Monday, December 15, 2025

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क :
महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहराच्या सुरळीत पाणीपुरवठा तसेच महानगरपालिकेच्या कोट्यवधीचा जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही करणार असल्याचे आश्वासन, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिले. इचलकरंजी शहरात अंदाजित ४३० कोटी रुपयांच्या विविध विकासकामांच्या उद्घाटन, भूमिपूजन व लोकार्पण सोहळ्याप्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत (दादा) पाटील, खासदार धनंजय महाडिक, खासदार धैर्यशिल माने, आमदार डॉ. राहूल आवाडे, आमदार अशोक माने, जिल्हाधिकारी अमोल येडगे, जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी कार्तिकेयन एस, इचलकरंजी मनपा आयुक्त पल्लवी पाटील, माजी आमदार प्रकाश आवाडे, माजी आमदार सुरेश हाळवणकर आदी मान्यवर उपस्थित होते.

सुमारे ४३० कोटी रुपये खर्च करून इचलकरंजी शहरातील महानगरपालिका क्षेत्रात १० तर ५ ग्रामीण भागात विकासकामे करण्यात येणार आहेत. यामध्ये पंचगंगा प्रदूषण उपाययोजनेअंतर्गत औद्योगिक सांडपाणी प्रक्रियेसाठी (मनपा व एमआयडीसी क्षेत्र) ३६१.३१ कोटी, ग्रामीण भागात (जिल्हा परिषद) ५.७५ कोटी, तर शहरात ६२.७७ कोटी रुपयांची विविध विकासकामे करण्यात येणार आहेत. या विविध विकासकामांचे उद्घाटन मुख्यमंत्री फडणवीस यांनी कळ दाबून (रिमोटद्वारे) केले. मुख्यमंत्री फडणवीस पुढे म्हणाले, पुढील पाच वर्षांत जीएसटीच्या परताव्यासंदर्भातील प्रक्रिया पूर्ण करण्यात आली असून लवकरच जीएसटीचा आवश्यक तो परतावा इचलकरंजीकरांना मिळेल. शहराच्या विकासाकरिता आणि येथील उद्योगांसाठी योग्य ती कार्यवाही करून इचलकरंजी शहराचा चेहरामोहरा बदलू, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

‘श्री शंभूतीर्थ’ पुतळ्याचे लोकार्पण :
इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने शहरातील कॉ. के. एल. मलाबादे चौक सुशोभीकरण अंतर्गत उभारण्यात आलेल्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पूर्णाकृती पुतळ्याचे ‘श्री शंभूतीर्थ’ म्हणून लोकार्पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते संपन्न झाले. धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज स्मारक समिती आणि इचलकरंजी महानगरपालिकेच्या वतीने हा पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. पुतळ्याच्या अनावरणावेळी मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले, महानगरपालिकेसह येथील नागरिकांनी पुढाकार घेऊन लोकसहभागातून हा पुतळा उभारला आहे. यातील जनसहभाग महत्त्वाचा असून, हे एका अर्थाने जनतेचे स्मारक आहे. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रेरणेने लोकांमध्ये तेज निर्माण होते. महाराजांचा इतिहास देदिप्यमान असून, तो प्रत्येकापर्यंत पोहोचला पाहिजे, असे मत त्यांनी व्यक्त केले. या सोहळ्यासाठी संभाजी भिडे गुरुजी यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर तसेच इतिहासप्रेमी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. तत्पूर्वी इचलकरंजी येथील हेलिपॅडवर आमदार डॉ. राहूल आवाडे, माजी आमदार प्रकाश आवाडे आणि इचलकरंजी महापालिका आयुक्त पल्लवी पाटील यांनी त्यांचे स्वागत केले.
========================

गोकुळचे संचालक अरुण डोंगळे यांच्याकडून आजऱ्यातील शिवतीर्थ सुशोभीकरणासाठी दोन लाख रुपयांची देणगी

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
गोकुळ दुध संघांचे जेष्ठ संचालक व माजी अध्यक्ष अरुण डोंगळे यांच्या वतीने आजरा येथील शिवतीर्थ परिसर सुशोभीकरणासाठी दोन लाख रुपयांची देणगी देण्यात आली आहे. कोल्हापूर येथे छत्रपती शिवाजी महाराज पुतळा समिती आजरा यांच्याकडे डोंगळे यांनी देणगी सुपूर्द केली.

आजरा शहरात छत्रपती शिवाजी महाराज यांचा अश्वारूढ पूर्णाकृती पुतळा उभारण्यात आला आहे. या पुतळ्याचा लोकार्पण सोहळा एप्रिल महिन्यात पार पडला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी गोकुळ संचालक अरुण डोंगळे होते. त्यावेळी बोलताना डोंगळे यांनी आजरा शिवतीर्थावरील सुशोभीकरण कामासाठी डोंगळे कुटुंबीयांच्या वतीने आर्थिक मदत देण्याचे जाहीर केले होते. त्यानुसार डोंगळे यांनी शिवतीर्थ परिसर सुशोभीकरणासाठी दोन लाख रुपयांची देणगी समितीकडे सुपूर्द केली. यावेळी समिती सचिव संभाजी इंजल, आजरा रवळनाथ देवस्थान समिती अध्यक्ष आनंदा कुंभार, गोकुळ दूध संघाचे अधिकारी दत्तात्रेय वाघरे, अभिजीत संकपाळ, विकास सुतार उपस्थित होते.
====================

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सी.पी.टी.पी. २०११ बॅच प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांची ‘गोकुळ’ दूध संघाला अभ्यास भेट

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) येथे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सी.पी.टी.पी. बॅच २०११ मधील महाराष्ट्र शासनाच्या यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी (यशदा), पुणे येथे प्रशिक्षण घेत असलेले उपजिल्हाधिकारी, उप पोलिस अधीक्षक, उपमुख्य कार्यकारी अधिकारी, प्रादेशिक परिवहन अधिकारी यांनी गोकुळ प्रकल्प, गोकुळ शिरगाव येथे अभ्यास भेट दिली. या भेटीवेळी गोकुळ संघाच्या दूध संकलनापासून प्रक्रिया, गुणवत्ता नियंत्रण, दुग्धजन्य पदार्थ निर्मिती, वितरण व्यवस्था तसेच दूध उत्पादक शेतकऱ्यांच्या हितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर, स्वच्छता, नियोजनबद्ध व्यवस्थापन आणि पारदर्शक प्रशासन या बाबींचे अधिकाऱ्यांनी विशेष कौतुक केले.

यावेळी भेट दिलेल्या प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी गोकुळ दूध संघाच्या एकूण कामकाजाबाबत समाधान व्यक्त केले. गोकुळ दूध संघ ही सहकार क्षेत्रातील एक अग्रगण्य संस्था असून सहकाराच्या माध्यमातून दूध उत्पादक शेतकरी, कर्मचारी व संबंधित सर्व घटकांचा सर्वांगीण विकास कसा साधता येतो याचे ज्वलंत उदाहरण म्हणजे गोकुळ दूध संघ असल्याचेही अधिकाऱ्यांनी यावेळी नमूद केले.” सहकार क्षेत्रात गोकुळ संघाने उभा केलेला आदर्श इतर सहकारी संस्थांसाठी मार्गदर्शक ठरेल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली. यावेळी सहकार, प्रशासन आणि विकासात्मक योजनांच्या अमलबजावणी संदर्भात सकारात्मक चर्चा झाली. या अभ्यासभेटीमुळे भविष्यात प्रशासकीय कामकाजात निश्चितच मदत होईल, असे मतही त्यांनी व्यक्त केले.
         
यावेळी गोकुळचे चेअरमन नविद मुश्रीफ म्हणाले, “महाराष्ट्र लोकसेवा आयोग CPTP बॅच २०११  च्या प्रशिक्षित अधिकाऱ्यांची गोकुळ दूध संघाला दिलेली भेट आमच्यासाठी अभिमानाची बाब आहे. अशा अभ्यासभेटींमुळे प्रशासन आणि सहकार क्षेत्र यांच्यातील समन्वय वाढून ग्रामीण व कृषी विकासाला निश्चितच चालना मिळेल.” यावेळी संघाचे चेअरमन नविद मुश्रीफ, दुग्ध विकास अधिकारी प्रकाश आवटी, ए.एस.माळवदे,  कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, बोर्ड सेक्रेटरी प्रदीप पाटील, (यशदा) पुणे येथे प्रशिक्षण घेत असलेले सर्व अधिकारी उपस्थित होते.
===========================

Friday, December 12, 2025

कोल्हापुरी चपलांच्या जागतिक प्रसारासाठी प्राडा, लिडकॉम आणि लिडकार यांच्यात सामंजस्य करार; पारंपारिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ

मुंबई, न्यूज नेटवर्क :
भारतीय पारंपरिक चर्मकला कोल्हापुरी चपलांचा वारसा जगभर पोहोचवण्यासाठी जागतिक ब्रॅन्ड प्राडा, लिडकॉम (संत रोहिदास चर्मउद्योग आणि चर्मकार विकास महामंडळ) आणि लिडकार (डॉ. बाबू जगजीवनराम चर्मउद्योग विकास महामंडळ) यांच्यात सामंजस्य करार झाला. मुंबईतील इटालियन वाणिज्य दूतावासात, इटली–भारत व्यापारी परिषदेनिमित्त या करारावर स्वाक्षरी करण्यात आली. शतकांपासून वापरात असलेल्या पारंपरिक चप्पल निर्मितीच्या पद्धती, प्राडाच्या आधुनिक व समकालीन डिझाईन शैली या माध्यमातून चप्पल विकसित केल्या जात आहेत. पारंपरिक कौशल्य आणि आधुनिक लक्झरी फॅशनच्या मदतीने पारंपारिक कोल्हापुरी कौशल्याला प्राडाची आधुनिक साथ मिळणार आहे. विशेष चप्पला फेब्रुवारी २०२६ मध्ये प्राडाच्या ४० विक्री केंद्रांमध्ये तसेच अधिकृत संकेतस्थळावर उपलब्ध होईल.

या उपक्रमासाठी महाराष्ट्र शासनाचे ठोस पाठबळ लाभले असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार, सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट, सामाजिक न्याय राज्यमंत्री माधुरी मिसाळ यांचे सक्रिय मार्गदर्शन मिळाले आहे. हा करार प्रधान सचिव तथा लिडकॉमचे अध्यक्ष डॉ. हर्षदीप कांबळे यांच्या मार्गदर्शनाखाली आणि लिडकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार यांच्या धोरणात्मक नियोजनामुळे शक्य झाला आहे. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट म्हणाले, या कराराने भारतातील अनेक कारागीर, व्यावसायिक आणि उद्योजकांचा फायदा होणार आहे. या विशेष संकलनातून भारतीय कारागिरांच्या कलेला नवी दिशा मिळणार असून आंतरराष्ट्रीय स्तरावर त्यांच्या कौशल्याची ओळख अधिक दृढ होणार आहे.

लिडकॉमच्या व्यवस्थापकीय संचालक प्रेरणा देशभ्रतार म्हणाल्या, पारंपरिक कला जपणाऱ्या कारागिरांच्या पिढ्यांचा सन्मान करण्यासाठी आणि त्यांच्या कौशल्याला जागतिक पातळीवर योग्य ओळख देण्यासाठी ही भागीदारी अत्यंत महत्त्वपूर्ण आहे. यात एक जागतिक ब्रँड थेट महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कारागिरांसोबत काम करत असल्याने त्यांच्या या कौशल्याला एक ओळख मिळेल आणि कलेचे पूर्ण श्रेय या कारागिरांना मिळेल. लिडकारच्या व्यवस्थापकीय संचालिका डॉ. के. एम. वसुंधरा म्हणाल्या, कोल्हापुरी चपलांची परंपरा म्हणजे महाराष्ट्र–कर्नाटकातील चप्पलकारांचे शतकांपासूनचे संचित कौशल्य या सहकार्यामुळे प्रशिक्षण, रोजगार आणि जागतिक संधींची विस्तृत दारे उघडणार आहेत. प्राडा समूहाच्या सामाजिक उत्तरदायित्व विभागाचे प्रमुख लोरेंझो बर्टेली म्हणाले, ही भागीदारी म्हणजे सांस्कृतिक आदानप्रदानाची नवी ओळख आहे. भारतीय कारागिरांच्या अतुलनीय कलेला आधुनिक जगात योग्य स्थान देण्यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.

चपलांच्या कलेक्शनच्या माध्यमातून भारतीय कारागिरीचा 'प्राडा मेड इन इंडिया- इन्स्पायर्ड बाय कोल्हापुरी चप्पल्स' प्रकल्पाचा आराखडा, अंमलबजावणी आणि त्या संदर्भातील मार्गदर्शक तत्वे या करारात नमूद करण्यात आली आहेत. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील पारंपरिक कोल्हापुरी चपला तयार करणाऱ्या कुशल कारागिरांच्या साह्याने या चपला भारतात बनवल्या जातील. या चपला बनवण्याच्या पारंपरिक पद्धती आणि प्राडाच्या समकालीन डिझाइन्स तसेच प्रीमिअम दर्जाच्या मटेरिअलच्या साह्याने या कलेक्शनच्या माध्यमातून भारतातील संपन्न वारसा आणि आधुनिक लक्झ्यरी फॅशनची अभिव्यक्ती यात एका नव्या संवादाला सुरुवात केली जाणार आहे. पारंपरिक कोल्हापुरी चपला महाराष्ट्रातील चार जिल्हे (कोल्हापूर, सांगली, सातारा, सोलापूर) आणि कर्नाटकातील चार जिल्हे (बेळगावी, बागलकोट, धारवाड, बिजापूर). या आठ जिल्ह्यांमध्ये बनवल्या जातात. २०१९ मध्ये कोल्हापुरी चपलांना जिओग्राफिकल इंडिकेशन (जीआय) टॅग देण्यात आल्याने त्यांची अस्सलता जपली गेली आणि त्यांचे सांस्कृतिक महत्त्व अधोरेखित झाले.
=========================

Thursday, December 11, 2025

दूध उत्पादकांचा दृढ विश्वास हीच ‘गोकुळ’ची खरी ताकद : भारताचे मुख्य सल्लागार (इडीफ) डॉ.अभिनव गौरव, आंतरराष्ट्रीय व राष्ट्रीय प्रतिनिधींनीची गोकुळला भेट; गोकुळच्या कामकाजाचे कौतुक

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : 
कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) व इन्व्हारमेंटल डिफेन्स फंड अमेरिका (इडीफ) व भारतीय अॅग्रो इंडस्ट्रीज फौंडेशन (बायफ) उरळीकांचन यांच्यावतीने कोल्हापूर जिल्ह्यामध्ये टी.एम.आर. उत्पादनाचा वापर वाढविणे तसेच म्हैस पालनाची सुधारित पद्धत शोधून काढणे व जनावराची प्रजनन क्षमता सुधारणे यासाठी हा संशोधन प्रकल्प राबविला होता या प्रकल्पाची माहिती घेण्यासाठी इडीफ व बायफ याचे प्रतिनिधी यांनी गोकुळ दूध संघास भेट दिली असता गोकुळचे माजी चेअरमन व ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्या हस्ते गोकुळ प्रधान कार्यालय येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.
          
यावेळी इन्व्हारमेंटल डिफेन्स फंड (इडीफ) भारताचे मुख्य सल्लागार डॉ.अभिनव गौरव गोकुळ दूध संघाच्या भेटीदरम्यान संघाच्या कार्यपद्धतीचे व शेतकरी-केंद्रित धोरणांचे मनःपूर्वक कौतुक केले. गेल्या तीन  वर्षांपासून आमच्या संशोधन  प्रकल्पासाठी गोकुळ दूध संघाची निवड केली आहे. गोकुळवर दूध उत्पादकांचा दृढ विश्वास हीच संघाची खरी ताकद आहे. हा विश्वास कायम टिकवण्यासाठी गोकुळ सातत्याने शेतकरीहित काम करावे. गोकुळमध्ये राबवलेल्या प्रकल्पाचे कौतुक करत, दिल्लीतील राष्ट्रीय परिषदेत गोकुळला प्रेझेंटेशनसाठी आमंत्रित केले आहे, ज्यामध्ये गोकुळच्या यशस्वी योजनांचा आंतरराष्ट्रीय पातळीवर सादरीकरण होणार आहे.
         
यावेळी इन्व्हारमेंटल डिफेन्स फंड (इडीफ)  उपाध्यक्ष अँड्र्यू हटसन म्हणाले की, “गोकुळ दूध संघाचे दूध उत्पादकांप्रती असलेले कामकाज अतिशय प्रभावी, पारदर्शक व समाधानकारक आहे.” त्यांनी पुढे सांगितले की आगामी काळात म्हैस दुधाला मोठ्या प्रमाणात जागतिक मागणी वाढणार असून म्हैस दुधास दुग्धव्यवसायामध्ये चांगले भविष्य आहे. गोकुळ दूध संघाने जनावरांच्या उत्पादनक्षमतेत वाढ, आरोग्य सुधारणा व उन्नतीसाठी आणखी वैज्ञानिक दृष्टिकोन ठेवून संशोधनाला चालना देणे अत्यावश्यक असल्याचे सांगितले व (इडीफ) सद्याचा हा संशोधन प्रकल्प पुढे विस्तार करून मोठ्या प्रमाणात म्हैस पालन, उत्पादन वाढीसाठी गोकुळ सोबत राबविले जाईल.
         
यावेळी माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे म्हणाले दुग्ध व्यवसायामध्ये जनावरांचे प्रजनन क्षमता व वंध्यत्व निवारण हे महत्वाचे असून बायफ व इडीफ यांनी राबविलेला हा उपक्रम कौतुकास्पद असून भविष्यात असे वेगवेगळे उपक्रम गोकुळ संघामध्ये राबवावेत असे मनोगत व्यक्त केले. बायफचे प्रतिनिधी सचिन जोशी म्हणाले, गोकुळसोबत काम करणे आमच्यासाठी प्रेरणादायी आहे. भविष्यात अशा प्रकल्पांवर गोकुळसोबत कार्य करण्यास आम्ही उत्सुक आहोत.” त्यांनी गोकुळचे सर्व संचालक, अधिकारी व कार्यकारी मंडळांना प्रशिक्षण बायफ उरळीकांचन येथे कार्यशाळेसाठी विशेष आमंत्रण दिले.
         
 या प्रतिनिधींनी आज पहाटे ५ वाजता पुनाळ, यवलुज, कोपार्डे, सडोली खालसा, बाचणी या गावातील निवडक प्राथमिक दूध संस्थेमधील संकलन प्रक्रिया, जनावराची पाहणी, दूध उत्पादक मिटिंग, वैरण बँक शिंदेवाडी व महालक्ष्मी टी. एम.आर.प्लांट भेट दिली. त्यानंतर गोकुळच्या मुख्य प्रकल्पातील उत्पादन, गुणवत्ता तपासणी व वितरण प्रक्रियेचा प्रत्यक्ष आढावा घेतला तसेच खासकरून पशुसंवर्धन विभागाची सविस्तर माहिती घेतली. यावेळी संघाचे कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले यांनी गोकुळच्या विविध योजनांबाबत तसेच शेतकरी कल्याणासाठी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. यामुळे गोकुळ दूध संघाच्या कार्यपद्धतीला आंतरराष्ट्रीय तसेच राष्ट्रीय पातळीवर मोठे कौतुक मिळाले आहे. यावेळी माजी चेअरमन ज्येष्ठ संचालक अरुण डोंगळे, संचालक किसन चौगले, प्रकाश पाटील, इन्व्हारमेंटल डिफेन्स फंड अमेरिकेचे अँड्र्यू हटसन, जॉन टॉझेल, अॅलिसन ईगल, डेरेक टेपे, बायफचे मुख्य सल्लागार डॉ. अभिनव गौरव, डॉ.सचिन जोशी, डॉ. किशोर नवले, उदय वड्डी, वरुण गांधी, अक्षय जोशी, कार्यकारी संचालक डॉ.योगेश गोडबोले, डेअरी महाव्यवस्थापक अनिल चौधरी, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ.प्रकाश साळुंके, डॉ.दयावर्धन कामत, पशुखाद्य व्यवस्थापक डॉ.व्ही.डी.पाटील, संघाचे अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.
============================

Wednesday, December 10, 2025

सरोळीत पादुका दर्शन सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न, सामाजीक उपक्रमाअतर्गंत दुर्बलघटकातील गरजू महिलांना घरघंटीचे वाटप.

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :    
सरोळी (ता.आजरा) येथे नाणीजधामचे जगदगूरू रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी याच्या पादूका दर्शन सोहळा कार्यक्रम अंतर्गत पादूका आगमन मिरवणूक भक्तीमय वातावरणात पार पडल्या. त्यानंतर भव्य व्यासपीठावर पादूका स्थानापण करून गुरूपूजन सोहळा, उपासक दिक्षा, आरती, प्रवचन व पादूका दर्शन सोहळा भक्तीमय वातावरणात संपन्न झाला. यानंतर महाप्रसादाने सांगता करण्यात आली.

कोल्हापूर जिल्हातील दरवर्षी एका तालुक्यात पादूका दर्शन सोहळा आयोजित केला जातो. या वर्षी आजरा तालुक्याला हा बहूमान मिळाला असून तालूका अध्यक्ष व सरोळीचे माजी सरपंच आकाराम देसाई याच्या सहकार्याने सरोळी येथे पाच हजार भक्ताच्या उपस्थिती प्रवचनाचा लाभ देण्यात आला. प. पू. कानिफनाथ महाराज यांनी कांँन्फरस द्वारे भक्ताशी संवाद साधताना भक्ती आणी सेवा याचा मिलाफ जिवनात सर्वांनी अंगीकार करावा असे आवाहन केले. विभागीय पोलीस अधिकारी रामदास इंगवले यानी भक्ती सोहळा आणी आध्यात्मिक विचाराने मन प्रसन्न झाल्याचे सांगितले. यावेळी दुर्बल घटकांतील गरजू पंधरा महिलांना घरघंटीचे वाटप करण्यात आले. यावेळी जिल्हा बँक संचालक अर्जुन आबिटकर, सुधीर देसाई, गोकुळ संचालिका अंजना रेडेकर, जिल्हा परिषद माजी अध्यक्ष उमेश आपटे, माजी उपसभापती शिरीष देसाई, जिल्हा अध्यक्ष कृष्णा माळी, मधूकर बाबर, सुनिता रेडेकर, आनंदराव कुलकर्णी, वर्षा बागडी, जनार्दन निऊंगरे, सुभाष गावडे, एम. के. देसाई, सुषमा पाटील, प्रज्ञा पाटील, अर्पणा पाटील, प्रणाली पाटील, दिलीप खरूडे याच्यासह कोल्हापूर जिल्ह्यातील भाविकभक्त उपस्थित होते. आभार अमित लाड यांनी मानले.
=======================

मलिग्रे हायस्कूल ऊर्जित आवस्थेत आणणार : मलिग्रे ग्रामसेवा मंडळ मुंबई अध्यक्ष दत्ता मराठे

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : 
आजरा तालुक्यातील पूर्व भागातील मलिग्रे हायस्कूल हे सर्वात पहिले व नामवंत हायस्कूल म्हणून पाहिले जाते. १९७२ साली जुन्या-जाणत्या अशिक्षित मंडळीनी, गावचा विकास डोळ्या समोर ठेऊन मुलाच्या शैक्षणीक प्रगती करीता, महात्मा फुले हायस्कूल महागावच्या शाखेची स्थापना करून गोर गरीब बहूजन समाजाच्या मुलाच्या शिक्षणाची सोय करून दिली. अनंत अडचणीतून शिक्षक व ग्रामस्थांनी या शाळेला योगदान दिले. पण आज या शाळेची दयनीय अवस्था झाली असून, गावच्या एकोप्यातून या हायस्कूल ला पून्हा ऊर्जित आवस्थेत आणणार असलेचे मलिग्रे ग्रामसेवा मंडळ मुंबईचे अध्यक्ष दत्ता मराठे यांनी सांगितले. या ग्रामसभेच्या अध्यक्षस्थानी सरपंच शारदा गुरव होत्या.
         
मराठे यांनी हायस्कूलच्या एकून कामकाजाचा आढावा घेत, मंडळाची स्वतः ची शाळा इमारत व प्रशस्त मैदान असून ही, महागावच्या संस्था चालकांनी या शाखेकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून, मनमानी केल्याने व शिक्षकांची आदलाबदल करून शैक्षणिक धोरणाप्रमाणे सेवा सुविधा नाकारल्याने या हायस्कूलची दुरावस्था झाल्याचा गंभीर आरोप केला. यासाठीच डिसेंबर मध्येच ग्रामसभा घेऊन ग्रामस्थाच्या अडचणी समजावून घेत, संस्था चालकाना चार महीण्याची संधी देत असल्याचे सागितले. यावेळी मुंबई मंडळचे माजी अध्यक्ष व साखर कारखाना संचालक अशोक तर्डेकर यांनी मुंबई मंडळाने गावच्या शाळेच्या अडचणी साठी मंडळा मार्फत शाळा इमारत व इतर सुविधा देण्याचा प्रयत्न केला आहे. यासाठी पून्हा देणगी रूपाने मंडळ व माझी विद्यार्थी मदत करतील पण संस्था चालकानी वेळीच लक्ष द्यावे. तसेच शिक्षणाचा दर्जा कमी झाल्याने ग्रामस्थानी मुले इतर संस्थेकडे पाठवली या मुलाचा सर्वे करून, पालकांनची मानसिकता तयार करून घेऊन, पटसंख्या वाढी साठी व दर्जेदार शिक्षण मिळण्यासाठी संस्था चालकाबरोबर निर्णय होत नसेल तर,पर्यायी मार्ग शोधून गावची शाळा वाचवण्याचा प्रयत्न करावा असे मत व्यक्त केले. माजी सरपंच समिर पारदे यांनी आमची शाळा म्हणून या शाळेकडे पाहीले आहे परंतू २०१६ पासून संस्था अध्यक्ष भेटत नाहीत. त्याना शाखा चालवणे शक्य नसेलतर ग्रामस्थाच्या ताब्यात द्यावी अशी मागणी केली. माजी सरपंच अशोक शिंदे यानी पंचवीस वर्षी पूर्वी शाळा गावच्या ताब्यात असावी यासाठीच प्रयत्न केला होता.

ग्रामसभा अध्यक्ष सरपंच शारदा गुरव यांनी शिक्षण गुणवत्ता पुर्ण असेल तरच गावचा विकास होतो. यासाठी मुंबई मंडळने घेतलेली भुमिका योग्य असून मलिग्रे ग्रामस्थ पाठीशी असलेचे सांगितले. यावेळी संजय घाटगे, सुरेश पारदे, अनिल कागिनकर, शिवाजी भगुत्रे, विजय बुगडे,विश्वास बुगडे, अनिल तर्डेकर,संजय कांबळे यानी मनोगत व्यक्त केली. यावेळी उपसरपंच चाळू केंगारे, शोभा जाधव, सुरेखा तर्डेकर, विठ्ठल नेसरीकर, ऊत्तम भगूत्रे, महादेव तर्डेकर,श्रीपाद देशपांडे, तानाजी भणगे, ऊदय देशपांडे, प्रकाश सावंत, कृष्णा जाधव, रमेश इंगवले याच्यासह मुंबई मंडळाचे पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. आभार अनिल आसबे यांनी मानले.
===========================

आजरा महाविद्यालय आजरा आर्थिक साक्षरता कार्यशाळा संपन्न

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
आजरा महाविद्यालयात ज्युनिअर वाणिज्य मंडळामार्फत आर्थिक साक्षरता या विषयावर कार्यशाळा आयोजित करण्यात आली होती. याप्रसंगी सेबी इंडियाचे संसाधन व्यक्ती आर्थिक ज्येष्ठ गुंतवणूक तज्ञ सल्लागार माननीय हेमंत जांभळीकर यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करताना अन्न वस्त्र निवारा या मूलभूत गरजा पैशांशिवाय पूर्ण करता येत नाहीत. भविष्यातील आपल्या गरजा जाणून पैशाची बचत व गुंतवणूक करणे आवश्यक आहे. गुंतवणुकीचे विविध पर्याय उपलब्ध आहेत. आपल्याला फायदेशीर पर्याय निवडून रकमेची योग्य गुंतवणूक केल्यास आर्थिक संकटांना सामोरे जाता येते. विद्यार्थ्यांनी या सर्व बाबींचा विचार करून सुरक्षित भविष्यासाठी बचत व गुंतवणूक करणे फायदेशीर ठरेल असे मत व्यक्त केले.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय मनोगत करताना महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. अशोक सादळे यांनी पैसा मिळवणे यापेक्षा टिकवणे कठीण आहे. यासाठी पैशाचे नियोजन करणे महत्त्वाचे आहे असे मत व्यक्त केले. कार्यक्रमासाठी आर्थिक गुंतवणूक व सल्लागार म्हणून श्रीमती वैशाली चौगुले या उपस्थित राहुन विद्यार्थ्यांना आर्थिक गुंतवणुकीबाबत बहुमोल मार्गदर्शन केले. तसेच उपप्राचार्य डी. पी. संकपाळ, कार्यालयीन अधीक्षक योगेश पाटील, पर्यवेक्षक मनोजकुमार पाटील, प्रा. विठ्ठल हाके, प्रा. मलिकार्जुन शिंत्रे तसेच सर्व शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे स्वागत व प्रास्ताविक प्रा. अर्चना चव्हाण यांनी केले. पाहुण्यांची ओळख प्रा. शोभा फड यांनी करून दिली  सूत्रसंचालन प्रा.रूपाली पिळणकर यांनी केले. आभार प्रा.वैशाली देसाई यांनी मानले.
======================

Tuesday, December 9, 2025

बाबा आढावांचा चळवळीचा वारसा पुढे घेऊन जाने हीच खरी श्रद्धांजली, आजरा येथील श्रद्धांजली सभेत अनेकांनी व्यक्त केल्या भावना

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
बाबा आढावांच्या जाण्याने पुरोगामी चळवळीची अपरिमित हानी झाली असून त्यांनी घालून दिलेला चळवळीचा वारसा जपणं हीच खरी त्यांना श्रद्धांजली ठरेल असे मत डॉ. नवनाथ शिंदे यांनी आजरा येथे डॉ बाबा आढाव यांना अभिवादन करण्यासाठी आयोजित केलेल्या सभेत व्यक्त केले. यावेळी जेष्ठ नेते जयवंतराव शिंपी, कॉ. संपत देसाई, कॉ. शांताराम पाटील, तानाजी देसाई, प्रा. मीना मंगळूरकर, कॉ. संजय तर्डेकर यांची प्रमुख उपस्थिती होती.
    
बाबांच्या बद्दल कृतज्ञता व्यक्त करताना डॉ. शिंदे पुढे म्हणाले, बाबा म्हणजे एक कष्टकऱ्यांच्या न्यायासाठी समर्पित आयुष्य जगलेले झंझावात होते. अखेरच्या श्वासापर्यंत त्यांनी सत्यशोधक विचार कृतीत आणला. जेष्ठ नेते जयवंतराव शिंपी म्हणाले, माझा प्रत्यक्ष आयुष्यात बाबांशी कधी संपर्क आला नाही, पण त्यांनी वेळोवेळी घेतलेल्या भूमिका, त्यांनी केलेले काम यातून मला बाबा आढाव समजत गेले. आता अशी माणसं राहिली नाहीत ती आपल्यासाठी दिशादर्शक होती. श्रमिक मुक्ती दलाचे कार्याध्यक्ष कॉ. संपत देसाई म्हणाले की बाबा हे समाजवादी असले तरी ते सत्यशोधक होते. आयुष्यभर सत्यशोधक विचार त्यांनी आयुष्याच्या अखेरच्या श्वासापर्यंत जपला. शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई म्हणाले, बाबांनी श्रमिक, कष्टकरी, काच-पत्रा वेचणाऱ्या स्त्रियांसह हमालाना संघटित करून त्यांना न्याय मिळवून दिला. आजही श्रमिकांचे शोषितांचे प्रश्न संपलेले नाहीत. ते घेऊन लढणे हीच खरी त्यांना श्रध्दांजली असेल.
   
कॉ. संजय तर्डेकर म्हणाले, बाबांनी माझ्यासारख्या असंख्य कार्यकर्त्यांच्या जडणघडणीत महत्वाची भूमिका पार पाडली आहे. त्यांचं जाणं आम्हाला पोरकं करणार आहे. कॉ. दशरथ घुरे म्हणाले आज सत्यशोधक विचार कृतीत आणून तसा व्यवहार करण्याची गरज आहे, जे बाबांनी केले. भाकपा (माले)चे जिल्हाध्यक्ष कॉ. शांताराम पाटील आपल्या भावना व्यक्त करताना म्हणाले की बाबांनी सर्वच क्षेत्रात महत्वपूर्ण काम केले आहे. तो वारसा आपण जपुया. सकाळचे पत्रकार रणजित कालेकर म्हणाले की आज सकाळ  वर्तमानपत्राचा जो वैचारिक विकास झाला आहे. त्यामध्ये डॉ. बाबा आढाव यांचा वाटा महत्वाचा राहिला आहे. शिवाजी गुरव, निवृत्ती कांबळे यांनीही आपल्या श्रद्धांजली पर कृतज्ञता व्यक्त केल्या. यावेळी विक्रम देसाई, रवींद्र भाटले, राजू होलम, प्रकाश शेटगे, जोतिबा चाळके, संजय घाटगे, जानबा मिसाळ, पुष्पलता घोळसे, मारुती चव्हाण, नारायण भडांगे, कृष्णा सावंत, सुनील पाटील यांच्यासह विविध संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते.
=========================

‘गोकुळश्री’ स्पर्धेत केर्लीच्‍या विश्वास कदम यांची म्‍हैस प्रथम तर रांगोळीचे युवराज चव्हाण यांची गाय प्रथम...!

कोल्‍हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) च्यावतीने दूध उत्‍पादन वाढीसाठी व उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणेसाठी प्रत्‍येक वर्षी जास्तीत जास्त दूध देणाऱ्या गायी व म्‍हैशी करीता ‘गोकुळ श्री’ स्‍पर्धा घेणेत येते, सन २०२५-२६ मध्‍ये घेण्‍यात आलेल्‍या स्‍पर्धेमध्‍ये एकूण ११४ म्‍हैस व गाय दूध उत्‍पादकांनी उत्‍साहाने भाग घेतल्‍याने स्‍पर्धेत चुरस निर्माण झाली होती. सदरची स्‍पर्धा दिनांक २८/११/२०२५ इ.रोजी घेण्‍यात आली असून, त्‍यामध्‍ये श्री हनुमान सह. दूध व्‍याव. संस्‍था केर्ली ता. करवीर या संस्थेचे म्‍हैस दूध उत्‍पादक श्री. विश्वास यशवंत कदम यांच्‍या जाफराबादी जातीच्या म्‍हैशीने एका दिवसात सकाळ व सांयकाळ पाळीमध्ये एकूण २१ लिटर ९५५ मि.ली. इतके दूध देवून प्रथम क्रमांक मिळवला तर गायीमध्‍ये श्री कृष्ण सह. दूध व्‍याव. संस्‍था रांगोळी ता. हातकणंगले या संस्थेचे गाय दूध उत्‍पादक श्री. युवराज विठ्ठल चव्हाण यांच्‍या एच.एफ जातीच्या गायीने सकाळ व सांयकाळ पाळीमध्ये एकूण ३५ लिटर ८७० मि.ली. दूध देवून प्रथम क्रमांक मिळवला. गोकुळशी संलग्‍न असणा-या सर्व प्राथमिक दूध संस्‍थांच्‍या सभासदांकरीता या स्‍पर्धा प्रतिवर्षी घेण्‍यात येतात. गोकुळ श्री’स्‍पर्धेचा प्रमुख उद्देश दूध उत्‍पादकांना प्रोत्‍साहन देणे, जातिवंत जनावरे खरेदी करणे, जनावरांचे संगोपन सुधारणे, जनावरांमध्‍ये दूध उत्‍पादन वाढवणे याचबरोबर दुग्‍ध व्यवसायामधुन दूध उत्‍पादकांना जास्‍तीत-जास्‍त लाभ करून देणे तसेच तरूण पिढीला या व्‍यवसायकडे आकर्षित करून दूध व्‍यवसाय वाढविणे हा आहे. गोकुळने ही स्‍पर्धा गेल्‍या ३२ वर्षापासून आपल्‍या कार्यक्षेत्रामध्‍ये सुरू केलेली आहे.
          
या स्पर्धा अत्यंत निकोप व व्यवस्थीत पार पाडण्यासाठी गोकुळच्या दूध संकलन विभागामार्फत स्वतंत्र यंत्रणा कार्यरत असते. यासाठी स्थानिक गांव पातळीवरील प्राथमिक दूध संस्थेतील चेअरमन, सचिव, संचालकांचेही सहकार्य घेतले जाते. या स्पर्धेमुळे दूध उत्पादन वाढीबरोबरच गुणवत्तेमध्ये सुधारणा होण्यास मदत झाल्याचे दिसून आले आहे. तसेच या स्पर्धेमध्ये भाग घेणारे सर्व दूध उत्पादक व ज्‍यांनी प्रथम,द्वितीय व तृतीय क्रमांक मिळविलेले दूध उत्‍पादक अभिनंदनास पात्र असून पुढील वर्षी जास्तीत जास्त दूध उत्पादकांनी ‘गोकुळश्री’स्पर्धेत भाग घ्यावा असे आवाहन चेअरमन नविद मुश्रीफ यांनी केले आहे. दूध उत्पादकांचा या स्पर्धेतील वाढता सहभाग पाहता गोकुळच्या कार्यक्षेत्रातील दूध उत्पादक आपल्या जनावरांतील उत्पादन क्षमता वाढीसाठी प्रयत्नशील असल्‍याचे दिसून येते आहे.
================

Monday, December 8, 2025

४२ गावांच्या विकासाचा मार्ग मोकळा होणार : पालकमंत्री प्रकाश आबिटकर, कोल्हापूर प्राधिकरणाला 'विशेष नियोजन प्राधिकरण' दर्जासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क :
कोल्हापूर शहराच्या हद्दीलगत विस्तारत असलेल्या नागरी वसाहतींच्या आणि गावांच्या सुनियोजित विकासासाठी एक अत्यंत महत्त्वाचे पाऊल उचलण्यात आले आहे. कोल्हापूर नागरी क्षेत्र विकास प्राधिकरणास (KUADA) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ च्या कलम ४० अन्वये 'विशेष नियोजन प्राधिकरण' (SPA) हा महत्त्वपूर्ण दर्जा मिळावा, यासाठीचा अधिकृत प्रस्ताव आज, ८ डिसेंबर २०२५ रोजी राज्य शासनाकडे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावामुळे प्राधिकरणाच्या कक्षेतील ४२ गावांमधील विकासाचे प्रश्न मार्गी लागणार असून, कोल्हापूरच्या उपनगरांमध्ये सुनियोजित विकासाचे एक नवीन पर्व सुरू होण्याची चिन्हे आहेत.

या महत्त्वपूर्ण प्रक्रियेला गती मिळण्यामागे लोकप्रतिनिधींचा सातत्यपूर्ण पाठपुरावा कारणीभूत ठरला आहे. करवीर विधानसभेचे आमदार चंद्रदीप नरके यांनी विधानसभेच्या अधिवेशनात नियम १०५ अन्वये लक्षवेधी सूचना क्रमांक ९२३ द्वारे हा मुद्दा प्रकर्षाने उपस्थित केला होता. प्राधिकरणाला सक्षम करण्यासाठी आणि विकासाचा वेग वाढवण्यासाठी 'विशेष नियोजन प्राधिकरण' दर्जा मिळणे काळाची गरज असल्याचे त्यांनी शासनाच्या निदर्शनास आणून दिले होते. या मागणीची दखल घेत कोल्हापूर जिल्ह्याचे पालकमंत्री तथा प्राधिकरणाचे अध्यक्ष प्रकाश आबिटकर यांनी तत्परतेने कार्यवाही केली. त्यांनी २७ ऑक्टोबर २०२५ रोजी झालेल्या प्राधिकरणाच्या सभेत या विषयाला अनुसरून विशेष दर्जा मिळण्याबाबतच्या ठरावास मान्यता दिली होती. त्यानंतर प्रशासकीय पातळीवर वेगाने हालचाली करत, प्राधिकरणाने ५ डिसेंबर २०२५ रोजी याबाबतचा अधिकृत ठराव संमत केला आणि आज हा सविस्तर प्रस्ताव अंतिम मंजुरीसाठी शासनाकडे सुपूर्द करण्यात आला आहे.

हा दर्जा प्राप्त झाल्यास कोल्हापूर आणि लगतच्या गावांसाठी त्याचे दूरगामी फायदे होणार आहेत. या प्रस्तावास शासनाकडून मान्यता मिळाल्यानंतर प्राधिकरणाला स्वतःचा स्वतंत्र विकास आराखडा तयार करण्याचे सर्वाधिकार प्राप्त होतील. यामुळे स्थानिक भौगोलिक परिस्थिती आणि गरजांनुसार नियोजनाची अंमलबजावणी करणे शक्य होईल. सर्वात दिलासादायक बाब म्हणजे, प्राधिकरणाच्या हद्दीतील विविध विकासकामे पूर्ण करण्यासाठी राज्य शासनाकडून थेट निधी उपलब्ध होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. आजवर निधीअभावी रखडलेली रस्ते, पाणीपुरवठा, सांडपाणी निचरा यांसारखी कामे गतीने पूर्ण होतील. परिणामी, प्राधिकरणाच्या क्षेत्रातील ४२ गावे, जी आजवर अनेक मूलभूत नागरी सुविधांपासून वंचित होती, त्यांचा विकासाचा अनुशेष भरून निघेल आणि नागरिकांना दर्जेदार सोयी-सुविधा उपलब्ध होतील असे सार्वजनिक आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्री तथा पालकमंत्री प्रकाश आबिटकर यांनी म्हटले आहे.
==========================

कष्टकरी आणि श्रमिकांचा चेहरा हरपला, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं निधन

मुंबई, न्यूज नेटवर्क :
ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते बाबा आढाव यांचं निधन झालं आहे. बाबा आढव हे कष्टकरी आणि श्रमिकांचे नेते म्हणून ओळखले जाणारे नेते होते. बाबा आढाव गेल्या काही दिवसांपासून आजारी होते. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु होते. पण उपचारादरम्यान त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या निधनमुळे असंघटित कामगारांचा आवाज बुलंद करून त्यांच्या न्याय हक्कांसाठी लढणारा नेता हरपला अशी भावना सर्वसामान्यांमधून व्यक्त होत आहे.

बाबा आढाव यांची प्रकृती खालावल्यानंतर त्यांच्यावर पुण्यातील पुना हॉस्पिटल येथे अतिदक्षता विभागात उपचार सुरू सुरु होते. बाबा आढाव हे 89 वर्षाचे होते. असंघटित कष्टकऱ्यांचे नेते म्हणून बाबा आढाव यांची ओळख देशात होती. फेरीवाले, कचरावेचक आणि हमाल या असंघटित कामगारांच्या हक्कांचे रक्षण करण्यासाठी हमाल पंचायत नावाची संघटना स्थापन केली आणि त्यातूनच गेली अनेक वर्ष बाबा आढाव हे सामाजिक जीवनात कार्यरत होते.
============================

आजरा-पोळगाव रस्त्यावरील अयोग्य ठिकाणी व्हॉल्व्ह बसविण्याचा प्रकार; अन्याय निवारण समितीची तातडीच्या कारवाईची मागणी

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
अमृत जल जीवन पाणीपुरवठा योजनेअंतर्गत आजरा शहरात सुरू असलेल्या पाईपलाइन बसविणे व चाचणीसंदर्भातील कामांमध्ये गंभीर अनियमितता आढळत असल्याची माहिती आजरा रहिवासी अन्याय निवारण समितीने दिली आहे. आजरा–पोळगाव मुख्य रस्त्यावर एकता कॉलनीसमोरील चढाव व तीव्र वळण असलेल्या ठिकाणी व्हॉल्व्ह बसविण्यासाठी करण्यात आलेले खोदकाम हे पूर्णपणे अयोग्य असल्याचे समितीने निवेदनाद्वारे नमूद केले आहे.

समितीने स्पष्ट केले की पेट्रोल पंपानंतरच्या चढावातूनच एकता कॉलनीकडे तीव्र वळण जात असल्याने त्या संवेदनशील ठिकाणी व्हॉल्व्ह बसविणे हे वाहतुकीस गंभीर अडथळा निर्माण करणारे आहे. अशा ठिकाणी केलेले खोदकाम अपघातास आमंत्रण देणारे असल्याने आठ दिवसांच्या आत सुरक्षित पर्यायी जागेची निवड करून तेथे व्हॉल्व्ह बसविण्याची आवश्यकता असल्याचे निर्देश समितीने दिले आहेत. निर्धारित मुदतीत हे काम पूर्ण न झाल्यास वाहतुकीचा धोका टाळण्यासाठी संबंधित खड्डा समितीकडून बुजवण्यात येईल, असा इशाराही देण्यात आला आहे.

दरम्यान, राईस मिल परिसरात दीर्घकाळ सुरू असलेल्या पाण्याच्या गळतीबाबतही समितीने नाराजी व्यक्त केली आहे. अनेकवेळा दुरुस्ती करूनही समस्या कायम असल्याने संबंधित विभागाने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी समितीकडून करण्यात आली आहे. नवीन पाईपलाइन टाकल्यावर व गळती दुरुस्तीच्या कामानंतर शहरातील विविध ठिकाणी उघडे राहिलेल्या खड्ड्यांमुळे वाहतुकीत अडथळे निर्माण होत असून अपघातांचा धोका वाढत आहे. ही कामे तात्काळ पूर्ण करून रस्ते मूळ स्थितीत आणण्याची आवश्यकता समितीने अधोरेखित केली आहे. रवळनाथ कॉलनी व शिव कॉलनी परिसरात सुरू असलेल्या पाणीपुरवठा चाचणीसंदर्भात समितीने सांगितले की, पुरेशा दाबाने आणि अपेक्षित प्रमाणात पाणीपुरवठा होत असल्याची खातरजमा झाल्यानंतरच रस्त्यांची दुरुस्ती किंवा डांबरीकरणाची कामे हाती घ्यावीत. अन्यथा पुन्हा खोदकाम करावे लागण्याची शक्यता असल्याचे समितीचे म्हणणे आहे.

नवीन पाईपलाइन बसविताना रस्त्याच्या मधोमध असणारी चेंबर न बांधल्यामुळे वाहनधारकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. तसेच, दर्गा गल्लीतील पाईपलाइनचे काम पूर्ण झाले असल्याने तेथील गटारीची कामे पूर्ण होईपर्यंत रस्ता डांबरीकरण न करण्याची सूचना समितीने केली आहे. वाणी बोगद्याजवळ नवीन पाण्याची लाईन ही गटारी मध्ये जॉईंट आल्यामुळे सर्व सांडपाणी पिण्याच्या पाण्याच्या पाईप मध्ये जाण्याची शक्यता आहे व साथीचे रोग पसरण्याची ही शक्यता आहे तसेच रस्त्याच्या मधोमध मोठा पडल्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता आहे कृपया याच्याकडेही गांभीर्याने पाहावे. वरील सर्व बाबींवर तात्काळ व गांभीर्याने लक्ष देऊन संबंधित विभागांना आवश्यक त्या सूचनाद्याव्यात, अशी मागणी अन्याय निवारण समितीने नगरपंचायतीकडे केली आहे.
==========================

पेरणोली येथील प्राथमिक शाळेचा शताब्दी महोत्सव साजरा करण्याचा ग्रामस्थांचा निर्णय, गावकरी एकवटले; २४, २५ व २६ जानेवारी २०२६ तीन दिवस होणार कार्यक्रम

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
१९२५ साली सुरू झालेल्या पेरणोली (ता. आजरा) केंद्रशाळेला यावर्षी शंभर पूर्ण होत असून यानिमित्ताने पेरणोली केंद्रशाळेचा शताब्दी महोत्सव लोकोत्सवच्या स्वरूपात साजरा करण्याचा निर्णय ग्रामस्थ व माजी विद्यार्थ्यांच्या बैठकीत घेण्यात आला.दि २४,२५ व २६ जानेवारी तीन दिवस महोत्सव साजरा करण्यात येणार आहे.
    
पेरणोली केंद्रशाळेने गेल्या शंभर वर्षात पेरणोलीसह साळगाव, हरपवडे, कोरिवडे, देवकांडगाव या पंचक्रोशीतील गावातील अनेक विद्यार्थी घडवले. अनेक क्षेत्रात त्यांनी स्वतःचा असा ठसा उमटवला आहे. इंजिनियर, डॉक्टर, वकील, शिक्षक, पत्रकारांसह सामाजिक, राजकीय क्षेत्रातील अनेकांनी शाळेचे नाव उंचावले आहे. शताब्दी वर्षाच्या निमित्ताने या साऱ्याचा धांडोळा घेण्यात येणार आहे. याबरोबरच अनेक सामाजिक, सांस्कृतिक आणि शैक्षणिक उपक्रम राबविण्यात येणार आहेत. येणाऱ्या पाच वर्षांचा रोडमॅप बनवून त्याआधारे शाळेच्या भौतिक आणि शैक्षणिक सुधारणेसाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहेत. यासाठी एक व्यापक समिती बनवली असून वेगवेगळ्या उपसमित्याही बनवल्या आहेत. समन्वयक म्हणून उदय कोडक यांच्यावर जबाबदारी सोपविण्यात आली आहे.
          
बैठकीला उदय पवार, कॉ. संपत देसाई, तानाजी देसाई, पांडुरंग लोंढे, राजेंद्र सावंत, उदय कोडक, मारुती वरेकर, इनांस फर्नांडिस, वंदन जाधव, कृष्णा सावंत, काका देसाई, आदेश गुरव, अविनाश वर्धन, अविनाश जोशीलकर, संतोष येरुडकर, सुरेश कालेकर, संजय मोहिते, पांडुरंग दोरुगडे, सचिन देसाई, संकेत सावंत, दीपक देसाई, विठ्ठल मस्कर, सुभाष देसाई, अमित सावंत, रणजित फगरे, रणजित कालेकर, व्ही. डी. जाधव, अरुण जाधव यांच्यासह ग्रामस्थ व माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते
=============================

वसंतराव देसाई आजरा साखर कारखान्याची 3 हजार 400 रुपये प्रमाणे ऊस बिले जमा

आजरा विकास न्यूज नेटवर्क :
गवसे (ता. आजरा) येथील वसंतराव देसाई आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याचे चालु सन 2025-26 या चालु हंगामात आजअखेर 1 लाख 10 हजार मे. टन ऊसाचे गाळप झाले आहे. कारखान्याकडे दि. 04.11.2025 से 15.11.2025 अखेर गाळप झालेल्या 36 हजार 594 मे. टनाचे ऊसाची बिले प्रतिटन 3 हजार 400 रुपये प्रमाणे विनाकपात होणारी रक्कम 12 कोटी 44 लाख 21 हजार रुपये ऊस पुरवठादार शेतक-यांच्या सेव्हींग खातेवरती जमा करण्यात आली असलेबाबतची माहिती कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव देसाई यांनी दिली.

हंगाम 2025-26 मध्ये करखाना व्यवस्थापनाने ठेवलेल्या उददीष्टा प्रमाणे गाळपाचे नियोजन केले असुन सद्या येत असलेल्या ऊसाचे गाळप करून त्यापासुन जास्तीत जास्त साखर उत्पादन मिळविणेचा प्रयत्न करीत आहोत. कारखान्याकडे उपलब्ध असलेल्या बीड व स्थानिक तोडणी-वाहतुक यंत्रणेस प्राधान्याने कारखान्याकडे करार झालेल्या ऊसाची उचल करणेचे काम सुरू आहे. कोल्हापूर जिल्हा मध्य. सह. बँकेचे अध्यक्ष, वैद्यकिय शिक्षणमंत्री ना. हसन मुश्रीफ यांचे मार्गदर्शनाखाली जिल्हा बँकेच्या सहकार्याने कारखान्याकडे गाळपास येणा-या संपुर्ण ऊसाची बिले व तोडणी वाहतुकीची बिले नियमितपणे आदा केली जाणार आहेत. कार्यक्षेत्रातील संपुर्ण ऊस प्राधान्याने गाळपासाठी आणणेचे नियोजन व्यवस्थापनाने केलेले आहे. ज्या भागात यंत्रणा कमी आहे अशा ठिकाणी यंत्रणा उपलब्ध करून शेतक-यांचे ऊस कारखान्याकडे गळीतास आणुन ऊस उत्पादकांची अडचण होणार नाही याची दक्षता घेत आहोत. त्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊस उत्पादक शेतक-यांनी आपला ऊस अन्य कारखान्यांना न घालता थोडे थांबुन व्यवस्थापनास सहकार्य करावे व आपला संपुर्ण ऊस आपल्याच कारखान्यास गाळपास पाठवावा असे आवाहन कारखान्याचे चेअरमन मुकुंदराव देसाई यांनी केले.

यावेळी कारखान्याचे व्हा. चेअरमन श्री. सुभाष देसाई कारखान्याचे संचालक श्री. वसंतराव धुरे श्री. विष्णु केसरकर, श्री. उदयसिंह पोवार, जिल्हा बँक प्रतिनिधी श्री. सुधिर देसाई, संचालक श्री. मधुकर देसाई, श्री. मारूती घोरपडे, श्री. अनिल फडके, श्री. दिपक देसाई, श्री. रणजित देसाई, श्री. संभाजी पाटील (हात्तीवडे), श्री. शिवाजी नांदवडेकर, श्री. राजेंद्र मुरुकटे, श्री.राजेश जोशीलकर, श्री. गोविंद पाटील, संचालिका सौ. रचना होलम, सौ. मनिषा देसाई, संचालक श्री. काशिनाथ तेली, श्री. संभाजी पाटील, श्री. अशोक तर्डेकर, श्री.हरी कांबळे तसेच कारखान्याचे तज्ञ संचालक श्री. नामदेव नार्वेकर, श्री. रशिद पठाण, शासन नियुक्त प्रतिनिधी श्री. दिगंबर देसाई आणि कार्यकारी संचालक श्री.एस. के. सावंत उपस्थित होते.
==============================

Sunday, December 7, 2025

बुधवार (दि. १०) रोजी रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या सिद्ध पादुकांचा सरोळी येथे कार्यक्रम, स्वयंरोजगारासाठी १६ घरघंट्यांचे मोफत वाटप

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी दक्षिण पीठ नाणीजधाम, रत्नागिरी यांचा बुधवार (दि.१०) रोजी सरोळी (ता. आजरा) येथे सकाळी ९ वाजले पासून पादुका दर्शन सोहळा व सामाजिक उपक्रमासह संपन्न होत आहे. या सोहळ्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

दि. ९ डिसेंबर रोजी जगद्गुरु रामानंदाचार्य नरेंद्राचार्यजी यांच्या दिव्य पादुकांचे सरोळी येथील आकाराम देसाई यांच्या निवासस्थानी मुक्कामी राहणार आहेत. स्वागत पादुका पूजन व भजन सोहळा संपन्न होणार आहे. दिनांक १० डिसेंबर रोजी सकाळी ९ वाजले पासून सरोळी गावातून जगद्गुरूंच्या सिद्ध पादुकांची रथातून भव्य शोभायात्रा निघणार आहे या शोभायात्रे मध्ये विविध पथक असणार आहेत ही शोभायात्रा गावातील प्रमुख  मार्गावरून निघणार आहे १० वाजेपर्यंत शोभायात्रेचे कार्यक्रम स्थळी  प्रस्थान होणार आहे त्यानंतर ११ वाजता ज.न.म. संस्थानाच्या सामाजिक  उपक्रमांतर्गत दुर्बल  घटक पुनर्वसन उपक्रमा अंतर्गत गरीब व गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी१६ घरघंटी चे वाटप प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत होणार आहे. त्यानंतर मान्यवरांचे मनोगत संपन्न होणार आहे.

त्यानंतर पादुका व गुरुपूजन सोहळा आरती सोहळा ज.न.म. प्रवचनकार भूषण गौराताई चौगुले यांचे प्रवचन संपन्न होणार आहे. त्यानंतर रामानंद संप्रदाय मध्ये नविन समाविष्ट होणाऱ्या भक्तगणांना उपासक दीक्षा दिली जाणार आहे. त्यानंतर पादुका दर्शन सोहळा संपन्न होणार. या कार्यक्रमात उपस्थिती राहून आध्यात्मिक शांतीचा अनुभव घ्यावा, असे आवाहन रामानंद संप्रदाय कोल्हापूर जिल्हा सेवा समितीच्या वतीने करण्यात येत आहे. या कार्यक्रमासाठी सुमारे दहा ते पंधरा हजार भाविक भक्तगण उपस्थित राहणार आहेत. तसेच सर्वांना महाप्रसादाची व्यवस्था केली आहे. हा कार्यक्रम संपन्न करण्यासाठी कोल्हापूर जिल्हा सेवा समितीचे आजी माजी पदाधिकारी व आजरा तालुक्यातील पदाधिकारी प्रयत्न करीत आहेत. या कार्यक्रमासाठी भव्य मंडप व्यवस्था करण्यात आली आहे. या कार्यक्रमाची सांगता पुष्पवृष्टीने होणार आहे.
========================

ध्वज दिन निधीला हातभार लावूया..., सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करुया.. !, 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त.......

ध्वज दिन निधीला हातभार लावूया..., सैनिकांप्रती कृतज्ञता व्यक्त करुया.. !, 7 डिसेंबर सशस्त्र सेना ध्वज दिनानिमित्त.......

लेखन : वृषाली मिलिंद पाटील.
सहायक संचालक (माहिती)
विभागीय माहिती कार्यालय
कोल्हापूर


मातृभूमीच्या रक्षणासाठी, देशाच्या सार्वभौमत्वासाठी आणि भारतीयांच्या सुरक्षिततेसाठी रात्रंदिवस सीमेवर तैनात असणाऱ्या आपल्या शूर सैनिकांच्या शौर्य, समर्पण आणि देशसेवेला सलाम करण्याचा दिवस म्हणजे सशस्त्र सेना ध्वज दिन.! केंद्र आणि राज्य शासनाच्या वतीने सैनिक आणि त्यांच्या कुटुंबियांसाठी अनेक योजना राबवल्या जातात. परंतु देशवासीयांनाही सैनिकांप्रती कर्तव्य बजावण्याची संधी मिळावी आणि जनसहभागातूनही सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी थेट निधी देता यावा, यासाठी ध्वज दिन निधी संकलन करण्यात येतो. दरवर्षीप्रमाणे यावर्षीही ७ डिसेंबर रोजी सशस्त्र सेना ध्वज दिन राष्ट्रभक्तीच्या उत्साहात देशभर साजरा केला जात आहे..

ध्वजदिनाची पार्श्वभूमी :
२८ ऑगस्ट १९४९ रोजी देशाच्या तत्कालीन संरक्षण मंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत दरवर्षी ७ डिसेंबर रोजी ध्वजदिन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. या दिवशी नागरिकांना सशस्त्र सेनेचे प्रतिक असलेले छोटे ध्वज वितरित करुन निधी संकलनाची परंपरा सुरु करण्यात आली. १९९३ मध्ये संरक्षण मंत्रालयाच्या मार्गदर्शनाखाली विविध सैनिक कल्याण निधी एकत्र करुन त्याचे एकत्रित नाव "सशस्त्र सेना ध्वज दिन निधी" असे ठेवण्यात आले. तसेच हा निधी सैनिक व त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी वापरण्यात येऊ लागला.

ध्वज दिनाचा उद्देश :
नागरिकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करणे.
सैनिकांच्या त्यागाचे आणि योगदानाचे स्मरण करुन देणे.
शहीद सैनिकांचे कुटुंब, जखमी जवान, माजी सैनिक यांच्या कल्याणासाठी मदत उपलब्ध करणे.
सैनिकांसाठी नागरिकांमध्ये कर्तृत्व, दातृत्व निर्माण करणे.
तसेच राष्ट्रीय एकात्मता आणि सहकाराची भावना वाढीस लावणे, हे ध्वज दिनाचे उद्देश आहेत. हा निधी लोकसहभागातून संकलित केला जातो आणि तो थेट सैनिक व त्यांच्या कुटुंबांच्या कल्याणासाठी वापरला जातो.

ध्वज निधी संकलन कशासाठी :
ध्वज दिन निधीमधून सैनिकांच्या कल्याणासाठी अनेक उपक्रम राबविण्यात येतात. जखमी आणि अपंग सैनिकांवर उपचार, त्यांचे पुनर्वसन, निवृत्त सैनिकांना आरोग्य सुविधा, निवृत्ती वेतन, शहीद सैनिकांच्या कुटुंबीयांना आर्थिक मदत तसेच सैनिकांच्या मुलांच्या शिक्षणासाठी शिष्यवृत्ती असे अनेक उपक्रम सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांचे जीवनमान उंचावण्यासाठी राबवले जातात. घरातला कर्ता पुरुष गेल्यानंतर एखादे कुटुंब उघड्यावर पडू नये, यासाठी शासन आपली जबाबदारी निभवते, परंतु सामाजिक दायित्व म्हणून त्यांच्या पाल्याप्रती सहवेदना व्यक्त व्हावी हा देखील यामागचा उद्देश आहे.

निधीचा वापर :
राज्यात संकलित झालेल्या सशस्त्र सेना ध्वजदिन निधीमधील ६० टक्के निधी राज्याच्या सैनिक कल्याण विभागाच्या मंत्र्यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे निर्धारित धोरणानुसार सेवारत तथा माजी सैनिक व त्यांच्या कुटुंबियांच्या कल्याणासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध योजनांवर खर्च केला जातो. उर्वरित ४० टक्के निधी राज्याचे राज्यपाल यांच्या अध्यक्षतेखालील समितीद्वारे निर्धारित धोरणानुसार सैनिक मुला-मुलींची वसतिगृहे व सैनिक विश्रामगृहे निर्माण करण्यासाठी व चालवण्यासाठी वापरला जातो.

निधी संकलन :
सशस्त्र सेना ध्वज दिन निधी संकलनासाठी सन २०२३ सालासाठी महाराष्ट्र राज्याला ३६ कोटी ६४ लाख रुपये उद्दिष्ट दिले होते, परंतु ४३ कोटी ६८ लाख २ हजार ५४ रुपये म्हणजेच ११९.२१ टक्के निधी संकलित झाला. तर सन २०२४ वर्षासाठी ४० कोटी रुपये उद्दिष्ट देण्यात आले होते, पण नागरिकांच्या उस्फुर्त सहभागामुळे ४८ कोटी ९४ लाख ८१ हजार ३१८ रुपये म्हणजेच १२२.३७ टक्के निधी संकलित झाला आहे. ही आकडेवारी देशवासीयांच्या देशभक्तीची, सैनिकांप्रती असलेल्या आदराची, प्रेमाची, सन्मानाची व अभिमानाची साक्ष असून या निधीच्या माध्यमातून आपणही सैनिक आणि त्यांच्या कुटुंबीयांसाठी थेट योगदान देऊ शकतो.

अनेक व्यक्ती, संस्थांचे योगदान :
सैनिकांप्रती कृतज्ञता म्हणून अनेक स्वयंसेवी संस्था, उद्योग संस्था, संघटना, विद्यार्थी, शिक्षक, शासकीय, खाजगी क्षेत्रातील अधिकारी, कर्मचारी, देशवासीय नागरिक मोठ्या प्रमाणात स्वेच्छेने देणगी देतात. 

निधी जमा करण्यासाठी संपर्क :
संचालक, सैनिक कल्याण विभाग, पुणे यांच्या नावाने
बँक ऑफ महाराष्ट्र, शाखा घोरपडी, पुणे
Name of Account : FLAG DAY FUND (PUBLIC) Bank A/c No. : ६००६१३४७७८४,  IFSC  Code- MAHB0000184, 
MICR Code-411014004 यामध्ये
रोख, धनादेश अथवा CBS द्वारे ध्वज निधी जमा करता येतो.
आपल्या नजीकची शाळा, महाविद्यालय किंवा राज्य शासनाचे कार्यालय, तसेच प्रत्येक जिल्ह्यात जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात निधी देता येतो.
सशस्त्र सेना ध्वजदिन निधीसाठी दिलेली संपूर्ण रक्कम आयकर कायदा १९६१ कलम ८० जी (५) (vi) अन्वये करमुक्त आहे. त्यासाठीचे आयकर सुटीचे प्रमाणपत्र आवश्यतेनुसार संबंधित जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय किंवा सैनिक कल्याण विभाग, पुणे येथून दिले जाते.

संकल्प एक - योगदान हजारोंचे :
तहानभूक विसरुन, कुटुंबापासून दूर.. देशाच्या सीमेवर तैनात असलेले सैनिक हे ऊन, वारा पाऊस, थंडीत मृत्यूच्या छायेत दररोज झुंजतात.. ते केवळ कर्तव्य म्हणून नाही, तर देशसेवेचे व्रत पाळण्यासाठी. देशाच्या संरक्षणासाठी सर्वस्व पणाला लावणाऱ्या सैनिकांच्या आणि त्यांच्या कुटुंबीयांच्या कल्याणासाठी वापरण्यात येणाऱ्या सशस्त्र सेना ध्वज दिन निधीमध्ये अमूल्य योगदान देणे प्रत्येकाचे कर्तव्य आहे. प्राण पणाला लावून देशाचे रक्षण करणाऱ्या सैनिकांप्रती कृतज्ञतेची भावना केवळ शब्दांनी नव्हे तर कृतीतून व्यक्त करण्याची संधी म्हणजे ध्वज दिन. ध्वज दिन निधी संकलनासाठी सन २०२५ सालासाठी ४० कोटी निधी संकलित करण्याचे उद्दिष्ट महाराष्ट्र राज्यासाठी आहे. चला तर मग.. सशस्त्र सेना ध्वज दिना निमित्त आपल्या सैनिकांना सलाम करुया.. ध्वज दिन निधीमध्ये आपला मोलाचा हातभार लावूया..!
===========================

Saturday, December 6, 2025

राजे फाउंडेशनच्या मोफत आरोग्य शिबिरामध्ये ५१८ जणांची तपासणी, मडिलगेतील आरोग्य शिबीरास उत्सफुर्त प्रतिसाद

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
मडिलगे (ता.आजरा) येथे राजे विक्रमसिंह घाटगे  फाउंडेशन व राजे विक्रमसिंह घाटगे बँकेच्यावतीने आयोजित केलेल्या मोफत आरोग्य शिबिरामध्ये ५१८ जणांची तपासणी करण्यात आली. या आरोग्य शिबिरामध्ये हृदयविकार, मूत्रविकार,डोळे तपासणी ,जनरल तपासणी तसेच मोफत रक्त तपासणी करण्यात आली.आरोग्य शिबिरामध्ये रक्तदाब तपासणी, शुगर तपासणी, इसीजी तसेच निशुल्क औषध वाटप केले.याचा लाभ मडिलगे तसेच परिसरातील नागरिकांनी  घेतला. अध्यक्षस्थानी के. व्ही. येसणे होते.

शाहू कारखान्याचे संस्थापक राजे विक्रमसिंह घाटगे यांच्या ७७व्या जयंतीनिमित्त शाहू ग्रुपचे अध्यक्ष राजे समरजितसिंह घाटगे, राजे बँकेचे अध्यक्षा नवोदितादेवी घाटगे यांच्या मार्गदर्शनाखाली राजे फाउंडेशन,राजे बँक व लोकमान्य समुहाच्यावतीने या शिबिराचे आयोजन केले होते. या आरोग्य शिबिरामध्ये सिद्धिविनायक नर्सिंग होम कोल्हापूर , प्राथमिक आरोग्य केंद्र भादवण, मोरया हाॕस्पिटल कोल्हापूर, केदारी रेडेकर हाॕस्पिटल गडहिंग्लज व संकल्पसिद्धी मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल कागल येथील तज्ञ डॉक्टरांनी रुग्णांची तपासणी केली.                               

या कार्यक्रमाच्या उद्घाटन समारंभास शाहू साखर कारखान्याचे उपाध्यक्ष अमरसिंह घोरपडे ,राजे बँकेचे उपाध्यक्ष उमेश सावंत, संचालक रविंद्र घोरपडे, रणजीत पाटील, सुशांत कालेकर, कार्यकारी संचालक अरुण  पाटील, भादवणच्या सरपंच माधुरी गाडे, मडिलगेचे सरपंच बापू नेऊंगरे, माजी सभापती भिकाजी गुरव, आजी माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कृष्णा पाटील, मुख्याध्यापक सावंत, मुख्याध्यापिका माधुरी मोरे, संदीप गुरव, सूर्यकांत पाटील, प्रविण लोकरे, डी. बी. सावंत, मंदार हळवणकर, चंद्रकांत देसाई, सुदाम सावर्डेकर, जालंदर येसणे शाळा समिती अध्यक्ष, मारुती येसणे, हिंदूराव कांबळे उपस्थित होते. लोकमान्य समुहाचे संस्थापक जनार्दन नेऊंगरे यांनी स्वागत केले. विजय परुळेकर यांनी आभार मानले.
=========================

इचलकरंजी पाणी पुरवठा व जीएसटी परतावा प्रश्नी लवकरच कार्यवाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस; छत्रपती संभाजी महाराज ‘श्री शंभू तीर्थ’ पुतळ्याचे अनावरण

इचलकरंजी, विकास न्यूज नेटवर्क : महाराष्ट्राचे मिनी मँचेस्टर म्हणून ओळख असलेल्या आणि औद्योगिक कामगार नगरी असलेल्या इचलकरंजी शहरा...