्यार्थिनीने उत्तेजनार्थ द्वितीय क्रमांक पटकाविला. विजेत्या स्पर्धकांना रोख रक्कम व ऑनलाइन प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्वच विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र दिले. स्वरा व आरोहीला छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक प्रल्हादसिंह शिलेदार यांचे प्रोत्साहन लाभले. वर्गशिक्षका अनुपमा चौगुले व विद्या खतकर यांचे मार्गदर्शन लाभले तसेच पालकांचे पाठबळ लाभले. स्पर्धा यशस्वीरित्या पार पाडण्यासाठी सह्यगिरी शैक्षणिक विचारमंचचे अध्यक्ष रघुनाथ शिंदे, उपाध्यक्ष विलास पाटील, सचिव क्रांतिसिंह सावंत, कार्याध्यक्ष तानाजी तेली, खजानीस मनिष नायसे यांनी अथक व अविश्रांत परिश्रम घेतले. स्वरा व आरोहीच्या या नेत्रदीपक यशाबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब....
No comments:
Post a Comment