Monday, April 14, 2025

व्यंकटराव हायस्कूल येथे विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्साहात संपन्न

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
माणसाचं आयुष्य समृद्ध व्हावं..एका माणसाने दुसऱ्या माणसाशी माणसासारखे वागावे..व त्याने ताठ मानेनं जगावं एवढं एक छोटं स्वप्न उराशी बाळगत...साऱ्या जगाला...शिका आणि संघटित व्हा..हा मुलमंत्र देतं...हक्क आणि कर्तव्याची जाणीव देऊन गेलेले महामानव विश्वरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची 135 वी जयंती व्यंकटराव हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज आजरा या प्रशालेमध्ये साजरी करण्यात आली. आजरा महाल शिक्षण मंडळ आजराचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांचे हस्ते प्रतिमा पूजन करण्यात आले. यावेळी सचिव अभिषेक शिंपी, संचालक सचिन शिंपी उपस्थित होते.

यावेळी इतिहास शिक्षक एस. वाय. भोये यांनी भारतातील सामाजिक न्यायव्यवस्था या विषयावर आपले विचार मांडताना सांगितले की न्याय ही हिसकावून, भांडून पैसे खर्च करून, मिळवण्याची गोष्ट आहे पण सामाजिक न्यायाचं तसं नाही. सशक्त आणि अशक्त यांच्यातील युद्ध नेहमी विषम असतं. सशक्तच जिंकतो, अशक्त व्यक्तीलाही त्याची शैक्षणिक पात्रता वाढवून कलेक्टर पदापर्यंतही पोहोचण्यासाठी त्याला चांगल्या शाळेत प्रवेश मिळाला पाहिजे. शिक्षकांनी  शिकवलेले त्याला कळले पाहिजे जे कळलं त्याचा परिणाम झाला पाहिजे आणि त्या परिणामाचा परिणाम असा झाला पाहिजे की कलेक्टर होण्याच्या पात्रतेपर्यंत त्याला नेवून ठेवले पाहिजे. इथंच सामाजिक न्यायाची प्रक्रिया सुरू होते. जिथ उगवत नाही तिथं उगवणं ते म्हणजे सामाजिक न्याय होय, असे सांगून त्यांनी राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांनी समाजामध्ये सामाजिक न्याय प्रस्थापित करत असताना प्रत्यक्ष राबविलेल्या विविध योजनांची माहिती दिली.
    
त्यानंतर वासुदेव कांबळे यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा जणू जीवनपटच मांडला व सुमधुर चालीतून व तडफदार वाणीतून बाबासाहेबांच्या जीवनावर छान गीत सादर करत सर्वांना मंत्रमुग्ध केले. संस्थेचे अध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी आपल्या मनोगतामध्ये डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांनी प्रतिकूल परिस्थितीवर मात करत देशात व परदेशात शिक्षण घेतले आणि  या घेतलेल्या शिक्षणाचा, अभ्यासाचा देशाची घटना लिहिण्यासाठी त्यांनी वापर केला. न्याय, समता व बंधुता यावर आधारित लिहिलेली भारतीय घटना ही जगातील विविध राज्यघटनांचा अभ्यास करून  आदर्शपणे साकारली आहे.
   
या कार्यक्रमांसाठी पर्यवेक्षिका सौ. व्ही. जे. शेलार, महाविद्यालयाचे प्र.प्राचार्य पन्हाळकर, भादवण हायस्कूलचे मुख्याध्यापक संजयकुमार पाटील, जुनिअर कॉलेजचे शिवाजी पारळे, एम. ए. पाटील, श्रीम. एन. ए. मोरे, सर्व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते. सूत्रसंचालन पी. व्ही. पाटील यांनी केले. आभार व्ही. एच. गवारी यांनी मानले.
========================

No comments:

Post a Comment

कोल्हापुरी चप्पल्स बाबत गैरसमज पसरवू नयेत : जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्ह्याच्या लौकिकाचा अविभाज्य भाग असलेल्या कोल्हापुरी चप्पलांविषयी काहीही गैरसमज कि...