देशातील नामवंत शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार जाहीर झाला आहे. राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत विधानसभेत घोषणा केली. राज्य सरकारकडून 'महाराष्ट्र भूषण' हा पुरस्कार दरवर्षी देण्यात येतो. ज्येष्ठ शिल्पकार राम सुतार यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण 2024 पुरस्कार जाहीर करण्यात येत आहे. राम सुतार यांचं वय 100 वर्ष आहे, आजही ते शिल्प तयार करतात अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी सभागृहात दिली.
राम सुतार हे आंतरराष्ट्रीय ख्यातीचे मुक्त शिल्पकार आहेत. यांचा जन्म इ.स.1925 मध्ये धुळे जिल्ह्यातील गोंदूर येथे झाला होता. देशभरात त्यांनी अनेक मोठी शिल्प तयार केली आहेत. त्यामध्ये, पंतप्रधान नरेंद्र मोदींचा ड्रीम प्रोजेक्ट असलेल्या स्टॅच्यू ऑफ युनिटी या देशातील सर्वात उंच शिल्प पुतळ्याचे कामही त्यांनीच केले आहे. राम सुतार हे नामवंत वास्तुविशारद असून त्यांच्या कारकिर्दीच्या गेल्या चाळीस वर्षात पन्नासहून अधिक भव्य शिल्पे तयार केली आहेत. कला क्षेत्रातील योगदानाबद्दल त्यांना 2016 मध्ये पद्मभूषण आणि 1999 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. राम सुतार यांनी जेजे स्कूल ऑफ ओरिएंटमधून आपले शिक्षण पूर्ण केले असून भारतीय पुरातत्व सर्वेक्षणासोबत त्यांनी वेरूळ गुंफांमध्ये काम केले. त्यानंतर, काही वर्षांनी त्यांनी स्वतःचा शिल्पकला व्यवसाय सुरू केला.
===================
No comments:
Post a Comment