आजऱ्यातील टोलमुक्तीच्या लढ्यात मी जनतेबरोबर : आमदार प्रकाश आबिटकर
संकेश्वर-बांदा महामार्गासाठी आजरा तालुका वासियांचा मोठा त्याग आहे. एवढे असूनही टोलचे भूत आजरा तालुक्यावरच लादले जात आहे. महामार्गाचे काम परिपूर्ण झाले नसतानाही टोल नाका उभारणीचे गौड बंगाल काय तसेच टोल वसुलीची घाई का? आजरा तालुक्यातील नागरिकांनी टोलच्या विरोधात उभारलेले आंदोलन योग्यच असून या टोलमुक्तीच्या लढ्यात मी जनतेबरोबर असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते आजरा तहसील कार्यालयात टोलबाबत आयोजित बैठकीत बोलत होते. महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता मधाळे, भुदरगड आजरा प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीला तालुक्यातील नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती.
तालुका वासियांच्या वतीने भूमिका स्पष्ट करताना कॉ. संपत देसाई म्हणाले, महामार्गाच्या कामासाठी जर केंद्र शासनाने निधी दिला असेल तर टोल आकारणी कशासाठी? तरीही निधीचे कारण सांगून टोल आकाराने होत असेल तर राज्य शासनाने केंद्र शासनाला पैसे देऊन निधीचा विषय निकाली काढावा. आजरा तालुक्यातील नागरिक कोणत्याही परिस्थितीत टोल भरणार नाहीत. या टोलच्या संदर्भात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक होऊन टोलबाबत धोरण ठरण्याची गरज आहे. आमदार आबिटकर पुढे म्हणाले, टोलला जनतेचा विरोध आहे त्यामुळे यापुढे टोलचे कोणतेही काम करायचे नाही. टोल रद्द होण्यासाठी शासकीय पातळीवरील व कायदेशीर लढाई लढण्यासाठी देखील आम्ही सज्ज आहोत. तसेच प्रशासकीय पातळीवर देखील टोलच्या संदर्भात कोणती हालचाल करण्यात येऊ नये असे त्यांनी सांगितले. हा यावेळी झालेल्या चर्चेत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई, जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, भाजपचे सुधीर कुंभार, प्रभाकर कोरवी, माजी उपनगराध्यक्ष विलास नाईक यांच्यासह नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी तहसीलदार समीर माने, आजरा साखर अध्यक्ष वसंतराव धुरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंत शिंपी, गटविकास अधिकारी ढमाळ, आजरा नगरपंचायत मुख्याधिकारी सुरज सुर्वे, जनार्दन टोपले, विष्णुपंत केसरकर, भाजपचे तालुकाध्यक्ष बाळ केसरकर, दशरथ अमृते, विजय पाटील, अभिषेक शिंपी, जी. एम. पाटील, जितू भोसले यांच्यासह विविध गावचे सरपंच, नागरिक, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी उपस्थित होते.
चौकट...
शक्तिपीठ महामार्गाबाबत बोलताना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, मतदार संघाचा विकास व्हावा यासाठी मतदार संघातून शक्तिपीठ जावा याकरता आग्रह धरणारा मीच होतो. मात्र या शक्तिपीठाला लोकांचा विरोध सुरू झाल्यानंतर हा शक्तिपीठ थांबला पाहिजे हे सांगणारा देखील मीच आहे. मतदार संघाचा विकास करत असताना लोकांचा विरोध डावलून कोणतेही काम करण्यात येणार नसल्याचेही यावेळी आमदार आबिटकर यांनी स्पष्ट केले.
================
No comments:
Post a Comment