Sunday, November 16, 2025

‘गोकुळ’ने सहकार क्षेत्रात आर्थिक क्रांती घडवली : पालकमंत्री ना. प्रकाश आबिटकर, गडहिंग्लज येथे ‘गोकुळ’च्या जातिवंत म्हैशी विक्री केंद्राचे उद्‌घाटन संपन्न

गडहिंग्लज, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ मर्या.,कोल्हापूर (गोकुळ) व एनडीडीबी डेअरी सर्व्हिसेस, नवी दिल्ली यांच्या संयुक्त विद्यमाने उभारण्यात आलेल्या लिंगनूर (क.नूल) ता. गडहिंग्लज येथे जातिवंत मुऱ्हा, मेहसाणा, जाफराबादी म्हैशी विक्री केंद्राचे उद्‌घाटन महाराष्ट्र राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व आरोग्य मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील, माजी आमदार राजेश पाटील यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये करण्यात आले. यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ व सर्व संचालक मंडळ, एन.डी.डी.बी.चे प्रतिनिधी, प्राथमिक दूध संस्‍थांचे प्रतिनिधी, गोकुळचे अधिकारी यांच्‍या उपस्थित होते.
           
यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ म्हणाले, गोकुळच्या म्हैशीच्या दुधाला वाढती मागणी असल्याने म्हैस दूध संकलन मोठ्या प्रमाणात वाढविण्याची गरज असल्याचे सांगितले. “अमूल डेअरीला टक्कर द्यायची असेल तर आपले दूध संकलन वाढलेच पाहिजे. २५ लाख लिटर संकलनाचा टप्पा सर्वांच्या सहकार्याने पूर्ण करणार,” असे मुश्रीफ म्हणाले. या उद्दिष्टासाठी गोकुळच्या विविध अनुदान योजना, वासरू संगोपन, केडीसीसी बँकेमार्फत कर्जपुरवठा,  जातिवंत म्हैस केंद्रे आणि लाडका सुपरवायझर योजना सुरू करण्यात आल्या असल्याचे त्यांनी सांगितले. दर महिन्याला दूध संकलन, विक्री आणि सुपरवायझर यांच्या कामाचा अहवाल घेणे गरजेचे असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. शेतमजूर व भूमिहीन कुटुंबांना म्हैस खरेदीसाठी प्रोत्साहित करून केडीसीसी बँकेची मदत घेण्याचे आवाहन त्यांनी केले. लिंगनूर परिसरातील दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात असल्याने जातिवंत म्हैस विक्री केंद्र येथे उभारण्यात आले आहे. एन.डी.डी.बी. यांनी मुंबई येथे गोकुळसाठी जागा उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी त्यांनी यावेळी एन.डी.डी.बी.चे प्रतिनिधी यांना केली. डिबेंचर संदर्भात संचालक मंडळाने विशेष समिती स्थापन केली असून, डिबेंचरमुळे संस्थेचे भांडवल बळकट होते आणि व्याज उत्पन्न मिळते. समितीने अहवाल सादर केल्यानंतर संचालक मंडळाने दूध संस्थांच्या मतानुसार पुढील निर्णय घ्यावा, असेही मुश्रीफ म्हणाले.
           
आरोग्य मंत्री व पालकमंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले, “गोकुळ ने नेहमीच उत्पादकांचे हित जोपासले आहे. त्याचा एक भाग म्हणून जातिवंत म्हैस विक्री केंद्र उभारले आहे. गोकुळने सहकार क्षेत्रात आर्थिक क्रांती घडवली आहे.” गोकुळच्या या उपक्रमामुळे उत्पादकांचे हित संरक्षित राहणार असून, दूध व्यवसायाला प्रोत्साहन मिळेल, तसेच शहरी–ग्रामीण भागामधील आर्थिक समन्वय वाढेल. माजी गृहराज्यमंत्री व आमदार सतेज पाटील म्हणाले, गोकुळ दूध संघाच्या दूध संकलन वाढवण्यासाठी नेहमी प्रयत्न सुरू आहेत. अल्पभूधारक शेतकऱ्यांना परराज्यात जाऊन जनावरे खरेदी करणे परवडत नसल्यामुळे गोकुळने जातिवंत म्हैस खरेदी–विक्री केंद्र चालू केले आहे. दूध व्यवसाय नेहमीच फायदेशीर राहतो. त्याकडे नोकरीला पूरक व्यवसाय म्हणून पाहण्याची दृष्टी बदलणे आवश्यक आहे. आजरा, चंदगड व गडहिंग्लज तालुक्यांमध्ये म्हैस दूध संकलनाचे प्रमाण जास्त आहे. जातिवंत म्हैस खरेदीवर ३० टक्के अनुदान गोकुळ उत्पादकांना मिळते. आतापर्यंत १८ लाख ११ हजार लिटर दूध संकलन पार केले आहे.
           
संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, गोकुळ व एन.डी.डी.बी यांनी संयुक्तपणे उभे केलेल्या या जातिवंत म्हैस विक्री केंद्रामध्ये दूध उत्पादक शेतकऱ्यांना जातिवंत, दुधाळ व सशक्त म्हैशी उपलब्ध होणार असून यामुळे म्हैस दूध उत्पादन वाढीसाठी निश्चितच चालना मिळणार आहे. या म्हैस विक्री केंद्रावरती खरेदी केलेल्या म्हैशींना संघ नियमानुसार गोकुळमार्फत ४० हजार रुपये अनुदान मिळणार असून त्यापैकी आर्थिक मदत म्हणून ५ हजार रुपये अनुदान प्रस्ताव सादर केलेनंतर तात्काळ दिले जाणार आहे. या म्हैस विक्री केंद्रामुळे खासकरून गडहिंग्लज, आजरा, चंदगड, कागल या तालुक्यातील दूध उत्पादकांना जातिवंत म्हैशी उपलब्ध होणार आहेत. लवकरच २० लाख लिटर दूध संकलनाचे कलश पूजन करून लवकरच २५ लाख लिटरचा संकलनाच टप्पा पूर्ण करायचा आहे. गेल्या चार वर्षामध्ये १४ रुपये म्हैस व १० रुपये गाय दूध खरेदी दरात वाढ केले आहे. संघ हा दूध उत्पादकांच्या मालकीचा आहे, आणि गोकुळ तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे.”  या कार्यक्रमावेळी नवीन म्हैस विक्री केंद्रातून म्हैस खरेदी केलेल्या दूध उत्पादक सौ. मंगल खन्नुकर (कोवाड), वैभव बुगाडे (गिजवणे), गजेंद्र बिरंबोळे (मडिलगे), शिवाजी हूनगीनाळे (बटकणंगले) यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी स्‍वागत एन.डी.बी,बी.चे प्रतिनिधी डॉ.सरोज वाहणे यांनी केले. प्रास्ताविक संचालिका श्रीमती अंजना रेडेकर यांनी केले. आभार संचालक शशिकांत पाटील–चुयेकर यांनी मानले. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री नामदार हसन मुश्रीफ, आरोग्य मंत्री पालकमंत्री नामदार प्रकाश आबिटकर, माजी गृहराज्यमंत्री आमदार सतेज पाटील, माजी आमदार राजेश पाटील, संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, अरुण डोंगळे,  संचालक बाबासाहेब चौगले, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, राजेंद्र मोरे, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले,  एनडीबीबीचे प्रतिनिधी डॉ.मोहम्मद तारिक, डॉ.बालाजी वडजे, के.डी.सी.सी.बँक संचालक सुधिर देसाई, माजी जि.प. सदस्य वसंत धुरे, माजी जि.प.उपाध्यक्ष सतिश पाटील, विद्याधर गुरबे, महाबळेश्वर चौगले, संभाजी पाटील, एम.के.देसाई, संघाचे अधिकारी, पंचक्रोशीत दूध संस्थांचे प्रतिनिधी, दूध उत्पादक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=======================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...