Thursday, June 5, 2025

‘गोकुळ’ शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याची मजबूत यंत्रणा : उपमुख्यमंत्री ना. अजितदादा पवार; गोकुळचे नूतन चेअरमन नविद मुश्रीफ यांची उपमुख्यमंत्री ना.अजितदादा पवार यांना सदिच्छा भेट

मुंबई, न्यूज नेटवर्क : 
गोकुळ केवळ दुग्ध उत्पादक संस्था नसून ती शेतकऱ्यांच्या आर्थिक स्थैर्याची मजबूत यंत्रणा आहे. त्यांच्या व्यवसायाचा विस्तार म्हणजे ग्रामीण अर्थव्यवस्थेची प्रगती असल्याचे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार याने केले. गोकुळचे नूतन चेअरमन नविद मुश्रीफ व संचालक यांनी सह्याद्री अतिथीगृह, मुंबई येथे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांची सदिच्छा भेट घेऊन गोकुळ परिवाराच्यावतीने त्यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री नाम. हसन मुश्रीफ व सहकार मंत्री नाम. बाबासाहेब पाटील, गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे आणि संघाचे संचालक मंडळ, अधिकारी उपस्थित होते. तसेच महाराष्ट्र राज्याचे सहकार मंत्री नाम.बाबासाहेब पाटील यांचा गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार म्हणाले कि, गोकुळ दूध संघ हा सहकार व दुग्ध व्यवसायातील अग्रगण्य संस्था असून गोकुळने नेहमीच शेतकऱ्यांचे हित जोपासले आहे. दुग्ध व्यवसायामध्ये तंत्रज्ञान अत्यंत महत्त्वाचे असून गोकुळसारख्या संस्थांनी यामध्ये आघाडी घ्यावी. आम्ही शासनस्तरावर मागोवा घेऊन सहकार्य करू. दूध व्यवसायवाढीसाठी गोकुळला लागेल ती प्रत्येक मदत करण्यात येईल. गोकुळचा विस्तार म्हणजे शेतकऱ्यांचा विकास असे प्रतिपादन व्यक्त केले. या बैठकीत गोकुळच्या वतीने मुंबईतील एन.डी.डी.बी. (राष्ट्रीय दुग्ध विकास मंडळ) च्या जागेची मागणी ही या भेटीत करण्यात आली. यावेळी उपमुख्यमंत्री पवार यांनी सकारात्मक प्रतिसाद देत सांगितले की, तुम्ही तुमच्या पद्धतीने कामाला लागा, शासनाकडून आवश्यक ती मदत नक्की केली जाईल. तसेच राज्य शासनाकडून दूध उत्पादक शेतकऱ्यांसाठी जाहीर केलेल्या गाय दूध अनुदानाबाबतही उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी प्रशासनास हे अनुदान तत्काळ वितरित करण्याबाबत स्पष्ट सूचना दिल्या. तसेच दुग्ध व्यवसायात आधुनिकतेचा वापर वाढवण्यासाठी AI तंत्रज्ञान व दुग्ध व्यवसाय वाढीसंदर्भातील केंद्र शासनाच्या व राज्य शासनाच्या विविध योजनांवर सविस्तर चर्चा झाली.

यावेळी गोकुळचे नूतन चेअरमन नविन मुश्रीफ म्हणाले कि, गोकुळचा उद्देश नेहमीच शेतकरी हित आणि संस्थेचा सक्षम विस्तार हा राहिला आहे. उपमुख्यमंत्र्यांचे मार्गदर्शन आमच्या पुढील वाटचालीसाठी प्रेरणादायी ठरेल. याप्रसंगी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, माजी चेअरमन ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, माजी चेअरमन अरुण डोंगळे, संचालक अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, युवराज पाटील, मुरलीधर जाधव, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, वाशी शाखा डेअरी व्यवस्थापक दयानंद पाटील उपस्थित होते.
===================

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...