Friday, June 28, 2024

महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये; वर्षाला तीन सिलेंडर मोफत, अजित पवार यांची घोषणा


महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये; वर्षाला तीन सिलेंडर मोफत, अजित पवार यांची घोषणा
मुंबई, वृत्तसंस्था :

महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करण्यात आली आहे. त्यानुसार वय वर्षे २१ ते ६० वयोगटातील पात्र महिलांना प्रतिमाह १५०० रुपये देणार असल्याची घोषणा उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी केली आहे. त्याचबरोबर पात्र कुटुंबांना वर्षाला तीन गॅस मोफत देणार असल्याची घोषणाही पवार यांनी केली.
महाराष्ट्र विधानसभेची सार्वत्रिक निवडणूक येत्या सप्टेंबर ऑक्टोबर महिन्यात होणार आहे. त्यामुळे या निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून राज्य सरकारकडून महिलांना खूश करण्यासाठी त्यादृष्टीने महत्त्वाच्या घोषणा करण्यात आल्या. लाडली बहना योजनेने भारतीय जनता पक्षाला मध्य प्रदेश राज्य जिंकवून दिल्याने महाराष्ट्रातली विधानसभा निवडणुकीमध्ये त्याचीच पुनरावृत्ती होण्यााची विद्यमान राज्य सरकारला अपेक्षा असल्याने महिला वर्गाला आकृष्ट करण्यासाठी राज्य सरकारकडून घोषणांचा पाऊस पाडला गेला. यात मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना, मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना तसेच महिलांसाठी पिंक रिक्षा खरेदी योजना आदी घोषणा करण्यात आल्या.

महिलांना दर महिन्याला दीड हजार रुपये देणार
स्त्री हा कुटुंबाचा आधार असते. आता ती समाजाचा केंद्रबिंदू होते आहे. कुटुंबाचे व्यवस्थापन आणि अर्थार्जन अशा दोन्ही आघाड्यांवर ती लढते आहे. एकहाती कुटुंब सांभाळणाऱ्या आणि कर्तबगार पुरुष घडविणाऱ्या महिलाही आपल्याला पहायवला मिळतात. वेगवेगळ्या परिक्षांच्या निकालांवेळी तर मुलींची आघाडी आता नित्याची झाली आहे. अशा आपल्या कर्तृत्ववान माय भगिनींना संधीची कवाडे खुली करणे आणि प्रोत्साहन देणे हे सरकार म्हणून आमचे कर्तव्य असल्याचे सांगत त्यांच्यासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना जाहीर करुन त्यांअंतर्गत वय वर्षे २१ ते ६० वयोगटातील महिलांना प्रतिमाह १५०० रुपये देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले. या योजनेसाठी ४६ हजार कोटींच्या निधीची घोषणा करण्यात आली असून जुलै महिन्यापासून योजनेची अंमलबजावणी करण्यात येणार आहे.
 
मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतंर्गत महिलांना दरवर्षी तीन सिलिंडर मोफत देण्यात येणार असून, याचा अंदाजे दोन कोटी कुटुंबांना फायदा होणे अपेक्षित आहे. महिलांच्या आरोग्याच्या तक्रारी कमी करायच्या असतील तर त्यांना स्वच्छ इंधन देणे ही आपली जबाबदारी आहे, असे सांगत एलपीजी सर्वांत सुरक्षित असल्याने इंधनाचा वापर वाढला पाहिजे. त्यामुळए गॅस सिलेंडर प्रत्येक घराला परवडला पाहिजे यासाठी पात्र कुटुंबाला तीन गॅस मोफत देणार असल्याचे अजित पवार यांनी सांगितले.
================

Monday, June 24, 2024

आजरेकरांचा एकच निर्धार, टोल हद्दपार... विराट मोर्चाद्वारे टोलला विरोध, आजरा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद

आजरेकरांचा एकच निर्धार, टोल हद्दपार...
 विराट मोर्चाद्वारे टोलला विरोध, आजरा बंदला उत्स्फूर्त प्रतिसाद 
 आजरा, वृत्तसेवा : 

 संकेश्वर-बांदा महामार्गासाठी आजरा एमआयडीसी येथे उभारलेल्या टोल नाक्यावर आजरा तालुक्यातील जनतेला टोलमुक्ती मिळावी यासह टोल हद्दपार झाला पाहिजे, अशी मागणी विराट मोर्चाद्वारे आजरा तालुक्यातील नागरिकांनी केली. या मोर्चामध्ये शेकडो नागरिक सहभागी झाले होते. या मोर्चाचे नेतृत्व संकेश्वर बांदा महामार्ग टोलमुक्ती संघर्ष समितीने केले. टोलविरोधी आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर पुकारण्यात आलेल्या आजरा बंदलाही उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.
 टोलविरोधी आंदोलन मोर्चाला आजरा आंबोली रोडवरील हॉटेल मिनर्वा येथून सुरुवात झाली. मोर्चात सहभागी झालेल्या नागरिकांनी टोलविरोधाच्या घातलेल्या टोप्या लक्षवेधी ठरल्या. आजरा तालुक्यातील जनतेला टोल माफी मिळालीच पाहिजे, टोल रद्द झाला पाहिजे यासह विविध घोषणा देत विराट मोर्चाने नागरिक टोल नाक्यावर येऊन धडकले. या ठिकाणी मोर्चाचे रूपांतर सभेत झाले. टोल मुक्ती आंदोलनाबाबत भूमिका स्पष्ट करताना कॉ. संपत देसाई म्हणाले, महामार्गामुळे प्रवास सुखकर होईल, याकरता सर्वांनी महामार्गाच्या कामाला सहकार्य केले. मात्र टोलचे भूत आमच्या मानगुटीवर लादले गेले आहे. पण आम्हाला टोल माफी हवी आहे. राज्यमार्गाच्या कामाला ठेकेदार मिळत नसल्याने हा रस्ता महामार्गाकडे वर्ग करण्यात आला. पण या रस्त्याची बांधणी ही बांधा वापरा हस्तांतर करा या तत्त्वावर झालेली नसून याकरता महामार्गाने निधी लावला आहे. रस्ता चार पदरी किंवा सहा पदरी झालेला नसून फक्त रस्त्याची रुंदीकरण व मजबुतीकरण झाले आहे. महामार्ग चार पदरी नसताना टोल वसुलीचा घाट का घातला जात आहे? महामार्गाच्या कामाचे पैसे राज्य शासनाने केंद्र शासनाला देऊन रस्ता टोलमुक्त करावा. या रस्त्याच्या टोलबाबत दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात यावा. हा रस्ता तयार करत असताना महामार्गाचे निकष पाळले गेलेले नाहीत त्यामुळे अपघातांची मालिका होणार आहे. या टोलच्या माध्यमातून शेतकऱ्यांना उध्वस्त करण्याचा डाव हाणून पाडायचा आहे. आता केवळ इशारा मोर्चा काढला आहे. टोल रद्दबाबत तातडीने निर्णय न झाल्यास आंदोलन तीव्र केले जाईल. जनतेला संपूर्ण टोल माफी झाल्याशिवाय आंदोलन थांबणार नसल्याचा इशाराही कॉ. देसाई यांनी दिला.  
 पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दूरध्वनीवरून आंदोलकांशी संपर्क साधत सांगितले की, टोल प्रश्न तालुक्यातील जनतेला कोणताही त्रास होणार नाही याची काळजी घेतली जाईल. तसेच याबाबत केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक घेऊन टोल मुक्ती बाबत धोरण ठरवण्यात येईल. टोल मुक्तीच्या आंदोलनात आपण जनतेबरोबर असल्याचेही त्यांनी सांगितले. आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, पर्यटकांना टोल बसवण्याच्या नादात आजरा तालुकावासियाना आर्थिक फटका बसणार आहे. संकेश्वर बांदा रस्त्याबाबत कोणतीही स्पष्टता नसताना हा रस्ता महामार्ग कसा होऊ शकतो? टोलला हद्दपार करण्यासाठी जन आंदोलन, राजकीय लढाई व कायदेशीर लढाई या तिन्ही बाबींचा अवलंब करावा लागेल. या महामार्गावरचा टोल हटवला पाहिजे, कोणत्याही परिस्थितीत आजरेकर नागरिक टोल देणार नाहीत. वेळ पडली तर केंद्र शासन व राज्य शासनाच्या विरोधात न्यायालयात जाण्याची तयारी ठेवली पाहिजे. टोल हटवल्याशिवाय आता कोणत्याही परिस्थितीत थांबायचे नाही. आंदोलन एवढे तीव्र करू की टोलला हद्दपार करू आणि टोलमुक्तीचा आजरा पॅटर्न देशभर नेऊया. माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले की, शक्तिपीठ महामार्ग व आजऱ्याजवळचा टोल याला आमचा विरोध आहे. या कामांना स्थगिती नको तर ती रद्द झालं पाहिजे. सरकारने आमच्या मागण्यांच्या कडे लक्ष दिले नाही तर आगामी काळात संघर्ष अटळ आहे. जिल्हा बँक संचालक ए. वाय. पाटील म्हणाले, संकेश्वर बांदा महामार्ग टोल मुक्तीच्या लढ्यात आंदोलकांच्या पाठीशी आपण ठामपणे उभे आहोत. 
 राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई म्हणाले, नवीन तयार करण्यात आलेल्या रस्त्याला कोणत्याही मूलभूत सुविधा नाहीत. टोलच्या रूपाने तालुक्यावर अन्याय होत आहे. अॅड. शैलेश देशपांडे म्हणाले, महामार्गाचे काम घाईत करण्यात आले आहे. एक रुपयाही न देता या महामार्गावरून प्रवास करणे हा तालुक्यातील जनतेचा हक्क आहे. माजी जिल्हा परिषद अध्यक्ष उमेश आपटे म्हणाले, आता जर टोल लागला तर तो आयुष्यभरासाठी लागणार आहे त्यामुळे संघर्ष हा करावाच लागेल. यावेळी आजरा साखर कारखान्याचे अध्यक्ष वसंतराव धुरे, प्रभाकर कोरवी, युवराज पोवार, तानाजी देसाई, उल्हास त्रिरत्ने यांनी मनोगत व्यक्त केली. टोलमुक्ती आंदोलनाला आजरा तालुक्यातील व्यापारी संघटना, वकील संघटना, डॉक्टर संघटना, सरपंच संघटना, आजरा साखर कारखाना कामगार, तोडणी ओढणी वाहतूकदार व इतर अनेक संघटनांनी पाठिंबा दिला होता. यावेळी जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, शिवसेना ठाकरे गटाचे उपजिल्हाप्रमुख संभाजी पाटील, गोकुळ संचालिका अंजनाताई रेडेकर, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी, आजरा साखर कारखान्याची संचालक विष्णुपंत केसरकर, उदयराज पवार, डॉ. अनिल देशपांडे, सुधीर कुंभार, बाळ केसरकर. संजय सावंत, नामदेव नार्वेकर, रवींद्र भाटले, दशरथ अमृते, रचना होलम, एम. के. देसाई, अभिषेक शिंपी, जी. एम. पाटील, रशीद पठाण  यांच्यासह तालुक्यातील नागरिक उपस्थित होते. शिवसेना शिंदे गटाचे तालुका प्रमुख संजय पाटील यांनी आभार मानले. 
==================  

Sunday, June 23, 2024

मतदार संघ सुजलाम सुफलाम करण्याचा ध्यास घेतलेले पाणीदार आमदार प्रकाश आबिटकर

मतदार संघ सुजलाम सुफलाम करण्याचा ध्यास घेतलेले पाणीदार आमदार प्रकाश आबिटकर 
कोल्हापूर, वृत्तसेवा :

 राधानगरी भुदरगड आजरा विधानसभा मतदारसंघ निसर्ग संपन्न आहे. पाण्याअभावी मतदार संघातील शेतीचा विकास होऊ शकला नाही. गेल्या 20 ते 25 वर्षापासून या मतदारसंघातील अनेक पाणी प्रकल्प रखडलेले होते. हे लक्षात घेऊन मतदार संघ सुजलाम सुफलाम होण्यासाठी रखडलेले पाणी प्रकल्प पूर्ण होणे गरजेचे आहे, याकरता आमदार झाल्यापासून मतदार संघातील पाणी प्रकल्प पूर्णत्वाचा ध्यास घेतलेले आमदार प्रकाश आबिटकर यांनी भुदरगड तालुक्यातील नागणवाडी प्रकल्प पूर्ण केला. त्या पाठोपाठ आमदार आबिटकर यांच्या पाठपुराव्यामुळे यावर्षी आजरा तालुक्यातील सर्फनाला प्रकल्पात 60 टक्क्यापर्यंत पाणीसाठा केला जाणार आहे. याचबरोबर राधानगरी तालुक्यातील धामणी प्रकल्पही पूर्ण व्हावा याकरता आमदार आबिटकर यांची धडपड सुरू आहे. त्यामुळे मतदारसंघात कोट्यावधी रुपयांचा निधी आणून मतदार संघाचा चेहरा मोहरा बदलणारे कार्यसम्राट आमदार प्रकाश आबिटकर हे आता पाणीदार आमदार म्हणून ओळखले जाऊ लागले आहेत. 
आजरा तालुक्याच्या पश्चिम भागाला वरदान ठरणारा सर्फनाला प्रकल्प आमदार प्रकाश आबिटकर यांच्या प्रयत्नाने पूर्णत्वास गेला आहे. हा प्रकल्प सुमारे २४ वर्ष रेंगाळला होता. घळभरणीचे काम पूर्ण झाल्याने यावर्षी या धरणात पाणीसाठा होणार आहे. सन २००० साली या प्रकल्पाला शासकीय मंजुरी मिळाली. सुरुवातीला सोपा असणारा हा प्रकल्प नंतर किचकट होत गेला. नेहमी प्रमाणे पुनर्वसनाचे प्रश्न सुटत नसल्याने संघटना व प्रकल्पग्रस्त पातळीवर विरोध होत गेला. अनेकवेळा काम थांबवले गेले. पुनर्वसन झाल्याशिवाय काम नाही हा निर्धार प्रकल्पग्रस्तांचा असल्याने व त्याची पूर्तता खात्याकडून झाली नसल्याने अनेक वर्षे काम रेंगाळले. अखेर 
आमदार आबिटकर यांच्या पाठपुराव्याने पुनर्वसनाचे प्रश्न मार्गी लागले त्यामुळे पाणीसाठा होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे.
    
 *दृष्टिक्षेपात सर्फनाला प्रकल्प* 
* ०.६७ टीएमसी पाणीसाठा 
* २२१ कोटी रुपये प्रकल्पावर झालेला खर्च 
* प्रकल्पांतर्गत आजरा तालुक्यातील २० गावातील २६४४ हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार 
*धरणाची लांबी १४४० मीटर असून उंची ३३.३२७ मी.
*पाणलोट क्षेत्र ११.८८ चौ.किमी.
*बुडीत क्षेत्र २४५.७२ हेक्टर
*सांडव्याची लांबी ८७ मी.
*विसर्ग क्षमता ३३९.६७ घमी/ सेकंद आहे.
*बुडीत क्षेत्रासाठी २८९.२० हेक्टर जमीन संपादन, यामध्ये खासगी २६६.४८ हे.,सरकारी १६.२२ हे व वनखात्याची ६.५० हे.याचा समावेश आहे
*या प्रकल्पांतर्गत शेळप, दाभिल, देवर्डे, साळगांव व सोहाळे हे ५ बंधारे
*लाभक्षेत्रातील गावांमध्ये पारपोली, शेळप, दाभिल, विनायकवाडी, देवकांडगाव, कोरीवडे, हरपवडे, पेरणोली, आल्याचीवाडी, गवसे, दर्डेवाडी, मेढेवाडी, देवर्डे, वेळवट्टी, कुरकुंदे, साळगांव, सोहाळे, बाची, पारेवाडी व पेठेवाडी या गावांचा समावेश
*बुडीत झालेल्या पारपोली व गावठाण या गावांचे पुनर्वसन देवर्डे व शेळप येथे पुनर्वसन वसाहतीमध्ये केले आहे. याठिकाणी सर्व नागरी सुविधा देण्यात आल्या.
===================

Thursday, June 20, 2024

आजऱ्यातील टोलमुक्तीच्या लढ्यात मी जनतेबरोबर : आमदार प्रकाश आबिटकर

आजऱ्यातील टोलमुक्तीच्या लढ्यात मी जनतेबरोबर : आमदार प्रकाश आबिटकर

आजरा, वृत्तसेवा :

 संकेश्वर-बांदा महामार्गासाठी आजरा तालुका वासियांचा मोठा त्याग आहे. एवढे असूनही टोलचे भूत आजरा तालुक्यावरच लादले जात आहे. महामार्गाचे काम परिपूर्ण झाले नसतानाही टोल नाका उभारणीचे गौड बंगाल काय तसेच टोल वसुलीची घाई का? आजरा तालुक्यातील नागरिकांनी टोलच्या विरोधात उभारलेले आंदोलन योग्यच असून या टोलमुक्तीच्या लढ्यात मी जनतेबरोबर असल्याचे प्रतिपादन आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते आजरा तहसील कार्यालयात टोलबाबत आयोजित बैठकीत बोलत होते. महामार्ग विभागाचे कार्यकारी अभियंता मधाळे, भुदरगड आजरा प्रांताधिकारी वसुंधरा बारवे यांची प्रमुख उपस्थिती होती. या बैठकीला तालुक्यातील नागरिकांचीही मोठ्या संख्येने उपस्थिती होती. 

 तालुका वासियांच्या वतीने भूमिका स्पष्ट करताना कॉ. संपत देसाई म्हणाले, महामार्गाच्या कामासाठी जर केंद्र शासनाने निधी दिला असेल तर टोल आकारणी कशासाठी? तरीही निधीचे कारण सांगून टोल आकाराने होत असेल तर राज्य शासनाने केंद्र शासनाला पैसे  देऊन निधीचा विषय निकाली काढावा. आजरा तालुक्यातील नागरिक कोणत्याही परिस्थितीत टोल भरणार नाहीत. या टोलच्या संदर्भात केंद्रीय दळणवळण मंत्री नितीन गडकरी यांच्यासोबत बैठक होऊन टोलबाबत धोरण ठरण्याची गरज आहे. आमदार आबिटकर पुढे म्हणाले, टोलला जनतेचा विरोध आहे त्यामुळे यापुढे टोलचे कोणतेही काम करायचे नाही. टोल रद्द होण्यासाठी शासकीय पातळीवरील व कायदेशीर लढाई लढण्यासाठी देखील आम्ही सज्ज आहोत. तसेच प्रशासकीय पातळीवर देखील टोलच्या संदर्भात कोणती हालचाल करण्यात येऊ नये असे त्यांनी सांगितले. हा यावेळी झालेल्या चर्चेत राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई, जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे,  भाजपचे सुधीर कुंभार, प्रभाकर कोरवी, माजी उपनगराध्यक्ष विलास नाईक यांच्यासह नागरिकांनी सहभाग घेतला. यावेळी तहसीलदार समीर माने, आजरा साखर अध्यक्ष वसंतराव धुरे, जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंत शिंपी, गटविकास अधिकारी ढमाळ, आजरा नगरपंचायत मुख्याधिकारी सुरज सुर्वे, जनार्दन टोपले, विष्णुपंत केसरकर, भाजपचे तालुकाध्यक्ष बाळ केसरकर, दशरथ अमृते, विजय पाटील, अभिषेक शिंपी, जी. एम. पाटील, जितू भोसले यांच्यासह विविध गावचे सरपंच, नागरिक, महामार्ग प्राधिकरणाचे अधिकारी  उपस्थित होते.

 चौकट...
 शक्तिपीठ महामार्गाबाबत बोलताना आमदार प्रकाश आबिटकर म्हणाले, मतदार संघाचा विकास व्हावा यासाठी मतदार संघातून शक्तिपीठ जावा याकरता आग्रह धरणारा मीच होतो. मात्र या शक्तिपीठाला लोकांचा विरोध सुरू झाल्यानंतर हा शक्तिपीठ थांबला पाहिजे हे सांगणारा देखील मीच आहे. मतदार संघाचा विकास करत असताना लोकांचा विरोध डावलून कोणतेही काम करण्यात येणार नसल्याचेही यावेळी आमदार आबिटकर यांनी स्पष्ट केले.
================  

Wednesday, June 19, 2024

गुरुवारी आजरा येथे खासदार छत्रपती शाहू महाराजांचा आभार दौरा; श्रीमंत गंगामाई वाचनालयात जनतेशी साधणार संवाद

गुरुवारी आजरा येथे खासदार छत्रपती शाहू महाराजांचा आभार दौरा; श्रीमंत गंगामाई वाचनालयात जनतेशी साधणार संवाद
आजरा, वृत्तसेवा : 

कोल्हापूर लोकसभा मतदारसंघातील इंडिया व महाविकास आघाडीचे विजयी उमेदवार खासदार छत्रपती शाहू महाराज यांचा गुरुवार (दि. 20) रोजी आजरा येथे आभार दौरा आयोजित केला आहे. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आमदार सतेज उर्फ बंटी पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. यावेळी नूतन खासदार शाहू महाराज व आमदार पाटील हे जनतेशी संवाद साधणार आहेत. यामाध्यमातून ते आजरा तालुक्यतील जनतेच्या अडीअडचणी समजून घेणार आहेत. तरी तालुक्यातील जनतेने दुपारी ३.०० वाजता श्रीमंत गंगामाई वाचनालयात उपस्थित रहावे असे आवाहन इंडिया आघाडीचे समन्वयक रवींद्र भाटले यांनी केले आहे.
=============

Thursday, June 13, 2024

मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारला दिली एक महिन्याची मुदत

 मनोज जरांगेंचं उपोषण स्थगित; सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणीसाठी सरकारला दिली एक महिन्याची मुदत
मुंबई वृत्तसंस्था  :

मराठा आरक्षणासाठी आक्रमक भूमिका घेतलेल्या मनोज जरांगे पाटील यांनी गुरुवारी सहाव्या दिवशी उपोषण मागे घेतलं आहे. तसेच सगेसोयऱ्यांच्या अंमलबजावणी सरकारला १ महिन्याची मुदत दिली आहे. महत्त्वाचे म्हणजे या एका महिन्यात सरकारने मागण्या मान्य न केल्यास आगामी विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन उमेदवार पाडू, असा इशारादेखील त्यांनी राज्य सरकारला दिला आहे.

राज्य सरकारमधील मंत्री शंभूराज देसाई, राणा जगजितसिंह आणि खासदार संदिपान भुमरे यांनी गुरुवारी अंतरावाली सराटी येथे जरांगे यांची भेट घेतली. यावेळी मराठा आरक्षणाबाबत सरकार कशा पद्धतीने काम करत आहे, याबाबतची माहिती त्यांनी मनोज जरांगे यांना दिली. सगेसोयऱ्यांची अंमलबजावणीसाठी सरकार दिरंगाई करत आहे, असा गैरसमज मनोज जरांगेंनी यांनी करू घेऊ नये, त्यांनी हा विचार डोक्यातून काढून टाकावा. मराठा आरक्षणाचा प्रश्न कायद्याच्या चौकटीत राहून सोडवू, यावर येणाऱ्या हरकती या मंत्रिमंडळाच्या बैठकीसमोर ठेवल्या जातील, असं शंभूराज देसाई म्हणाले. तसेच मागील दोन महिने राज्यात निवडणुकीची आचारसंहिता लागू होती. त्यामुळे यासंदर्भातील निर्णय घेण्यास विलंब झाला. मात्र, यासंदर्भात मी उद्या अधिकाऱ्यांची बैठक घेणार आहे. सगेसोयऱ्यांच्या नियमांची अधिसूचना काढण्याबाबत लवकरच अंतिम निर्णय घेण्यात येईल, असं आश्वासनही त्यांनी मनोज जरांगे यांना दिलं.

दरम्यान, शंभूराज देसाई यांच्या आश्वासनानंतर आता मनोज जरांगे यांनी उपोषण मागे केलं असून त्यांनी राज्य सरकारला एक महिन्याची मुदत दिली आहे. तसेच १३ जुलैपर्यंत आमच्या मागण्या मान्य न झाल्यास, आगामी विधानसभा निवडणुकीत नाव घेऊन उमेदवार पाडू, असा इशारादेखील त्यांनी राज्य सरकारला दिला आहे. लोकांचा शब्द डावलून जर एक महिण्याच्या आत मागण्या मान्य न झाल्यास आम्ही निवडणुकीत उतरणार, ते शक्य झाले तर २८८ मतदानसंघात नाव घेऊन उमेदवार पाडणार, असे ते म्हणाले. तसेच शंभूराज देसाई आले म्हणून मी सरकारला एक महिन्याची वेळ देतो आहे. जर एक महिन्यात आरक्षण न मिळाल्यास आपण सत्तेत जाऊन आरक्षण घेऊ, अशी प्रतिक्रियाही त्यांनी दिली.
=============

Wednesday, June 5, 2024

कोल्हापूरातून शाहू छत्रपती तर हातकणंगलेमधून धैर्यशील माने विजयी; जाणून घ्या उमेदवारनिहाय मते

कोल्हापूरातून शाहू छत्रपती तर हातकणंगलेमधून धैर्यशील माने विजयी; जाणून घ्या उमेदवारनिहाय मते 
कोल्हापूर, वृत्तसेवा : 

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 47 कोल्हापूर लोकसभा मतदार संघातून शाहू शहाजी छत्रपती 1 लाख 54 हजार 964 मतांनी तर हातकणंगले मधून धैर्यशील माने 13 हजार 426 मतांनी विजयी झाले. दोन्ही लोकसभा मतदारसंघात दिनांक 7 मे रोजी मतदान झाले होते. कोल्हापूरमधून एकुण 23 उमेदवारांनी तर हातकणंगलेमधून 27 उमेदवारांनी निवडणूक लढवली. 47 कोल्हापूर लोकसभा मतदार संघाची मतमोजणी रमणमळा व 48 हातकणंगले लोकसभा मतदारसंघाची मतमोजणी राजाराम तलाव येथील शासकीय धान्य गोदाम इमारतींमध्ये शांततेत पार पडली. 
४७ कोल्हापूरसाठी सहाही विधानसभा मतदार संघात प्रत्येकी १४ मतमोजणी टेबलवरुन चंदगड २८, राधानगरी ३१, कागल २६, कोल्हापूर दक्षिण २४, करवीर २६ आणि कोल्हापूर उत्तरची २३ फेऱ्यातून मतमोजणी पूर्ण झाली. ४८ हातकणंगलेसाठी सहाही विधानसभा मतदार संघात प्रत्येकी १४ मतमोजणी टेबलवरुन शाहूवाडी व हातकणंगले प्रत्येकी २४, इचलकरंजी १९, शिरोळ व इस्लामपूर प्रत्येकी २१ तर शिरोळसाठी २४ फेऱ्यातून मतमोजणी पूर्ण झाली. टपाली मतमोजणीसाठी 18 टेबल होते. 

उमेदवार निहाय मिळालेल्या मतांची संख्या-:

47 कोल्हापूर-: शाहू शहाजी छत्रपती, (इंडियन नॅशनल काँग्रेस) - 754522 , संजय भिकाजी मागाडे, (बहुजन समाज पार्टी)-4002 , संजय सदाशिवराव मंडलिक, (शिवसेना)-599558 , संदिप भैरवनाथ कोगले, (देश जनहित पार्टी, अपक्ष)-2975 , बसगोंडा तायगोंडा पाटील, (भारतीय जवान किसान पार्टी)-1107 , अरविंद भिवा माने, (भारतीय राष्ट्रीय दल अपक्ष) -570 , शशीभूषण जीवनराव देसाई, (अखिल भारत हिंदू महासभा,अपक्ष)-651 , सुनील नामदेव पाटील, (नॅशनल ब्लॅक पँथर पार्टी)- 633, संतोष गणपती बिसुरे, (अपनी प्रजाहित पार्टी)-639 , इरफान आबुतालिब चांद, (अपक्ष) -597 , कुदरतुल्ला आदम लतिफ, (अपक्ष) -467, कृष्णा हणमंत देसाई, (अपक्ष)-604, कृष्णाबाई दिपक चौगले (अपक्ष)-3063 , बाजीराव नानासो खाडे, (अपक्ष)-3512 , नागनाथ पुंडलिक बेनके, (अपक्ष)-1227 , माधुरी राजू जाधव, (अपक्ष) -3508 , मुश्ताक अजीज मुल्ला, (अपक्ष)-3824 , मंगेश जयसिंग पाटील, (अपक्ष)-653 , ॲड. यश सुहास हेडगे-पाटील, (अपक्ष)-2459 , राजेंद्र बाळासो कोळी, (अपक्ष)-1044 , सलीम नुरमंहमद बागवान, (अपक्ष)-335, सुभाष वैजू देसाई, (अपक्ष)-849 , संदिप गुंडोपंत संकपाळ, (अपक्ष)-544 तर नोटाला 5983 एवढे मत मिळाली. अवैद्य मतदान 844 तर टेंडर्ड मतदान 36 आहे. अशा प्रकारे एकुण 13 लाख 94 हजार 170 मतदान झाले.

48 हातकणंगले -: रवींद्र तुकाराम कांबळे (बहुजन समाज पार्टी)-4033 , धैर्यशील संभाजीराव माने (शिवसेना)- 520190 , सत्यजित बाबासाहेब पाटील -सरुडकर (शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे)-506764   , इम्रान इकबाल खतीब, (पक्ष- बहुजन मुक्ती पार्टी)-3190 , डॉ. ईश्वर महादेव यमगर, (भारतीय लोकशक्ती पार्टी)-1537 , दिनकरराव तुळशीदास चव्हाण (पाटील), (अपक्ष)-679 , धनाजी जगन्नाथ गुरव (शिवारेकर) (लोकराज्य जनता पार्टी)-1061 , दादगोंडा चवगोंडा पाटील (वंचित बहुजन आघाडी)-32696 , रघुनाथ रामचंद्र पाटील (भारतीय जवान किसान पार्टी)-2174 , राजू उर्फ देवाप्पा आण्णा शेट्टी (स्वाभिमानी पक्ष)-179850 , शरद बाबुराव पाटील, (नेशनल ब्लॅक पँथर पार्टी)-1361 , संतोष केरबा खोत (कामगार किसान पार्टी)-1701 , अस्लम ऐनोद्दिन मुल्ला, (अपक्ष)-6111 , आनंदराव तुकाराम थोरात, (अपक्ष)-3499 , आनंदराव वसंतराव सरनाईक, (अपक्ष)-4955 , जावेद सिंकदर मुजावर, (अपक्ष)-1852 , लक्ष्मण श्रीपती डवरी (अपक्ष)-1009 , लक्ष्मण शिवाजी तांदळे, (अपक्ष)-4789 , प्रा. परशुराम तम्मान्ना माने, (अपक्ष)-4477 , मनोहर प्रदीप सातपुते (अपक्ष)-1066 , महंमद मुबारक दरवेशी (अपक्ष)-361 , अरविंद भिवा माने (अपक्ष)-424 , देवेंद्र नाना मोहिते (अपक्ष)-560 , राजेंद्र भिमराव माने, (अपक्ष)-940 , रामचंद्र गोविंदराव साळुंखे (अपक्ष)-618 , शिवाजी धोंडीराम संकपाळ (अपक्ष)-1392 , सत्यजित पाटील  (अपक्ष)-3632  तर नोटाला 5103 एवढे मत मिळाली. अवैद्य मतदान 1258 तर टेंडर्ड मतदान 7 आहे. अशा प्रकारे एकुण 12 लाख 97 हजार 282 मतदान झाले.
==================

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...