Tuesday, December 9, 2025

बाबा आढावांचा चळवळीचा वारसा पुढे घेऊन जाने हीच खरी श्रद्धांजली, आजरा येथील श्रद्धांजली सभेत अनेकांनी व्यक्त केल्या भावना

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
बाबा आढावांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीची अपरिमित हानी झाली असून त्यांनी घालून दिलेला चळवळीचा वारसा जपणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल असे मत डॉ. नवनाथ शिंदे यांनी आजरा येथे डॉ बाबा आढाव यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत व्यक्त केले. यावेळी जेष्ठ नेते जयवंतराव शिंपी, कॉ. संपत देसाई, कॉ. शांताराम पाटील, तानाजी देसाई, प्रा. मीना मंगळूरकर, कॉ. संजय तर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
    
बाबांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. शिंदे पुढे म्हणाले, बाबा म्हणजे एक कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी समर्पित आयुष्य जगलेले झंझावात होते. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी सत्यशोधक विचार कृतीत आणला. जेष्ठ नेते जयवंतराव शिंपी म्हणाले, माझा प्रत्यक्ष आयुष्यात बाबांशी कधी संपर्क आला नाही, पण त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिका, त्यांनी केलेले काम यातून मला बाबा आढाव समजत गेले. आता अशी माणसं राहिली नाहीत ती आपल्यासाठी दिशादर्शक होती. श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई म्हणाले की बाबा हे समाजवादी असले तरी ते सत्यशोधक होते. आयुष्यभर सत्यशोधक विचार त्यांनी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत जपला. शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई म्हणाले, बाबांनी श्रमिक, कष्टकरी, काच-पत्रा वेचणाऱ्या स्त्रियांसह हमालाना संघटित करून त्यांना न्याय मिळवून दिला. आजही श्रमिकांचे शोषितांचे प्रश्न संपलेले नाहीत. ते घेऊन लढणे हीच खरी त्यांना श्रध्दांजली असेल.
   
कॉ. संजय तर्डेकर म्हणाले, बाबांनी माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यांचं जाणं आम्हाला पोरकं करणार आहे. कॉ. दशरथ घुरे म्हणाले आज सत्यशोधक विचार कृतीत आणून तसा व्यवहार करण्याची गरज आहे, जे बाबांनी केले. भाकपा (माले)चे जिल्हाध्यक्ष कॉ. शांताराम पाटील आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की बाबांनी सर्वच क्षेत्रात महत्वपूर्ण काम केले आहे. तो वारसा आपण जपुया. सकाळचे पत्रकार रणजित कालेकर म्हणाले की आज सकाळ  वर्तमानपत्राचा जो वैचारिक विकास झाला आहे. त्यामध्ये डॉ. बाबा आढाव यांचा वाटा महत्वाचा राहिला आहे. शिवाजी गुरव, निवृत्ती कांबळे यांनीही आपल्या श्रद्धांजली पर कृतज्ञता व्यक्त केल्या. यावेळी विक्रम देसाई, रवींद्र भाटले, राजू होलम, प्रकाश शेटगे, जोतिबा चाळके, संजय घाटगे, जानबा मिसाळ, पुष्पलता घोळसे, मारुती चव्हाण, नारायण भडांगे, कृष्णा सावंत, सुनील पाटील यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
=========================

No comments:

Post a Comment

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...