Friday, May 30, 2025

दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दूध दर देण्यासाठी कटिबद्ध : गोकुळ दूध संघ नूतन चेअरमन नविद मुश्रीफ

कोल्‍हापूर,  विकास न्यूज नेटवर्क : 
गोकुळ दूध संघाच्‍या चेअरमनपदी नविद हसन मुश्रीफ यांची एकमताने निवड झाली. निवडणूक अधिकारी राजकुमार पाटील विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दूग्ध पुणे) यांच्‍या अध्‍यक्षतेखाली निवड करणेत आली. या निवडीनंतर बोलताना गोकुळचे नूतन चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले कि, गोकुळ दूध संघाच्या चेअरमन पदी माझी एकमताने निवड करून जो विश्वास माझ्यावर दाखवण्यात आला आहे. त्याबद्दल मी शाहू आघाडीचे सर्व नेते मंडळी, माझे सहकारी संचालक मंडळ तसेच माझ्या शेतकरी बांधवांचे मनपूर्वक आभार मानतो. मी भविष्यात काम करत असताना दूध उत्पादक शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दूध दर देण्यासाठी कटिबद्ध असून दूध संकलन, प्रक्रिया आणि विक्री व्यवस्था अधिक पारदर्शक व कार्यक्षम राबूवन नव्या तंत्रज्ञानाचा व्यवस्थापन प्रणालींचा समावेश करून  गोकुळची  गुणवत्ता आणि ब्रँड ची विश्वासार्हता राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणार आहे. तसेच या दुग्ध व्यवसायामध्ये महिला व युवा शेतकरी  अधिक सक्रीय होण्यासाठी त्यांना गोकुळ मार्फत प्रोत्साहन देण्याचा माझा प्रयत्न असेल.

गोकुळच्या महालक्ष्मी पशुखाद्याची वाढती मागणी लक्षात घेता येत्या नजीकच्या काळात गडमुडशिंगी येथे TMR प्लाँट विस्तारीकरण व पशुखाद्य कारखान्याचे नूतनीकरण करण्याचे नियोजन आहे. तसेच मुंबई, पुणे येथील दूध उत्पादनाची मागणी लक्षात घेता नवी मुंबई वाशी येथे उभारणी  केलेल्या १५ मे.टन क्षमतेचा दही प्रकल्प लवकरच कार्यान्वित करणार असून एन.डी.डी.बी.ची मुंबई येथील जागा घेण्याचा मानस आहे. गायी- म्हैशींच्या गाभण कालावधीच्या शेवटच्या दोन महिन्यासाठी आवश्यक प्रेग्नेसी रेशनचे उत्पादन (पशुखाद्य) घेणेचे नियोजन आहे. नवीन दुग्धजन्य उत्पादनांची निर्मिती व मार्केट विस्तार या सारखे संघ हिताचे निर्णय सर्वांच्या सहकार्याने घेणार आहे. मी कोणत्याही गट-तटाच्या पलीकडे जाऊन, "सहकार हा आमचा धर्म" या मूल्याशी प्रामाणिक राहून कार्य करीन. गोकुळ ही संस्था सर्वांसाठी खुली, उत्तरदायी आणि सर्वसमावेशक राहील, यासाठी मी कटिबद्ध आहे. शेवटी एवढंच ही निवड ही केवळ माझी नाही, तर आपणा सर्वांच्या विश्वासाची आणि एकतेची निवड असल्याचे नूतन चेअरमन नवीन मुश्रीफ यांनी मनोगतात व्यक्त केले.

"गोकुळ"च्‍या चेअरमनपदी नविद मुश्रीफ यांची निवड...
गोकुळ दूध संघाच्‍या चेअरमनपदी नविद हसन मुश्रीफ यांची एकमताने निवड झाली निवडणूक अधिकारी राजकुमार पाटील विभागीय उपनिबंधक सहकारी संस्था (दूग्ध पुणे) यांच्‍या अध्‍यक्षतेखाली निवड करणेत आली. या चेअरमन पदाच्‍या निवडीकरीता सुचक म्‍हणून विश्वास नारायण पाटील व अनुमोदक म्‍हणून अरुण गणपतराव डोंगळे आहेत. यावेळी संघाचे माजी चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्‍वास पाटील, संचालक बाबासाहेब चौगले, अभिजित तायशेटे, अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, युवराज पाटील, राजेंद्र मोरे, मुरलीधर जाधव, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील संघाचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. 
==================

Thursday, May 29, 2025

मुंबईच्या सिद्धिविनायक मंदिराची "गोकुळ"ला पुन्हा तूप पूरवठ्याची ऑर्डर, चालू आर्थिक वर्षात २८० मेट्रिक टन तुपाचा पुरवठा करणार : गोकुळ दूध संघ चेअरमन अरुण डोंगळे

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : 
उत्तम प्रतीच्या चवीमुळे महाराष्ट्रातच नव्हे तर देशभर गोकुळच्या दुधाचा आणि दुग्धजन्य पदार्थांचा लौकिक आहे. गोकुळ दूध संघाचे गायीचे तूप मागील एक वर्षापासून मुंबई, प्रभादेवी येथील सिद्धिविनायक गणपती मंदिरातील प्रसादासाठी वापरले जात आहे. आता सलग दुसऱ्या वर्षी सन २०२५-२६ या आर्थिक वर्षासाठी पुन्हा एकदा २८० मे.टन गाय तूप पूरवठ्याची ऑर्डर गोकुळ दूध संघास प्राप्त होत असून हे टेंडर म्हणजे गोकुळच्या गुणवत्तेची आणि पारदर्शक व्यवस्थेची दिलेली पावती असल्याचे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले.

सिद्धिविनायक मंदिर न्यास प्रभादेवी, मुंबई यांना संघामार्फत सन २०२४ -२५ या आर्थिक वर्षामध्ये गाय तूप पुरवठा करण्याचे २५० मे. टन चे टेंडर मिळाले होते. पुढील २०२५-२६ या आर्थिक वर्षाकरिता गाय तूप पुरवठा करणेबाबतचे टेंडर संघामार्फत भरले होते. या टेंडर प्रक्रियेमध्ये गोकुळ संघ व इतर दूध संघ यांनीही सहभाग घेतला होता. या करिताचे टेक्निकल बीड व प्लांट इन्स्पेक्शन या स्तरावर गोकुळ दूध संघ यशस्वी झाल्यानंतर अंतिम कमर्शियल बीडमध्ये हे टेंडर गोकुळ दूध संघाला मिळाले असून त्याचा खरेदी आदेश लवकरच प्राप्त होईल. गाय दुधाची संकलनामध्ये झालेली वाढ लक्षात घेता गाय दूध तसेच गाय दुधापासून बनवलेले दुग्ध पदार्थ यांची निर्गत होणे हे संघापुढे आव्हान असून यामधील एक सकारात्मक पाऊल म्हणजे प्राप्त होत असलेले गाय तूप पुरवठ्याचे हे टेंडर आहे.

मुंबईतील सिद्धिविनायक मंदिर हे महाराष्ट्रातील एक श्रद्धास्थान असून, दररोज हजारो भाविक येथे दर्शनासाठी येत असतात. मंदिरात होणाऱ्या विविध धार्मिक विधी, महापूजा, नैवेद्य व प्रसादासाठी उच्च प्रतीच्या तुपाचा वापर केला जातो. यासाठी मंदिर प्रशासनाकडून गुणवत्तेची कसून चाचपणी केली गेली आणि त्यात गोकुळच्या गायीच्या तुपाला प्राधान्य देण्यात आलं. “गोकुळचे तूप हे दर्जेदार असल्याने त्याचा सुवास, चव आणि पोषणमूल्ये टिकून राहतात. या गुणवत्तेमुळेच सिद्धिविनायक मंदिराने पुन्हा एकदा गोकुळला पसंती दिली” आहे असे गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले.
===================

Wednesday, May 28, 2025

आजरा महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. शिवानंद प्रकाश गजरे यांना भारत सरकारचे पेटंट; पाण्यामधील जीवनसत्व बी-२ याचा सेंद्रीय संयूग वापरुन शोध घेणे झाले सोपे

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा महाविद्यालयातील रसायनशास्त्र विभागाचे प्रा. डॉ. शिवानंद प्रकाश गजरे आणि यशंवतराव चव्हाण कॉलेज ऑफ सायन्स कराड महाविद्यालयातील डॉ. किशोर जगधने यांना डीव्हाईस फॉर डीटेक्शन ऑफ व्हीटॅमिन बी-२ इन वॉटर या संशोधनासाठी भारत सरकारचे पेटंट प्राप्त झाले.

शरीरामध्ये जीवनसत्व बी-२ पर्याप्त उर्जास्तर राखून ठेवण्यास मदत करतो, जे शरीराच्या सामान्य कार्य व गतिविधींना सहाय्य करते. तसेच शरीरात जीवनसत्व बी-२ च्या इतर घटाकांचे सामान्य स्तर राखून ठेवण्यास मदत करते. जसे की बी-६ आणि बी-९ शरीरात वापरु शकल्या जाणा-या त्यांच्या सक्रिय रुपांमध्ये परिवर्तीत करुन हे साध्य केले जाते. अमेरिकन जर्नल ऑफ क्लिनिकल न्यूट्रीशनमध्ये प्रकाशित एका अभ्यासामध्ये दिसून आले आहे की रायबोप्लेविन लोहाचे प्र्याप्त रक्त स्तर राखून ठेवण्यसाठी आवश्यक आहे. कारण शरीरात लोहाच्या प्रक्रियेवर त्याचा प्रभाव होतो. या जीवनसत्वाची कमतरता रक्ताशयाच्या अधिक धोक्याशी निगडीत आहे. याशिवाय या जीवनसत्वाची एक विशिष्ट भूमिका मायग्रेन्सचे प्रबंदन आणि निवारण यामध्ये सूचविण्यात आले आहे. इतर औषधांसह मायग्रेन आघातावर निवारात्मक उपचार पध्दत म्हणून वापरले जाते. या आघाताची वारंवारीता व भार कमी करण्यात यशस्वी ठरले आहे. जीवनसत्व बी-२ कमतरतेमुळे थकवा, सुजलेला घसा, अस्पष्ट दृष्टी आणि नैराश्यपणा येऊ शकतो. तोंडाभोवती त्वचेला तडे, खाज सुटणे आणि त्वचारोग होवून त्वचेवर परिणाम होवू शकतो. त्याचे रुपांतर कॅन्सर सारख्या गंभीर आजारावर होऊ शकते. याची दखल घेत पाण्यामधील जीवनसत्व बी-२ याचा सेंद्रीय संयूग वापरुन शोध घेणे सोपे केले.

या संशोधनाकरीता शिवाजी विद्यापिठातील रसायन शास्त्राचे प्रा. डॉ. जी. बी. कोळेकर आणि प्रा. डॉ. पी. व्ही. अनभुले यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच डॉ. ए. व्ही. माळी, डॉ. एस. एच. बुरुंगले यांचे सहकार्य लाभले. या पेटंटच्या संशोधनासाठी प्रा. डॉ. गजरे यांना आजरा महाविद्यालय आजराचे अध्यक्ष अशोक अण्णा चराटी, सर्व संचालक मंडळ, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे, कार्यालयीन अधिक्षक योगेश पाटील व इतर सहकारी प्राध्यापकांचे प्रोत्साहन लाभले.
==============

Tuesday, May 27, 2025

अकरावी प्रवेशासाठी आजरा महाविद्यालयात विद्यार्थी मदत केंद्र

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : 
चालू वर्षीची इयत्ता अकरावी प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन पद्धतीने सुरु असून यासंदर्भात विद्यार्थ्यांना ऑनलाइन फॉर्म भरणेस मदत होण्यासाठी आजरा महाविद्यालय आजरा येथे मदत केंद्र स्थापन केले आहे तर व्होकेशनल विभागाचे प्रवेश ऑफलाइन पद्धतीने सुरू आहेत अशी माहिती प्राचार्य डॉ. ए.एन. सादळे यांनी दिली.
        
आजरा तालुक्यातील एकही विद्यार्थी अकरावीच्या ऑनलाइन प्रवेशापासून वंचित राहणार नाही यासाठी प्रत्येक विद्यार्थी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेत समाविष्ट करून घेणे व विद्यार्थ्यांच्या पसंतीनुसार कॉलेज व शाखा निवडता यावी यासाठी मार्गदर्शन करण्यात आले. महाविद्यालयामार्फत मुलांना  फॉर्म भरून देण्याची सुविधा देखील उपलब्ध करून देण्यात आली आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांनी प्रवेश प्रक्रियेबाबत गोंधळून जाऊ नये. प्रत्येक विद्यार्थ्याच्या योग्य मार्गदर्शनासाठी महाविद्यालयात मदत केंद्र स्थापन केला आहे. प्रत्येक शाखेनुसार संबंधित शिक्षकांच्याकडे जबाबदारी देण्यात आली आहे. कोणत्याही विद्यार्थ्यांना किंवा पालकांना काही अडचण असल्यास  महाविद्यालयाशी  संपर्क साधावा असेही आवाहन प्राचार्य डॉ. ए. एन. सादळे यांनी केले आहे.
===============

Monday, May 26, 2025

पावसाचा रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट; पावसाच्या अलर्टचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या..

विकास न्यूज नेटवर्क :
एखाद्या भागात जेवढा पाऊस पडण्याची शक्यता असते, त्या शक्यतेवरुन पावसाबाबतचे रेड, ऑरेंज, यलो, ग्रीन अलर्ट देण्यात येतात. पावसाळा सुरू झाला की पावसाच्या या अलर्टच्या बातम्या सुरू होतात. हे अलर्ट प्रशासनासाठी, त्या त्या जिल्ह्यातल्या महापालिकांसाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तर असतातच, मात्र पावसाच्या या अलर्ट नुसार नागरिकांनी काय खबरदारी घ्यायची, हे ठरवायचं असतं.

रेड अलर्ट :
रेड अलर्ट हा धोक्याची सूचना दर्शवितो. हा अलर्ट पावसाचा सर्वोच्च अलर्ट असतो. हा अलर्ट दिल्यावर २०४ मिलिमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. म्हणजेच अतिमुसळधार पाऊस पडून अतिवृष्टी होऊ शकते, पूर येऊ शकतो, भूस्खलन होऊ शकतं किंवा ढगफुटी सुध्दा होऊ शकते. हा अलर्ट दिल्यावर प्रशासनानं, नैसर्गिक आपत्तीची शक्यता लक्षात घेऊन त्याचा मुकाबला करण्यासाठी तयार राहायचं असतं. नदीजवळ, नाल्याजवळ राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवायचं असतं. रेड अलर्ट नुसार नागरिकांनी घराबाहेर पडायचे नाही, तसेच धोकादायक असणाऱ्या भागात जायचं नाही.

ऑरेंज अलर्ट :
ऑरेंज अलर्ट मध्ये ११५ मिलिमीटर ते २०४ मिलिमीटर पावसाची शक्यता असते, म्हणजेच मुसळधार पावसाची शक्यता असते, एखादी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. या दरम्यान वीज पुरवठा खंडित होऊ शकतो, मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते. त्या दृष्टीनं प्रशासनाने आधीच उपाययोजना करायच्या असतात, तर नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडायचं असतं.

यलो अलर्ट :
यल्लो अलर्ट मध्ये ६४ मिलिमीटर ते ११५ मिलिमीटर एवढा पाऊस पडण्याची शक्यता असते. यलो अलर्ट असला तरी प्रशासनाला या आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश असतात, तर नागरिकांनी या दरम्यान सावधगिरी बाळगायची असते.

ग्रीन अलर्ट :
ग्रीन अलर्ट मध्ये १५ मिलिमीटर ते ६४ मिलीमीटर एवढाच पाऊस पडतो. या परिस्थितीत पाऊस अत्यंत सामान्य असतो. यावेळी प्रशासनानं कुठलेही निर्बंध घालण्याची गरज नसते. तर, या दरम्यान नागरिक प्रवास करू शकतात, नियमित व्यवहार करू शकतात.
=================

लवकरच मान्सूनचा वेग मंदावणार; शेतकऱ्यांनी पेरणीस घाई करू नये, कृषी विभागाचे आवाहन

विकास न्यूज नेटवर्क :
२०२५ या वर्षी मान्सूनचा प्रारंभ अपेक्षेपेक्षा लवकर झाल्याने २५ मे रोजीच तो दक्षिण कोकणात दाखल झाला आहे. ही तारीख सामान्य वेळेपेक्षा तब्बल १० दिवस आधीची आहे. मात्र हवामान खात्याच्या अंदाजानुसार, २७ मेपासून मान्सूनचा वेग कमी होणार आहे आणि त्यामुळे राज्यातील हवामानात लक्षणीय बदल दिसून येणार आहेत. २७ मेपासून बहुतांश भागांत हवामान कोरडे होण्याची शक्यता आहे. तापमानात काही प्रमाणात वाढ होईल आणि पावसात खंड पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. कोकण वगळता संपूर्ण राज्यात मे महिन्याच्या अखेरीपर्यंत प्रामुख्याने कोरडे हवामान राहणार असून, ही स्थिती किमान ५ जूनपर्यंत टिकू शकते. यामुळे ५ जूनपर्यंत राज्यातील बहुतांश भागांमध्ये मान्सून दाखल होण्याची शक्यता कमी आहे.

दरम्यान, यंदा अनेक भागात दमदार वादळी पूर्वमान्सून पावसामुळे नागरिकांमध्ये आणि विशेषतः शेतकऱ्यांमध्ये खरीप हंगामाच्या तयारीसाठी उत्साह निर्माण झाला आहे. मात्र, हवामान खात्याच्या नव्या अंदाजानुसार पावसात काही काळ खंड पडणार असल्याने कृषी विभागाने शेतकऱ्यांना सतर्क राहण्याचे आवाहन केले आहे. खोट्या बातम्यांवर विश्वास ठेवून किंवा लवकर पेरणी करण्याच्या घाईमुळे पिकांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. विशेषतः कोरडवाहू भागातील शेतकऱ्यांनी पावसाचा पहिला भरवसा पक्का झाल्याशिवाय पेरणी अथवा लागवड सुरू करू नये, असे स्पष्ट करण्यात आले आहे.

राज्यातील शेतकऱ्यांसाठी ही माहिती अत्यंत महत्त्वाची असून चुकीच्या नियोजनामुळे होणाऱ्या नुकसानीपासून बचाव करण्यासाठी योग्य हवामान सल्ल्याचे पालन करणे गरजेचे आहे. मान्सूनची गती मंदावणार असली तरी, हवामान विभाग सतत परिस्थितीवर नजर ठेवून आहे. आगामी दिवसांत पुढील अपडेटसाठी अधिकृत हवामान अहवालांवर विश्वास ठेवावा, असे आवाहन कृषी विभागाकडून करण्यात आले आहे.
==========

Sunday, May 25, 2025

नैसर्गिक शेतीमुळे पर्यावरणाचे संतुलन : पालकमंत्री प्रकाश आबिटकर, राधानगरी येथे डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन प्रशिक्षण कार्यक्रम

राधानगरी, विकास न्यूज नेटवर्क :
नैसर्गिक शेतीमुळे पर्यावरणाचे संतुलन राखले जाते, जमिनीची सुपीकता वाढते आणि ग्राहकांना विषमुक्त अन्न मिळते असे प्रतिपादन सार्वजनिक आरोग्य आणि कुटुंब कल्याण, मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले. आत्मा यंत्रणा, कृषि विभाग अंतर्गत गुडाळ, (ता. राधानगरी) येथे डॉ.पंजाबराव देशमुख नैसर्गिक शेती मिशन प्रशिक्षण कार्यक्रम झाला. कार्यक्रमास रक्षा शिंदे, प्रकल्प संचालक आत्मा, जालिंधर पांगरे , जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी व अरुण भिंगारदिवे, उपविभागीय कृषी अधिकारी व आत्मा व कृषि विभागाचे अधिकारी कार्मचारी उपस्थित होते. 

प्रत्येक शेतकऱ्यांनी माती परीक्षण करणेबाबत पालकमंत्री यांनी आवाहन केले. त्यांच्या हस्ते कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरवात देशी गायीच्या पूजनाने झाली. कार्यक्रमात आत्मा विभागाने सेंद्रिय निविष्ठा तयार करण्याबाबत प्रात्याक्षिक आयोजित केले होते. हुमणी कीड व्यवस्थापन मोहिम बाबतही प्रात्याक्षिकाद्वारे उपस्थितांना माहिती देण्यात आली. जिल्ह्यातून सेंद्रिय शेती करणाऱ्या शेतकऱ्यांची मोठ्या संख्येत उपस्थिती होती. कार्यक्रमादरम्यान सेंद्रिय शेतीमध्ये चांगले काम करणाऱ्या शेतकऱ्यांना प्रमाणपत्र वाटप करण्यात आले. उपस्थित शेतकऱ्यांनी आपले मनोगत व्यक्त करत आत्मा योजनेच्या कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. आत्मा यंत्रणेच्या माध्यमातून शेतकऱ्यांना नवनवीन तंत्रज्ञान विषयी माहिती मिळत असलेबाबत शेतकऱ्यांनी माहिती दिली व आत्मा विभागाचे आभार मानले.

रक्षा शिंदे, प्रकल्प संचालक, आत्मा यांनी या प्रशिक्षणामुळे कोल्हापूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीकडे वळण्यास प्रोत्साहन मिळेल आणि त्यांना शाश्वत शेती पद्धती स्वीकारण्यास मदत होईल असे सांगितले तसेच आत्मा विभाग अधिनस्त  तालुक्यातील कार्यरत बी.टी.एम व ए.टी.एम यांच्या सहय्याने आत्मा योजना विषयक सुरु असणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती दिली. व जिल्ह्यातील जास्तीत जास्त शेतकऱ्यांना सेंद्रिय शेतीचा अवलंब करण्यास आवाहन केले. शांतिकुमार पाटील व ऋतुराज चव्हाण या तज्ञ मार्गदर्शकांनी सेंद्रिय शेतीचे विविध पैलू आणि तंत्रज्ञान यावर उपस्थित तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले. यामध्ये ऊस पाचट, माती परीक्षण महत्व, सेंद्रिय निविष्ठा निर्मिती, हिरवळीचे खत फायदे,  नैसर्गिक आणि सेंद्रिय पद्धतीने पिकांवरील कीड व रोगांचे नियंत्रण कसे करायचे, याबाबत मार्गदर्शन केले. शेवटी पराग परीट, बी टी एम गगनबावडा यांनी कार्यक्रमास उपस्थित मान्यवर, अधिकारी, कर्मचारी व शेतकरी यांचे आभार मानले
=============

वाटंगीत माजी विद्यार्थी स्नेह मेळाव्याचा अनोखा उपक्रम; पालकांचा आणि शिक्षकांचा सत्कार

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
विद्या मंदिर वाटंगी (ता. आजरा) येथील 1994-95 सालातील इयत्ता ७ वी मधील वर्ग मित्र - मैत्रिणींचा स्नेह मेळावा उत्साहात पार पडला. या स्नेह मेळावा च्य्या निमित्ताने विद्यार्थ्यांनी ऋणानुबंध जपले. या स्नेह मेळावा मुळे जुन्या आठवणी जाग्या झाल्या आणि अनेकांना गहिवरून आले. सोशल मीडियाच्या माध्यमातून तत्कालीन विद्यार्थ्यांना संघटित करून या कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

कार्यक्रमाच्या सुरवातीला स्वागत गीताने सर्वांचे स्वागत करण्यात आले. त्यानंतर दीपप्रज्वलन व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. सर्व विद्यार्थ्यांनी एकसुरात  शाळेची प्रार्थना सादर केली. त्यानंतर दोन विद्यार्थी आणि पाच शिक्षक जे आता हयात नाहीत त्यांना श्रद्धांजली वाहिली गेली. सकाळपासून संध्याकाळपर्यंत वेगवेगळ्या आठवणींना उजाळा देत कार्यक्रम संपन्न झाला. यामध्ये आई वडिलांचा सन्मान, शिक्षकांचा सन्मान, स्नेहभोजन, मनोगत, ग्रुपची पुढील वाटचाल आणि एका विद्यार्थिनीचा गौरव करण्यात आला.
सामाजिक जबाबदारीचे भान ठेवून शाळेत वृक्षारोपण करण्यात आले. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन महेश देसाई, किशोर गिलबिले, विजया होडगे व अर्चना कांबळे यांनी केले. जयवंत दळवी यांनी स्नेह मेळावा करण्यामागचं कारण आणि पुढील वाटचाली विषयी मत मांडले. त्याला सर्वांनी सहमती दर्शवली. किशोर गिलबिले यांनी आभार प्रदर्शन मानले. तब्बल 30 वर्षांनी भेटलेले हे सर्व विद्यार्थी कार्यक्रमाच्या शेवटी भावूक झाले होते.
===============

मान्सून महाराष्ट्रात दाखल, लवकरच मुंबईत पोहोचणार

मुंबई, वृत्तसंस्था :
नैऋत्य मोसमी पाऊस म्हणजेच मान्सून हा वेळेआधीच केरळमध्ये दाखल झाला. मान्सून केरळमध्ये शनिवारी (24 मे 2025) दाखल झाला. म्हणजेच आठवडाभर आधीच मान्सून केरळात दाखल झाल्यावर महाराष्ट्रातही वेळेआधीच पोहोचला आहे. रविवारी (25 मे) मान्सून महाराष्ट्रात दाखल झाला असल्याचं भारतीय हवामान विभागाने जाहीर केलं आहे. साधारणपणे 5 जून पर्यंत मान्सून महाराष्ट्रात दाखल होतो पण आता वेळेआधी म्हणजेच तब्बल 10 दिवस आधी महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला आहे. राज्यातील काही भागांत मान्सूनचं आगमन झालं आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, नैऋत्य मान्सून रविवारी (25 मे 2025) पश्चिममध्य आणि पूर्वमध्य अरबी समुद्राच्या काही भागात, कर्नाटकच्या काही भागात, संपूर्ण गोवा, महाराष्ट्राच्या काही भागात, पश्चिममध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागराच्या काही भागात आणि मिझोरामच्या काही भागात, मणिपूर आणि नागालँडच्या काही भागात पुढे सरकला आहे. पुढील 3 दिवसांत नैऋत्य मान्सून मध्य अरबी समुद्राच्या काही भागात, मुंबईसह महाराष्ट्राच्या काही भागात, कर्नाटकसह बंगळुरू, आंध्र प्रदेशचा काही भाग, तामिळनाडूचा उर्वरित भाग, पश्चिम मध्य आणि उत्तर बंगालच्या उपसागराच्या काही भागात आणि ईशान्येकडील राज्यांच्या काही भागात पुढे जाण्यासाठी परिस्थिती अनुकूल आहे.

हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण-गोवा (दक्षिण) जिल्ह्यांमध्ये काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे तसेच दक्षिण मध्यम महाराष्ट्राच्या घाट भागांमध्ये तुरळक ठिकाणी मुसळधार पावसाची शक्यता आहे. उत्तर कोकण आणि उत्तर मध्यम महाराष्ट्रातील तुरळक ठिकाणी वादळ, विजांचा कडकडाट, 40-50 किमी प्रतितास वेगाने वाहणारे झंझावाती वारे आणि मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता आहे. मराठवाड्यातील तुरळक ठिकाणी वादळ, विजांचा कडकडाट, 40-50 किमी प्रतितास वेगाने झंझावात आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे.
===============

साळगाव लक्ष्मीदेवी यात्रा 5 व 6 मे 2026 रोजी होणार संपन्न, ग्रामस्थांच्या बैठकीत निर्णय

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
साळगाव (ता. आजरा) येथील लक्ष्मीदेवीची यात्रा 5 व 6 मे 2026 रोजी करण्याचा निर्णय ग्रामस्थांच्या बैठकीत घेण्यात आला. ग्रामस्थांची बैठक ग्रामदैवत ज्योतिर्लिंग मंदिरात पार पडली. यानंतर ग्रामदैवत ज्योतिर्लिंग व लक्ष्मीदेवीला गाऱ्हाणे घालण्यात आले. यापूर्वी साळगावची लक्ष्मीदेवी यात्रा मे 2009 मध्ये संपन्न झाली होती. त्यानंतर आत्ता तब्बल 17 वर्षानंतर यात्रा करण्याचा निर्णय ग्रामस्थांनी घेतला आहे. या यात्रेच्या अनुषंगाने विविध धार्मिक कार्यक्रम, सांस्कृतिक कार्यक्रम व विविध नियोजनाबाबत यावेळी चर्चा करण्यात आली. यावेळी मानकरी, ग्रामस्थ, मुंबईकर ग्रामस्थ, युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=============

पशुसंवर्धन विभागांतर्गत विविध वैयक्तिक लाभाच्या योजनांसाठी अर्ज करावेत : जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ.एस.डी.पाठक

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
विविध योजना व उपक्रमांच्या माध्यमातून ग्रामीण भागातील पशुपालक / शेतकरी बांधवांना स्वयंरोजगाराचे साधन उपलब्ध करून देण्यासाठी कटिबध्द असलेल्या पशुसंवर्धन विभागाच्या वतीने वैयक्तिक लाभाच्या योजना अंतर्गत प्रक्रिया अधिक पारदर्शक करण्यासाठी राज्यस्तरीय नाविन्यपूर्ण योजनेमध्ये गेली चार वर्षे ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविणे व लाभार्थी निवड करण्याची पध्दत सुरू करण्यात आली आहे. पशुपालकांना डेअरी, पोल्ट्री किंवा शेळीपालन यापैकी ज्या बाबींमध्ये अर्ज करावयाचा आहे त्याची निवड करण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. राज्यातील पशुपालक शेतकरी, सुशिक्षीत बेरोजगार युवक- युवती व महिलांनी या योजनांचा लाभ घेण्यासाठी दिनांक 1 जून 2025 पर्यंत अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा पशुसंवर्धन उपआयुक्त डॉ. एस. डी. पाठक यांनी केले आहे.

नाविन्यपूर्ण राज्यस्तरीय व जिल्हास्तरीय योजनेंतर्गत दुधाळ गाई- म्हशींचे गट वाटप करणे. शेळी-मेंढी गट वाटप करणे, 1 हजार मांसल कुक्कुट पक्षांच्या संगोपनासाठी निवारा शेड उभारणीस अर्थसहाय्य देणे, 100 कुक्कुट पिलांचे वाटप व 25+3 तलंगा गट वाटप या योजनांसाठी  ऑनलाईन पध्दतीने लाभार्थी निवड प्रक्रिया सन 2025-26 या वर्षात राबवली जाणार आहे. यामध्ये शासनाने एखा‌द्या योजनेकरिता अर्ज केल्यानंतर त्यास दरवर्षी पुन्हा अर्ज करावे लागू नये यासाठी तयार केलेली प्रतिक्षा यादी सन 2021-22 पासून पुढील  वर्षापर्यंत म्हणजे सन 2025-26 पर्यंत लागू ठेवण्याची सोय केली आहे. यामुळे अर्ज केलेल्या पशुपालकांना लाभ मिळण्याची शक्यता वाढली असून, त्याची प्रतिक्षा यादीतील क्रमांकानुसार अंदाजे केव्हा लाभ मिळेल हे कळु शकल्यामुळे लाभार्थी हिस्सा भरणे किंवा इतर बाबीकरिता नियोजन करता येणे शक्य होणार आहे. ऑनलाइन अर्ज भरण्यासाठी संकेतस्थळ htips/ah.mahabms.com तसेच AH  MAHABMS या अँड्रॉइड मोबाईलवरील ॲप्लिकेशनवर (Googal play स्टोअर वरील मोबाईल ॲपवर उपलब्ध ) दिनांक 1 जून 2025 पर्यंत अर्ज करता येणार असून यासाठी टोल फ्री क्रमांक 1962 असा आहे.

योजनेची संपूर्ण माहिती तसेच अर्ज करण्याची पद्धती याबाबतचा संपूर्ण तपशील वरील संकेतस्थळावर तसेच मोबाईल ॲपवर उपलब्ध आहे. अर्ज फक्त ऑनलाईन पद्धतीने स्वीकारले जातील. या संगणक प्रणालीमध्ये अर्ज भरणे अत्यंत सुलभ करण्यात आले असून  अर्जा मधील माहिती कमीत कमी टाईप करावी लागेल आणि बहुतांशी माहिती बाबत पर्याय निवडण्याची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. त्यामुळे पशुपालकांनी अर्ज भरण्याकरता स्वतःच्या मोबाईलचा जास्तीत जास्त वापर करावा. अर्ज भरताना अर्जदाराने नोंदवलेल्या मोबाईल क्रमांकावर अर्जाच्या स्थितीबाबत संदेश पाठवण्यात येणार असल्याने कोणत्याही परिस्थितीत अर्जदारांनी योजनेअंतर्गत आपला मोबाईल क्रमांक बदलू नये व मागील वर्षी अर्ज केलेल्या अर्जदारांनी पुन्हा अर्ज करावयाची आवश्यकता नाही. योजनेबाबत अधिक माहितीसाठी टोल फ्री क्रमांक 1962 वर किंवा तालुक्याचे पशुधन विकास अधिकारी, (विस्तार) पंचायत समिती, जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी  अद्य उपायुक्त कार्यालय, तालुका लघू पशुवैद्यकीय सर्व चिकित्सालय अथवा नजीकच्या पशुवैद्यकीय केंद्रात संपर्क साधावा असे आवाहन पशुसंवर्धन विभागातर्फे करण्यात आले आहे.
================

Saturday, May 24, 2025

एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान अंतर्गत शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर अर्ज करावेत

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
एकात्मिक फलोत्पादन विकास अभियान सन २०२५-२६ अंतर्गत कोल्हापूर जिल्ह्याकरिता २२३.०८ लाख इतका कार्यक्रम मंजूर असून क्षेत्र विस्तार कार्यक्रम घटकांतर्गत एकूण रु. १५.६६ लाख रकमेची तरतूद करण्यात आली आहे. त्यानुसार फळे, फुले, मसाला लागवड, अळिंबी उत्पादन प्रकल्प व जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन हा घटक राबविण्यात येत आहे. सर्व शेतकऱ्यांनी विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व अळिंबी उत्पादन प्रकल्प उभारणी करणे, आंबा, चिकू, संत्रा, मोसंबी, लिंबु, पेरु, आवळा या फळ पिकांच्या बागा असलेल्या अधिकाधिक शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टल mahadbtmahait.gov.in वर फलोत्पादन या घटकाखाली अर्ज करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी जालिंदर पांगरे यांनी केले आहे. यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला लागवड व आंबा, चिकू, संत्रा व मोसंबी, लिंबु, पेरु, आवळा या फळ पिकांच्या जुन्या फळ बागांचे पुनरुज्जीवन करणे तसेच अळिंबी उत्पादन प्रकल्प उभारणी करणे या बाबींचा समावेश आहे. राज्यामध्ये विदेशी फळे, फुले, मसाला या पिकांचे क्षेत्र व उत्पादन वाढविणे तसेच जुन्या फळ बागांची उत्पादकता वाढविणे या दृष्टीने हा कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या घटकांचे अनुदान खालीलप्रमाणे आहे.

फुले लागवड - कट फ़्लॉवर्स- (गुलाब,ऍ़स्टर, बर्ड ऑफ पॅराडाईज, हेलिकोनियास, गोल्डनरॉड, शेवंती इ.),  खर्चमर्यादा - रु.1 लाख 25 हजार प्रतिहेक्टर, आर्थिक मापदंड - एकुण खर्चाच्या 40 टक्के 60:40 या प्रमाणात दोन हप्त्यात,कमाल रु.50 हजार प्रतिहेक्टर

कंदवर्गीय फुले- (निशिगंध, ग्लॅडीओलस, लिलिज, लिलियम, कॅलालिली, डेलिया इ.), खर्चमर्यादा - रु.2 लाख 50 हजार 50 हजार  प्रतिहेक्टर, आर्थिक मापदंड- एकुण खर्चाच्या 40 टक्के 60:40 या प्रमाणात दोन हप्त्यात, कमाल रु. 1 लाख प्रतिहेक्टर

सुटी फुले- (झेंडू, ऍ़स्टर, गॅलार्डिया,हेलिक्रायसम, शेवंती, मॊगरा, जाई, जुई, झिनिया, बिजली इ.), खर्चमर्यादा - रु.50 हजार प्रतिहेक्टर, आर्थिक मापदंड- एकुण खर्चाच्या 40 टक्के 60:40 या प्रमाणात दोन हप्त्यात,कमाल रु. 20 हजार प्रतिहेक्टर

मसाला पिक लागवड-  बियावर्गीय एव कंदवर्गिय मसाला पिके (मिरची, हळद व आले)- खर्चमर्यादा - रुपये 50 हजार प्रतिहेक्टर, आर्थिक मापदंड- एकुण खर्चाच्या 40 टक्के 60:40 या प्रमाणात दोन हप्त्यात, कमाल रु.20 हजार प्रतिहेक्टर

बहुवर्षिय मसाला पिके (काळीमिरी, कोकम इ.) - खर्चमर्यादा - रु.1 लाख प्रतिहेक्टर, आर्थिक मापदंड- एकुण खर्चाच्या 40 टक्के 60:40 याप्रमाणात दोन हप्त्यात, कमाल रु.40 हजार प्रतिहेक्टर

विदेशी फळ पिक लागवड- ड्रॅगनफ्रुट- खर्चमर्यादा - रु.6 लाख 75 हजार प्रतिहेक्टर, आर्थिक मापदंड- एकुण खर्चाच्या 40 टक्के 60:40 या प्रमाणात दोन हप्त्यात, कमाल रु.2 लाख 70 हजार प्रतिहेक्टर

स्ट्रॉबेरी- खर्चमर्यादा - रु. 2 लाख प्रतिहेक्टर, आर्थिक मापदंड- एकुण खर्चाच्या 40 टक्के 60:40 या प्रमाणात दोन हप्त्यात,कमाल रु.80 हजार प्रतिहेक्टर

अवॅकॅडो- खर्चमर्यादा - रु.1 लाख 25 हजार प्रतिहेक्टर, आर्थिक मापदंड- एकुण खर्चाच्या 40 टक्के 60:40 या प्रमाणात दोन हप्त्यात,कमाल रु.50 हजार प्रतिहेक्टर

जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन :
जुन्या फळबागांचे पुनरुज्जीवन- खर्चमर्यादा - रु.60 हजार प्रतिहेक्टर, आर्थिक मापदंड- खर्चाच्या 40 टक्के व जास्तीत-जास्त रू.24 हेक्टर प्रतिहेक्टर

अळिंबी उत्पादन प्रकल्प- खर्चमर्यादा - रु.30 लाख प्रतियुनिट, आर्थिक मापदंड- खर्चाच्या 40 टक्के व जास्तीत-जास्त रू.12 लाख प्रतियुनिट

बटन अळिंबी उत्पादनासाठी कंपोस्ट प्रकल्प-  खर्चमर्यादा - रु.30 लाख प्रतियुनिट, आर्थिक मापदंड- खर्चाच्या 40 टक्के व जास्तीत-जास्त रू.12 लाख प्रतियुनिट


कमी खर्चाचे अळिंबी उत्पादन केंद्र- खर्चमर्यादा - रु. 2 लाख प्रतियुनिट, आर्थिक मापदंड- खर्चाच्या 50 टक्के व जास्तीत-जास्त रू.1 लाख प्रतियुनिट


योजनेच्या अधिक माहितीसाठी संबधित नजीकच्या कृषी कार्यालयाशी संपर्क साधावा, असे आवाहन कृषी उपसंचालक नामदेव परीट यांनी केले आहे.
===================

दूधगंगा वेदगंगा साखर कारखान्याच्या इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
बिद्री (ता. कागल) येथील दूधगंगा वेदगंगा सहकारी साखर कारखाना(मौनीनगर) येथील इथेनॉल निर्मिती प्रकल्पाचे उद्घाटन उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते व वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली फित कापून व कोनशिलेचे अनावरण करुन संपन्न झाले. यावेळी माजी गृह राज्यमंत्री आमदार सतेज पाटील, माजी आमदार बजरंगआण्णा देसाई, माजी आमदार संजयबाबा घाटगे, कारखान्याचे चेअरमन माजी आमदार के. पी. पाटील, व्हाईस चेअरमन मनोज फराकटे, सर्व संचालक मंडळ, प्रादेशिक साखर सहसंचालक जी. जी. मावळे, कार्यकारी संचालक के. एस. चौगुले, व्यवस्थापकीय संचालक आर. डी. देसाई, गोकूळचे संचालक युवराज पाटील, अंबरिष घाटगे, शशिकांत पाटील-चुयेकर, प्रा. किसन चौगले, केडीसीसीचे संचालक भैय्या माने यांच्यासह कारखाना कार्यक्षेत्रातील विविध संस्थांचे पदाधिकारी, सभासद, कर्मचारी उपस्थित होते.

भारताच्या इथेनॉल धोरणाने उसाचा रस आणि मोलॅसेसपासून इथेनॉलच्या उत्पादनाला प्रोत्साहन देऊन साखर उद्योगाचा कायापालट केला आहे. देशांतर्गत इथेनॉलचे उत्पादन करुन, भारताने आयातित कच्च्या तेलावरील आपले अवलंबित्व कमी केले आहे, त्यामुळे मोठ्या प्रमाणावर परकीय चलनाची बचत झाली आहे. इथेनॉल हे पेट्रोलच्या तुलनेत स्वच्छ इंधन आहे, ज्यामुळे हरितगृह वायूचे उत्सर्जन कमी होते. ऊस शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनासाठी हमीभावाची बाजारपेठ उपलब्ध आहे, ज्यामुळे उत्पन्न स्थिरता येते आणि वेळेवर पैसेही मिळतात.

बिद्री कारखान्याच्या सन २०१७ - १८ च्या वार्षिक सभेत प्रतिदिन ६० हजार लिटर क्षमतेचा इथेनॉल प्रकल्प उभारण्यास सभासदांनी मंजुरी दिली आहे. यासाठी केंद्र व राज्य सरकारच्या आवश्यक त्या सर्व परवानग्या घेतल्यानंतर सुमारे १३८ कोटी रुपये खर्चून अद्ययावत इथेनॉल प्रकल्प कारखाना कार्यस्थळावर साकारण्यात आला आहे. या प्रकल्पातून प्रत्यक्ष उत्पादन सुरु झाले असून प्रकल्पाचा गतवर्षी चाचणी हंगाम यशस्वी पार पडला आहे. साखर कारखान्यात इथेनॉल तयार केल्याने मोलॅसेसचा योग्य वापर, आर्थिक लाभ, पर्यावरण संरक्षण आणि शेतकऱ्यांचा फायदा असा चौफेर उपयोग होतो. यासाठीच या साखर कारखान्यात इथेनॉल निर्मिती करण्यात येणार आहे, अशी माहिती कारखान्याचे चेअरमन माजी आमदार के. पी. पाटील यांनी दिली.
===============

Friday, May 23, 2025

इचलकरंजीसह परिसराच्या विकासासाठी सर्वतोपरी मदत करु : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, 713 कोटी रुपयांच्या विविध विकास कामांचे उद्घाटन, शुभारंभ व लोकार्पण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क :
शहरांच्या विकासाच्या योजनांसाठी राज्य शासन कटिबद्ध असून लोकप्रतिनिधींकडून आलेल्या सर्व प्रस्तावांना न्याय देण्याचे शासनाचे धोरण आहे. त्याअनुषंगाने इचलकरंजीच्याही विकासासाठी सर्वतोपरी मदत करु, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. त्यांच्याहस्ते इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 713 कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचे उद्घाटन, शुभारंभ व लोकार्पण संपन्न झाले.

यावेळी  सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री कोल्हापूर प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशील माने, आमदार राहुल आवाडे, आमदार अशोकराव माने, आमदार शिवाजीराव पाटील, माजी मंत्री प्रकाश आवाडे, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉ.शशिकांत माहुरकर, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, इचलकरंजी महानगरपालिका आयुक्त पल्लवी पाटील, उप विभागीय अधिकारी इचलकरंजी मोसमी चौगुले उपस्थित होत्या. यावेळी पालकमंत्री व जिल्ह्याधिकाऱ्यांनी त्यांना करवीर निवासिनी श्री अंबाबाई देवीची प्रतिमा भेट दिली.

यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते शहापूर पोलीस स्टेशनच्या कोनशिलेचे अनावरण झाले, तसेच त्यांनी नूतन इमारतीची पाहणीही केली. उपस्थितांना संबोधित करताना मुख्यमंत्री म्हणाले, इचलकरंजी व परिसराच्या विकासाबद्दल जे काही प्रस्ताव येतील त्याला तातडीने मान्यता देण्यात येईल. यावेळी आमदार राहुल आवाडे यांनी एकाच वेळी मोठ्या प्रमाणात कार्यक्रमाचे आयोजन केल्याबद्दल त्यांचे कौतुकही त्यांनी केले. यावेळी इचलकरंजी विधानसभा मतदारसंघातील 713 कोटी रुपयांहून अधिक विविध विकास कामांचे ऑनलाईन उद्घाटन, शुभारंभ व लोकार्पण झाल्याची घोषणा त्यांनी केली.

यात 130.60 कोटी रुपयांच्या केंद्र शासन पुरस्कृत लघु व मध्यम नगरांसाठी नागरी पायाभूत सुविधा विकास योजना (UIDSSMT) अंर्गत इचलकरंजी शहरातील वाढीव कबनूर व शहापूर भागासाठी भूयारी गटार योजना राबविणे व 18 द.ल.ली. क्षमतेचे मलशुद्धीकरण केंद्राचे लोकार्पण, 488.67 कोटी रुपयांच्या नगरोत्थान महाभियान अंतर्गत अस्तित्वातील भूयारी गटार योजनेचे बळकटीकरण करणे व योजना विकसित करणे या कामाचे उद्घाटन, 31.37 कोटी रुपयांच्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान अंतर्गत शहरात विविध ठिकाणी एकूण सहा पाण्याच्या टाक्या उभारणे, पंपिंग मशीन तसेच दाबनलिका टाकणे इ. कामांचे उद्घाटन, 59 कोटींच्या मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेअंतर्गत 10 रस्ते कामांचे भूमिपूजन, 4 कोटींच्या शहापूर पोलीस स्टेशनचे उद्घाटन, तसेच इंदिरा गांधी सामान्य रुग्णालयातील नर्सिंग कॉलेजचे उद्घाटन करण्यात आले.
===================

Thursday, May 22, 2025

गारगोटी येथील मागास व आर्थिकदृष्टया मागास मुलींच्या शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश सुरु

गारगोटी, विकास न्यूज नेटवर्क :
सामाजिक न्याय व विशेष सहाय विभागा अंतर्गत मुलींचे शासकीय वसतिगृह, गारगोटी, ता-भुदरगड येथील मागास व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृहात मोफत प्रवेश देण्याची प्रक्रिया सुरु झाली आहे. सन 2025-26 मध्ये इ. 8 वी पासून ते उच्च शिक्षणापर्यंत प्रवेश दिला जात असून वसतिगृहात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थीनींनी मागास व आर्थिकदृष्ट्या मागास मुलींचे शासकीय वसतिगृह, के. डी. देसाई कॉलनी, गारगोटी , ता. भुदरगड, जि. कोल्हापूर या वसतिगृहाशी संपर्क साधावा असे आवाहन वसतिगृहाच्या गृहपालांनी केले आहे.

वसतिगृहात अनुसूचित जाती, असूसुचित जमाती, विमुक्त जाती व भटक्या जमाती, विशेष मागासवर्गीय, इतर मागास व आर्थिकदृष्टया मागास, अपंग, अनाथ प्रवर्गातील विद्यार्थिनींना राहण्याची तसेच जेवणाची व्यवस्था मोफत केली जाते. तसेच दरमहा 600 रुपये निर्वाहभत्ता, गणवेश भत्ता, स्टेशनरी भत्ता व सहल भत्ता दिला जातो. अधिक माहितीसाठी 02324-220677 वर संपर्क साधावा.
=============

ऑल इंडिया सैनिक स्कूल एन्ट्रांन्स एक्झाम 2025 मध्ये व्यंकटरावच्या सौश्रुती पुंडपळची निवड


आजरा,  विकास न्यूज नेटवर्क :
ऑल इंडिया सैनिक स्कूल एंट्रांन्स एक्झाम 2025 चा निकाल नुकताच जाहीर झाला. यामध्ये व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेतील इयत्ता आठवी  मध्ये शिकणारी सौश्रुती अमित पुंडपळ ही (ऑल इंडिया रँक 1044 वा नंबर) पात्र ठरली. या विद्यार्थिनीला व्यंकटराव प्रशालेतील सौ. ए. डी. पाटील, श्री. पी. एस. गुरव व श्री. व्ही. ए. चौगुले व श्रीम. एम. व्ही. बिल्ले यांचे मार्गदर्शन लाभले तसेच प्राचार्य श्री. आर. जी. कुंभार, पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार यांचे प्रोत्साहन लाभले. या यशस्वी विद्यार्थीनीचे, मार्गदर्शक शिक्षक व पालकांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
==============

कोल्हापूर पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची बदली, हे असतील नवे अधीक्षक

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांची ठाणे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झाली आहे. कोल्हापूरचे नवे पोलीस अधीक्षक म्हणून नांदेडचे नागरी संरक्षण हक्क पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता हे रुजू होणार आहेत.

कोल्हापूरचे पोलीस अधीक्षक म्हणून मे 2023 मध्ये महेंद्र पंडित हे रुजू झाले होते. दरम्यान त्यांची ठाणे पोलीस उपायुक्त म्हणून बदली झालीय. गेल्या दोन वर्षात पोलीस अधीक्षक महेंद्र पंडित यांनी चांगली कामगिरी बजावली होती. कोल्हापुरातील अवैध व्यवसायावर कारवाई करीत आपली वेगळी ओळख निर्माण केली होती. त्याचबरोबर अनेक गुन्ह्यांची उकल करून त्यांनी आपली वेगळी चुणूक दाखवली होती. गेल्या दोन वर्षात जिल्ह्यात पार पडलेल्या निवडणुका,मोर्चे, आंदोलन त्यांनी योग्य पद्धतीने हाताळत कायदा व  सुव्यवस्था सुरळीत राखला होता.
==============

Tuesday, May 20, 2025

दहावीच्या गुणपत्रिकांचे 26 मे रोजी वाटप

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या विभागीय मंडळामार्फत फेब्रुवारी -मार्च 2025 मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालांत  प्रमाणपत्र दहावी परीक्षेचा निकाल मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावर दिनांक 13 मे रोजी ऑनलाईन जाहीर करण्यात आला.

फेब्रुवारी -मार्च 2025 मध्ये दहावीच्या परीक्षेच्या गुणपत्रिका व तपशीलवार गुण दर्शविणारे अभिलेख वाटप सर्व मान्यताप्राप्त माध्यमिक शाळांना सोमवार 26 मे रोजी सकाळी 11 वाजता करण्यात येणार असून माध्यमिक शाळांमार्फत त्याच दिवशी दुपारी 3 वाजता विद्यार्थ्यांना गुणपत्रिकांचे वाटप करण्यात येणार आहे, याची सर्व मुख्याध्यापक व विद्यार्थ्यांनी नोंद घ्यावी, असे आवाहन कोल्हापूर विभागीय मंडळाचे विभागीय सचिव  सुभाष चौगुले यांनी केले आहे.
===============

Monday, May 19, 2025

दूध उत्पादन वाढीसाठी राष्ट्रीय दूध मोजणी कार्यक्रम महत्वपूर्ण : गोकुळ दूध संघ चेअरमन अरुण डोंगळे, ‘गोकुळ’तर्फे मिल्क रेकॉर्डर यांना स्मार्ट वजन काटे व साहित्याचे वाटप


कोल्‍हापूर, विकास न्यूज नेटवर्क
भारत सरकारच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन कार्यक्रमांतर्गत दूध मोजणी कार्यक्रम (नॅशनल मिल्क रेकॉर्डिंग प्रोग्रॅम) एन.डी.डी.बी.ने गोकुळ दूध संघास सन २०२४-२५ ते सन २०२६-२७ या सालाकरीता मंजुर केला असून या कार्यक्रमांतर्गत दूध मोजणी करणाऱ्या संघाच्या स्वयंसेवक (मिल्क रेकॉर्डर) यांना स्मार्ट वजन काटे व साहित्याचे वाटप संघाचे चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्ठ संचालक विश्वास पाटील यांच्या हस्ते तसेच संघाचे संचालक व अधिकारी यांच्या उपस्थितीत गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालय येथे करण्यात आले.

यावेळी गोकुळचे चेअरमन अरुण डोंगळे म्हणाले कि, भारत सरकारच्या राष्ट्रीय गोकुळ मिशन कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय दूध मोजणी कार्यक्रम (नॅशनल मिल्क रेकॉर्डीग प्रोग्रॅम) हा दुग्ध व्यवसायाच्या विकासासाठी एक महत्वपूर्ण कार्यक्रम असून यामुळे दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पन्नात वाढ होऊन ग्रामीण अर्थ व्यवस्थेला चालना मिळण्यास मदत होणार आहे. या कार्यक्रमांतर्गत जिल्हयातील गोकुळ संलग्न ३२४० म्हैशी/गाय जनावरांची नोंदणी करून हा कार्यक्रम राबविला जाणार आहे. म्हैशी व गायीचे अनुवंशीक गुणाचा शोध घेणे व या जनावरापैकी उच्च वंशावळीच्या जनावरांची निवड करणे व या जनावराला अधिक उच्चवंशावळीच्या वळूचा वापर करून पुढील पैदास करणे यासाठी निवडलेल्या जनावरांचे दूध उत्पादन क्षमता, दूधाची गुणवत्ता मोजणे तसेच प्रजननाची नोंदणी ठेवणे व दूध उत्पादक शेतकऱ्यांच्यामध्ये जागरूकता निर्माण करून त्यांच्या उत्पन्नामध्ये वाढ करणे हा या कार्यक्रमाचा मुख्य उद्देश असल्याचे चेअरमन अरुण डोंगळे यांनी सांगितले.

या कार्यक्रमासाठी गोकुळच्या ताराबाई पार्क कार्यालय, बोरवडे शीतकरण केंद्र व गडहिंग्लज शीतकरण केंद्रावरती ४५ दूध मोजणी व तपासणी सेंटरची स्थापन केली असून प्रत्येक दूध तपासणी सेंटरवर एक आहार संतुलन कार्यक्रमामधील (आर.बी.पी.) स्वयंसेवकांची दूध तपासणीस (मिल्क रेकॉर्डर) म्हणुन नियुक्त केली आहे. त्यांच्यामार्फत निवडलेल्या जनावरांची महिन्यातून एकदा दूध, फॅट व एस.एन.एफ.ची मोजणी व तपासणी ११ महिने केली जाणार आहे. तसेच ६ दूध मोजणी झालेनंतर जनावरांच्या रक्ताचे नमुने घेवून त्यांच्यातील आनुवंशिक गुणाच्या तपासणीसाठी डी. एन. ए. तपासणी केली जाणार आहे. या मिल्क रेकॉर्डनां मिल्क रेकॉर्डींगसाठी स्मार्ट वजन काटे देणेत आले असून या वजन काट्यावरून ब्लुटूथ च्या माध्यमातून थेट दूधाचे वजन भारत पशुधन अॅप्लिकेशन मध्ये जाणार आहे. तसेच दुधाचे नमुने संघाच्या ताराबाई पार्क येथे मिल्क स्कॅनर मशिनद्वारे दुधाची गुणप्रत तपासून त्याची नोंद भारत पशुधन अॅप्लीकेशनमध्ये केली जाणार आहे. हा कार्यक्रम एन.डी.डी.बी.च्या मार्गदर्शना खाली चालू असल्याचे डॉ. दयावर्धन कामत यांनी सांगितले.

यावेळी चेअरमन अरुण डोंगळे, ज्येष्‍ठ संचालक विश्वास पाटील, संचालक अजित नरके, शशिकांत पाटील–चुयेकर, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, सुजित मिणचेकर, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, राजेंद्र मोरे, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, व्यवस्थापक पशुसंवर्धन डॉ.प्रकाश साळुंके, डॉ.दयावर्धन कामत, डॉ.प्रकाश दळवी, डॉ.रणजीत चोपडे व संघाचे अधिकारी, स्वयंसेवक एल.आर.पी.महिला आदि उपस्थित होते.
==================

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...