Sunday, November 30, 2025

पाणी योजनेच्या ठेकेदाराला क्लीन चीट देण्यासाठीच सत्ताधारी व विरोधकांना आजरा नगरपंचायतीची सत्ता हवी आहे, अन्याय निवारण समितीचा पत्रकार परिषदेत हल्लाबोल

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा शहराच्या पुढील 35 वर्षाचे नियोजन धरून पाण्याची योजना करण्यात आली. मात्र ही पाणी योजना सपशेल फेल झाली आहे. योजना फसली तर आजरेकरांचे नुकसान होणार, त्यामुळे अन्याय निवारण समितीने कामाचा दर्जा चांगला व्हावा तसेच शहरवाशीयांना स्वच्छ व मुबलक पाणी मिळावे यासाठी प्रयत्न केले. अन्याय निवारण समितीने गेल्या चार वर्षात सर्वसामान्यांच्या हिताचे काम केले आणि आता आजरा शहरवासीयांच्याकडे मत मागण्यासाठी जात आहेत. मात्र गत्तसभागृहातील सत्ताधारी व विरोधक काम करण्यासाठी संधी मिळालेली असताना देखील कोणतेही काम न करता कोरोना व प्रशासकाच्या नावाने ओरड सुरू आहे. आत्तासुद्धा सत्ताधारी व विरोधकांना सत्ता केवळ स्वतःच्या फायद्यासाठी हवी आहे. तसेच या सत्तेच्या माध्यमातून पाणी योजनेच्या ठेकेदाराला क्लीनचीट देण्याचा डाव असल्याचा हल्लाबोल अन्याय निवारण समितीच्या वतीने पत्रकार परिषदेत करण्यात आला.

अन्याय निवारण समिती आघाडीचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार डॉ. श्रद्धानंद ठाकूर म्हणाले, अन्याय निवारण समितीने सामान्य माणसांसाठी केलेल्या कामामुळे प्रस्थापितांच्या पायाखालची वाळू सरकलेली आहे. त्यामुळे शहरात चुकीची माहिती पसरवली जात आहे. आजरा शहरातील सर्वसामान्यांचे जीवन सुखकर करण्याचे काम अन्याय निवारण समितीने केलेली आहे. गेल्या पाच- सहा वर्षात नगरपंचायतीसाठी आलेल्या निधीचे नियोजन योग्य प्रकारे झालेले नाही, त्यामुळे अनेक कामे रेंगाळलेली आहेत. आम्ही जनहिताच्या प्रकल्पासाठी कधीही विरोध केला नाही. जिथे चुकीचे काम सुरू आहे, तिथे ते काम योग्य रीतीने सर्वसामान्यांच्या हितासाठी व्हावे एवढाच आमचा अट्टहास होता.

सुधीर मुंज म्हणाले, अशोक चराटी सगळ्याला जबाबदार मी आहे असे म्हणतात तर शहराच्या दुरावस्थेला देखील तेच जबाबदार आहेत. नगरपंचायतीच्या भांडवली मूल्यावर आधारित करवाढ करण्याच्या प्रस्तावाला अशोक चराटी हेच सूचक आहेत. केवळ शासनाच्या परिपत्रकाप्रमाणे करवाढ न करता जनतेला चांगल्या प्रकारे सुविधा उपलब्ध झाल्या पाहिजेत. सत्ताधारी व विरोधकांचा निस्वार्थी सेवेचा दावा खोटा आहे. आजरा नगरपंचायतीचे शिलकीचे बजेट असताना पाचपट करवाढ करून नेमके कोणाचे हित साधले. पाणी योजनेला आता निधी मिळाल्यानंतर पुढील 30-35 वर्षात त्यासाठी निधी मिळणार नाही. त्यामुळे ती योजना चांगल्या पद्धतीने झाली पाहिजे यासाठी आम्ही आग्रही आहोत. साडेसात वर्ष काहीही काम केले नाही आणि आता निवडणुकीच्या तोंडावर जनतेच्या डोळ्यात धुळ फेक करण्याचे काम सत्ताधारी व विरोधी मंडळी कडून होत आहे.

परशराम बामणे म्हणाले, सत्ताधारी व विरोधक अन्याय निवारण समिती कामांच्या आडवे आल्याचे म्हणतात. मात्र आम्ही नियोजनबद्ध व कायदेशीर कामांच्या कधीही आडवे आलो नाही. प्रशासनाशी भांडून अन्याय निवारण समिती सर्वसामान्यांच्यासाठी काम करत होती, मात्र जनतेच्या प्रश्नावर प्रशासनाला जाब विचारण्याची ताकद सत्ताधारी व विरोधी नगरसेवकात कधीही नव्हती. आम्ही जनतेचे प्रश्न सोडवून निवडणुकीला उभे राहिले आहोत. खोटी आश्वासने देऊन जनतेचा भुलभुलय्या आम्हाला करायचा नाही. यावेळी अरुण देसाई, भास्कर बुरुड, पांडुरंग सावरतकर, हर्षद परुळेकर उपस्थित होते.
=========================

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...