Monday, May 26, 2025

पावसाचा रेड अलर्ट, ऑरेंज अलर्ट, येलो अलर्ट; पावसाच्या अलर्टचा नेमका अर्थ काय? जाणून घ्या..

विकास न्यूज नेटवर्क :
एखाद्या भागात जेवढा पाऊस पडण्याची शक्यता असते, त्या शक्यतेवरुन पावसाबाबतचे रेड, ऑरेंज, यलो, ग्रीन अलर्ट देण्यात येतात. पावसाळा सुरू झाला की पावसाच्या या अलर्टच्या बातम्या सुरू होतात. हे अलर्ट प्रशासनासाठी, त्या त्या जिल्ह्यातल्या महापालिकांसाठी, स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी तर असतातच, मात्र पावसाच्या या अलर्ट नुसार नागरिकांनी काय खबरदारी घ्यायची, हे ठरवायचं असतं.

रेड अलर्ट :
रेड अलर्ट हा धोक्याची सूचना दर्शवितो. हा अलर्ट पावसाचा सर्वोच्च अलर्ट असतो. हा अलर्ट दिल्यावर २०४ मिलिमीटर किंवा त्यापेक्षा जास्त पाऊस पडू शकतो. म्हणजेच अतिमुसळधार पाऊस पडून अतिवृष्टी होऊ शकते, पूर येऊ शकतो, भूस्खलन होऊ शकतं किंवा ढगफुटी सुध्दा होऊ शकते. हा अलर्ट दिल्यावर प्रशासनानं, नैसर्गिक आपत्तीची शक्यता लक्षात घेऊन त्याचा मुकाबला करण्यासाठी तयार राहायचं असतं. नदीजवळ, नाल्याजवळ राहणाऱ्या नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवायचं असतं. रेड अलर्ट नुसार नागरिकांनी घराबाहेर पडायचे नाही, तसेच धोकादायक असणाऱ्या भागात जायचं नाही.

ऑरेंज अलर्ट :
ऑरेंज अलर्ट मध्ये ११५ मिलिमीटर ते २०४ मिलिमीटर पावसाची शक्यता असते, म्हणजेच मुसळधार पावसाची शक्यता असते, एखादी नैसर्गिक आपत्ती येऊ शकते. या दरम्यान वीज पुरवठा खंडित होऊ शकतो, मुसळधार पावसामुळे वाहतूक कोंडी होऊ शकते. त्या दृष्टीनं प्रशासनाने आधीच उपाययोजना करायच्या असतात, तर नागरिकांनी गरज असेल तरच घराबाहेर पडायचं असतं.

यलो अलर्ट :
यल्लो अलर्ट मध्ये ६४ मिलिमीटर ते ११५ मिलिमीटर एवढा पाऊस पडण्याची शक्यता असते. यलो अलर्ट असला तरी प्रशासनाला या आपत्तीला तोंड देण्यासाठी सज्ज राहण्याचे आदेश असतात, तर नागरिकांनी या दरम्यान सावधगिरी बाळगायची असते.

ग्रीन अलर्ट :
ग्रीन अलर्ट मध्ये १५ मिलिमीटर ते ६४ मिलीमीटर एवढाच पाऊस पडतो. या परिस्थितीत पाऊस अत्यंत सामान्य असतो. यावेळी प्रशासनानं कुठलेही निर्बंध घालण्याची गरज नसते. तर, या दरम्यान नागरिक प्रवास करू शकतात, नियमित व्यवहार करू शकतात.
=================

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...