ऐन शुक्रवारी बाजार दिवशी दुपारी तीन वाजल्यापासून आजरा बसस्थानकातून चाफवडे (ता. आजरा) या गावी जाण्यासाठी एसटी बस नव्हती. त्यातच पाच वाजता जाणारी चाफवडे गाडीही आगार व्यवस्थापनाकडून रद्द करण्यात आली. यावेळी प्रवाशांनी आजरा बस स्थानकावर उपस्थित असलेले वाहतूक नियंत्रक राम मुंडे यांच्याशी संपर्क साधत गाडी बाबत विचारणा केली असता मुंडे यांनी प्रवाशांना चालत गावी जा, अशी भाषा वापरली. त्यामुळे चाफवडे गावचे ग्रामस्थ संतप्त झाले. चाफवडे गावच्या पुरुष व महिला प्रवाशांनी बाजारच्या पिशव्यांसह आजरा बसवतानाच्या दोन्हीही गेटवर ठीय्या मांडत बस स्थानकातून बाहेर जाणाऱ्या गाड्या अडवल्या. यामुळे आजरा बस स्थानकावर सुमारे तासभर तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. आजरा तालुका ग्राहक पंचायत व आजरा तालुका एसटी प्रवासी संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनीही एसटी प्रशासनाला याबाबत जाब विचारला. अखेर आजऱ्याचे पोलीस निरीक्षक नागेश यमगर यांनी पोलीस पथकासह आजरा बस स्थानकावर धाव घेत चाफवडे ग्रामस्थांची समजूत काढली. आजरा आगार व्यवस्थापनाला चाफवडेला जाण्यासाठी गाडीची व्यवस्था करण्यास सांगितल्यानंतर बस स्थानकावरील तणाव निवळला.
दरम्यान आजरा बस स्थानकावर सुमारे तासभर गोंधळाचे व तणावाचे वातावरण असताना देखील आगार व्यवस्थापक प्रवीण पाटील हे आजरा एसटी डेपो मध्ये उपस्थित असतानाही बसस्थानकाकडे फिरकले देखील नाहीत. त्यामुळे आगार व्यवस्थापक प्रवीण पाटील व वाहतूक नियंत्रक राम मुंडे यांच्यावर कारवाईची मागणी तालुक्यातील प्रवासी वर्गातून होत आहे.
No comments:
Post a Comment