आजऱ्यामध्ये "भगवा रक्षक"च्या वतीने नवरात्री निमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन
आजरा, वृत्तसेवा :
आजरा येथील "भगवा रक्षक"च्या वतीने शारदीय नवरात्र उत्सवानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मंडळाचे यंदाचे 28 वे वर्ष आहे. या मंडळाच्या आजऱ्यातील नवसाला पावणाऱ्या मानाच्या देवीच्या आगमनाच्या वेळच्या शाही मिरवणुकीमध्ये केरळचे सुप्रसिद्ध चेंदा मेलम ड्रम्स खास आकर्षण राहणार आहे.
भगवा रक्षकच्या वतीने गेली 28 वर्षे आजरा शहरातील सोमवार पेठ येथे नवरात्र उत्सवाचे आयोजन करण्यात येते. दरवर्षी मंडळाच्या वतीने भरगच्च कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. याही वर्षी विविध कार्यक्रमांची रेलचेल असणार आहे. गुरुवार दि. 3 ऑक्टोबर रोजी मानाच्या देवीची शाही मिरवणूक व प्राणप्रतिष्ठा कार्यक्रम होणार आहे. यावेळी आजरा तालुक्यात प्रथमच देशाच्या दक्षिण भागातील सुप्रसिद्ध केरळचे चेंदा मेलम ड्रम्स पथक सहभागी होणार आहेत. शनिवार दि. 5 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता प्रसिद्ध रील स्टार व हिप्नॉटिझम राज गोंधळी यांचा हिप्नॉटिझमचा कार्यक्रम होणार आहे. रविवार दि. 6 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता स्थानिक मुलांचा रेकॉर्ड डान्स स्पर्धा होणार आहे. मंगळवार दि. 8 ऑक्टोबर रोजी दुपारी चार वाजता महिलांसाठी हळदीकुंकू, महाआरतीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच महिलांसाठी होम मिनिस्टर या स्पर्धात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे सूत्रसंचालन राजेश माने (निपाणी) हे करणार आहेत. गुरुवार दि. 10 ऑक्टोबर रोजी सकाळी सत्यनारायण पूजा, दुपारी बारा ते तीन या वेळेत महाप्रसाद, सायंकाळी सहा वाजता फडके बंधूंचे भजन, रात्री नऊ वाजता बाल प्रबोधनकार पृथ्वीराज चव्हाण यांचा प्रबोधनाचा कार्यक्रम होणार आहे. शुक्रवार दि. 11 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता अलंकार निर्मित रसिक रंजन मराठी व हिंदी गीत नृत्याविष्कार भव्य असा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. शनिवार दि. 12 ऑक्टोबर रोजी रात्री नऊ वाजता दसरा महोत्सव व देवीची विसर्जन मिरवणूक होणार आहे. याशिवाय शुक्रवार 4 ऑक्टोबर, सोमवार 7 ऑक्टोबर व बुधवार 9 ऑक्टोबर रोजी रास दांडिया कार्यक्रमाचेही आयोजन करण्यात आलेले आहे. देवीची दैनंदिन आरती सकाळी आठ वाजता व सायंकाळी साडेसात वाजता होईल. या सर्व कार्यक्रमांमध्ये सहभागी होण्याचे आवाहन भगवा रक्षकचे संस्थापक संजयभाऊ सावंत, भगवा रक्षक शारदीय नवरात्र उत्सव कमिटी अध्यक्ष रवी तळेवाडीकर, उपाध्यक्ष अतुल पाटील, भगवा रक्षक तरुण मंडळाचे अध्यक्ष अभिजीत भातकांडे, उपाध्यक्ष सुधीर मनोळकर, सचिव संदीप नाईक, प्रदीप पाचवडेकर यांनी केले आहे.
=======================
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब......
(संपर्क : 7410168989)
=====================
No comments:
Post a Comment