आजरा साखर कारखाना ३० वर्षांपूर्वीचा आहे. इको सेन्सिटिव्ह झोन त्यानंतर लागला आहे, मात्र याचा फटका कारखान्याला बसला आहे. आजरा कारखाना संचालकांनी सर्वोच्च न्यायालयात दाद मागून सवलत मिळवावी असे आवाहन वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी केले. कारखान्याचा गळीत हंगाम शुभारंभ नाम. मुश्रीफ यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पालकमंत्री प्रकाश आबिटकर होते.
स्वागत व प्रास्ताविक कारखाना अध्यक्ष मुकुंद देसाई यांनी केले. आपला कारखाना केवळ साखर निर्मिती करत चालला आहे.कोणताही उपपदार्थ प्रकल्प नाही.खर्च वाढत असल्याने तोट्याचे गणित आहे.इको झोन काढावे यासाठी सर्व प्रयत्न सुरु आहेत शासनाच्या कर्जावरील व्याज माफ व्हावे व भागभांडवलासाठी दिलेल्या कर्जाला हप्ते पाडून मिळावेत यासाठी प्रस्ताव पाठविला आहे. गेल्यावर्षी २.७५ लाख मे.टन तालुक्यात ऊसाचे उत्पादन झाले मात्र आपल्या कारखान्याला १.८४ लाख मे.टन ऊस गाळपासाठी आला. कारखाना चालण्यासाठी कोणतेही मतभेद न आणता कारखान्याला ऊर्जितावस्था आणण्यासाठी ऊस आपल्या कारखान्याला देवून योगदान द्यावे असे आवाहन केले. मंत्री मुश्रीफ म्हणाले, वर्षातील ३ महिने काम व नंतर ९ महिने कामगारांना पगार द्यावा लागतो. ५ लाख मे.टन गाळप झाल्याशिवाय कारखान्याचे गणित बसत नाही. स्पर्धेमुळे अधिक एफआरपी द्यावी लागते. केवळ साखर निर्मिती करुन फायदा होत नाही.उपपदार्थ प्रकल्प जोडीला हवेत. सोलर,सीएनजी सारखे प्रकल्प आजराने करावे. जिल्हा बॅंक सहकार्य करेल. इको झोन साठी न्यायालयात जावून आपले दुखणे मांडून सवलत मिळवावी. एआय पद्धतीचा अवलंब कारखान्याने करावा. साखरेचे भाव वाढल्यास जनतेतून नाराजी येईल यासाठी केंद्र सरकार एफआरपी वाढवणार नाही.
जिल्ह्यातील सर्व कारखान्यांसाठी जिल्हा बँक सातत्याने पाठिशी राहील. मंत्री आबिटकर म्हणाले, प्रकल्प झाले आहेत. ऊसाचे क्षेत्र वाढविण्यासाठी कारखान्याने प्रयत्न करणे गरजेचे आहे.आजरा तालुका सहकारातील समृद्ध म्हणून जिल्ह्यात पाहिला जातो. राजकारण केवळ निवडणूकीपुरते असावे. कारखान्याला गती देण्यासाठी सर्वांचे सहकार्य करावे असे आवाहन केले. आभार काशिनाथ तेली यांनी मानले. कार्यक्रमास उपाध्यक्ष सुभाष देसाई, जेष्ठ संचालक वसंतराव धुरे, विष्णू केसरकर यांच्यासह सर्व संचालक, संघाचे उपाध्यक्ष डि.ए.पाटील व सर्व संचालक, भाजपाचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर कुंभार, शिरीष देसाई, कार्यकारी संचालक संभाजी सावंत यांच्यासह ऊस उत्पादक शेतकरी, सभासद, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
====================