Tuesday, September 2, 2025

मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांची ८५ वी जयंती उत्साहात साजरी

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
संवेदना फाउंडेशन आजरा यांच्या वतीने मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांची ८५ वी जयंती दिनांक ३१ ऑगस्ट रोजी आजरा येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली. कार्यक्रमाची सुरुवात व्यंकटराव हायस्कूल प्रांगणात झाली. सरस्वती पूजन शेखर बटकटली यांच्या हस्ते व पालखी पूजन ए. के. पावले सर यांच्या हस्ते पार पडले. व्यंकटराव हायस्कूल येथून मृत्युंजय स्मृतिदालनापर्यंत साहित्य दिंडी काढण्यात आली. या दिंडीत व्यंकटराव बालक मंदिरचे विद्यार्थी, मौजे भादवण येथील लेझीम पथक, हत्तीवडे येथील भजनी मंडळ तसेच साहित्य संवेदनाचे सदस्य व आजरेकरांचा उत्स्फूर्त सहभाग होता.

दुसऱ्या सत्रात “मृत्युंजयकारांचा वारसा – विचारांचा खजिना” या विषयावर स्मृतिदालनात मान्यवरांच्या उपस्थितीत कार्यक्रम पार पडला. डॉ. शिवशंकर उपासे (अध्यक्ष, चैतन्य सृजन सेवा संस्था, आजरा) यांच्या हस्ते शिवाजीराव सावंत यांच्या प्रतिमेचे पूजन झाले. प्रमुख अतिथी म्हणून ज्येष्ठ साहित्यिक व विचारवंत डॉ. सुनीलकुमार लवटे उपस्थित होते. त्याचबरोबर संवेदना फाउंडेशनचे अध्यक्ष अण्णाप्पा पाटील, उपाध्यक्ष पांडुरंग पाटील, आजऱ्यातील राजकीय, सामाजिक, शैक्षणिक, प्रशासकीय, वैद्यकीय, पत्रकार,आदी विविध क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलनानंतर संवेदना फाउंडेशनचे सचिव संतराम केसरकर यांनी प्रास्ताविक केले. संवेदना प्रवक्ते संजय भोसले यांनी “सहानुभूती, सहनिर्मिती, एकात्मता व प्रेरणा” या तत्त्वांवर आधारित संवेदना भारत कार्याचा परिचय करून दिला. यानंतर विविध कलात्मक सादरीकरणांनी कार्यक्रम रंगला. एम.के. गोंधळी यांनी एकपात्री प्रयोग सादर केला. आत्माराम पाटील यांनी विनोदी सादरीकरण केले. दशरथ पाटील व वृषाली केळकर यांनी मृत्युंजय कादंबरीचे अभिवाचन केले.

प्रमुख अतिथी डॉ.सुनिलकुमार  लवटे सर यांनी मराठी साहित्यातील मृत्युंजय कारांचे योगदान व प्रेरणा यावर प्रकाश टाकला. अध्यक्षीय मनोगतात डॉ. शिवशंकर उपासे यांनी “शिवाजीराव सावंत हे आजऱ्याचे अभिमानस्थान आहेत” असे गौरवोद्गार काढले. यानंतर “झोका कथास्तु पर्व ३ रे कथा स्पर्धा” विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह, ग्रंथ भेट व पारितोषिके देण्यात आली. त्यात डॉ.मीना सुर्वे (सांगली), आनंद देशमुख (धुळे), कलाप्पा पाटील (चंदगड), दत्ता परीट (कोल्हापूर), प्रा. डॉ. सुनील विभुते (सोलापूर), त्रिपुरा रानडे (पुणे), उत्तम सदाकाळ (पुणे), सौ. शामला जोशी (सातारा) यांचा समावेश होता. तसेच “गड्या आपला गाव बरा” निबंधमाला स्पर्धा विजेत्यांचाही गौरव करण्यात आला. अर्णव चोडणकर (आजरा), संतोष पाटील (मुमेवाडी), सुनील पालकर (हरुर),  एकनाथ पाटील (अर्जुनवाडी), आनंदा आसवले (तेरणी), शौकतअली नाईकवाडे(कडगाव), रवींद्र गुरव (पाचवडे) , एम. जी. गुरव (वाघापूर), गीता चव्हाण (पांगिरे), ज्ञानेश्वर पाटील (कडलगे बु), एम. डी. पाटील (गुड्डेवाडी) , दयानंद सलाम (घुलेवाडी )आदी तर सर्वोत्कृष्ट निबंध एकनाथ पाटील (अर्जुनवाडी) या सर्व विजयी स्पर्धकांचा मान्यवरांच्या हस्ते पुरस्कार देण्यात आले.
यानंतर साहित्य संवेदनाची पुढील दिशा सदानंद पुंडपाळ सर यांनी मांडली. समारोप व आभार आनंदा अस्वले यांनी मांडले. या सत्राचे सूत्रसंचालन दिनकर खवरे यांनी केले.

तिसऱ्या सत्रात साहित्यिक मेळावा व मुक्त संवाद पार पडला. या सत्राचे अध्यक्ष विलास माळी तर प्रमुख अतिथी दि.बा.पाटील व लक्ष्मण हेबांडे होते. विविध भागातून आलेल्या साहित्यिकांनी कविता, कथा सादर करून रंगत आणली. सूत्रसंचालन शरद अजगेकर व दशरथ अस्वले यांनी केले. शेवटी “गड्या आपला गाव बरा निबंधमाला” प्रायोजक व “झोका कथा स्पर्धा” प्रायोजकांचा शाल, रोपटे व ग्रंथ भेट देऊन सत्कार करण्यात आला. आभारप्रदर्शन आनंदा अस्वले यांनी केले. या सोहळ्याद्वारे मृत्युंजयकार शिवाजीराव सावंत यांच्या साहित्याची परंपरा, विचारांचा वारसा व प्रेरणा पुन्हा एकदा उजाळली गेली. आजरा तालुक्याच्या व मराठी साहित्यविश्वाच्या इतिहासात हा दिवस संस्मरणीय ठरला.
==================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...