मुंबई (प्रतिनिधी) :
राज्यातील पर्यटन व्यवसायात हॉटेल उद्योगाचे स्थान मोठे आहे. त्यामुळे हॉटेल व्यवसायाला गती देण्यासाठी कार्यपद्धती तयार करण्यात येत असून ही कार्यपद्धती अंतिम झाल्यावर हॉटेल्स आणि रेस्टॉरंट सुरू करण्याचा विचार आहे, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी रविवारी स्पष्ट केलं. मुख्यमंत्र्यांनी राज्यातील हॉटेल्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांशी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संवाद साधून हे संकेत दिले.
पर्यटन व्यवसायातील महत्वाचा उद्योग असलेली हॉटेल्स तसेच लॉजेस सुरु करण्यापूर्वी खूप काळजी घेऊन परवानगी द्यावी लागेल. आपली जबाबदारी दुहेरी आहे. हॉटेल्समध्ये येणारा प्रत्येक अभ्यागत, प्रवाशी निरोगी असेल यासाठी त्यांची वैद्यकीय तपासणी करावी लागेल. कारण एक कोविड पॉझिटिव्ह व्यक्ती हॉटेलमध्ये आला तरी सर्व हॉटेल व कर्मचारी आजारी पडू शकतात. आत्ता आपण सलूनला परवानगी दिली आहे, ती सुद्धा फक्त केस कापणे व हेअर डायसाठी. जिम देखील बंदच ठेवले आहे कारण आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. हॉटेल्स सुरू करायला काही अडचण नाही. मात्र राज्य शासनाने आखून दिलेल्या कार्यपद्धतीप्रमाणे आपल्याला नियमांचे पालन करावे लागणार आहे, असं सांगतानाच आज जे स्थानिक कामगार, कर्मचारी आपल्या हॉटेल्समध्ये आहेत त्यांना काढू नका. यात आपण काहीतरी मार्ग निश्चितपणे काढू, या संकट समयी कामगार संघटना देखील अवाजवी मागण्या करणार नाहीत, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं. यावेळी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, मुख्य सचिव संजय कुमार, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सल्लागार अजोय मेहता, पर्यटन प्रधान सचिव वल्सा नायर सिंह सहभागी होते.
हॉटेल उद्योग हा पर्यटन व्यवसायासाठी खूप महत्वाचा आहे. नाईट लाईफला देखील आपण प्रोत्साहन दिले. मुंबई, ठाणे, पुणे, औरंगाबाद व इतर मोठ्या शहरांत आम्ही सगळे व्यवहार सुरू करतांना भविष्यातील वाढती रुग्ण संख्या लक्षात घेऊन जम्बो सुविधा वाढवण्यावर भर दिला आहे. या सगळ्या प्रयत्नांत हॉटेल्सनी आमच्या वैद्यकीय तसेच शासकीय यंत्रणांसाठी खूप मदत केली. करोनानंतर हा हॉटेल उद्योग परत जोमाने पायावर उभा राहिला पाहिजे. मात्र करोनाच्या पार्श्वभूमीवर या उद्योगाने स्वयंशिस्तीसाठी स्वत:ला नियम घालणे महत्वाचे आहे, असं पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितलं.
हॉटेल्स १०० टक्के लगेच सुरु करत येणार नाही पण टप्प्याटप्प्याने, सर्व काळजी घेऊन सुरु करण्याचे नियोजन आम्ही करतो आहोत असे सांगून प्रधान सल्लागार अजोय मेहता म्हणाले की, हॉटेल्स सुरु करतांना काटेकोर नियमांची आखणी करावी लागेल. हॉटेल्समध्ये मोठ्या प्रमाणावर सुविधांचा वापर निवास, जेवण्याखाण्यासाठी केला जातो त्यामुळे आपल्याला अधिक काळजी घ्यावी लागेल, असं मुख्य सचिव संजय कुमार यांनी सांगितलं. तर इंडियन हॉटेल्स असोसिएशनचे गुरुबक्ष सिंग कोहली म्हणाले की, या उद्योगाला आता खेळते भांडवल आवश्यक आहे. शासनाने आम्हाला देखील कोरोना योद्धा म्हणून पाहावे. सर्वत्र नोकऱ्या जात आहेत मात्र आम्ही आमच्या कर्मचाऱ्यांच्या घरी चुली पेटलेल्या राहतील याची काळजी घेत आहोत. आमचा प्रयत्न शासनाबरोबर राहण्याचा आहे. आज आमच्याकडे ८० टक्के स्थलांतरीत कामगार आहे.काही प्रमाणात हॉटेल्स आणि रेस्टोंरंट सुरक्षित अंतर ठेवून सुरु करायला परवानगी द्यावी, इतर राज्यांशी आपली स्पर्धा असते. त्यामुळे पर्यटकांनी जास्तीत जास्त काळ महाराष्ट्रात, मुंबईत राहावे जेणे करून पर्यटन उद्योगाला वाव मिळेल.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास डिजिटल मिडीया
7410168989
No comments:
Post a Comment