देवेंद्र फडणवीस यांची मुख्यमंत्री म्हणून शपथ; शिंदे व पवार उपमुख्यमंत्री
मुंबई, वृत्तसेवा :
भाजप विधिमंडळ नेते देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांच्यासमक्ष त्यांनी शपथ ग्रहण केली. मुंबईच्या आझाद मैदानावर अत्यंत दिमाखदार असा महाशपथविधी सोहळा पार पडला. पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपाध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या उपस्थितीत हा शपथविधी सोहळा पार पडला. यावेळी देवेंद्र फडणवीसांसोबत शिवसेना पक्षप्रमुख एकनाथ शिंदे आणि राष्ट्रवादी पक्षाचे प्रमुख अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली.
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक निकालानंतर जवळपास १० - ११ दिवसांनी मोठ्या राजकीय घडामोडींनंतर मुख्यमंत्रिपदाची घोषणा झाली. भाजपच्या विधीमंडळ गटनेतेपदी एकमुखाने देवेंद्र फडणवीसांची निवड करण्यात आली आणि मी पुन्हा येईन म्हणणारे फडणवीस तिसऱ्यांदा मुख्यमंत्रिपदावर विराजमान झाले आहेत. तर, उपमुख्यमंत्रिपदाबाबत शपथविधीच्या काही तासांपूर्वीपर्यंत घडामोडी घडत होत्या. सकाळपर्यंत एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार की नाही याबाबत संभ्रम होता. मात्र, अखेर फडणवीसांच्या प्रयत्नांना यश आलं आणि एकनाथ शिंदे यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली. तर दुसरे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही शपथ ग्रहण केली.
मुंबईच्या आझाद मैदानावर या शपथविधी सोहळ्यासाठी जय्यत तयारी करण्यात आली होती. भव्य असा मंच आणि भलामोठा मांडव आझाद मैदानात टाकण्यात आला होता. या सोहळ्यासाठी देशभरातील विविध राज्यांच्या मुख्यमंत्र्यांना निमंत्रण देण्यात आलं होतं. यावेळी मंचावर भाजपचे बडे नेते उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अर्थमंत्री निर्मला सीतारामण, पियुष गोयल, केंद्रीय मंत्री रक्षा खडसे, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, यांच्यासह देशातील विविध राज्यांचे मुख्यमंत्री उपस्थित होते. त्याशिवाय, उद्योगपती अनिल अंबानी, अनंत अंबानी, राधिका मर्चंट, शाहरुख खान, सलमान खान, रनवीर सिंह, माधुरी दिक्षित, सचिन तेंडुलकर देखील या शपथविधीला उपस्थित होते.
===================
No comments:
Post a Comment