Monday, August 18, 2025

शक्तिपीठ महामार्ग विरोधासाठी भर पावसात आजऱ्यात शेतकरी रस्त्यावर; कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ न देण्याचा निर्धार

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :
राज्यातील 12 जिल्ह्यातून होणाऱ्या शक्तिपीठ महामार्गाला विरोध दर्शवण्यासाठी आजरा शहरात शेतकरी भर पावसात रस्त्यावर उतरले. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ न देण्याचा निर्धार यावेळी शेतकऱ्यांनी व्यक्त केला. आजरा, गडहिंग्लज, चंदगड, भुदरगड तालुक्यातील शेतकरी सहभागी झालेला मोर्चा आजरा शहरातील शिवतीर्थ ते आजरा तहसील कार्यालया पर्यंत निघाला. माजी खासदार राजू शेट्टी, आमदार सतेज उर्फ बंटी पाटील, विजय देवणे, कॉ. संपत देसाई यांनी मोर्चाचे नेतृत्व केले.

गेल्या चार दिवसापासून आजरा शहरासह तालुक्यात पावसाचा जोर वाढला आहे. या परिस्थितीतही शक्तिपीठ महामार्ग विरोधी कृती समितीने शक्तिपीठ विरोधी मोर्चा यशस्वी केला. आजरा शहरातील शिवतीर्थावरील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून मोर्चाला सुरुवात झाली. शेती कामासाठी वापरण्यात येणार इरले डोक्यावर घेऊन महिलाही सहभागी झाल्या होत्या. एकच जिद्द शक्तिपीठ रद्द, जमीन आमच्या हक्काची नाही कुणाच्या बापाची, भाजप सरकारचा निषेध असो अशा घोषणांनी मोर्चाचा मार्ग दणाणून गेला. छत्रपती संभाजी चौकातून मोर्चा आजरा तहसील कार्यालया जवळ आला. यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.

आमदार सतेज उर्फ बंटी पाटील म्हणाले, यापूर्वीही अनेक प्रकल्प झाले आहेत त्या प्रकल्पांना आम्ही कधीही विरोध केला नाही. मात्र शक्तिपीठ महामार्ग हा ठेकेदारासाठी होत असल्यामुळे याला आमचा विरोध आहे. यापूर्वी देशाच्या स्वातंत्र्याची लढाई झाली, आता शेतीच्या रक्षणासाठी पुन्हा एकदा स्वातंत्र्याची लढाई लढावी लागेल. शेतकऱ्यांनी पैसे मिळण्याचे आमिषाला बळी पडू नये. शेतीमुळे समाजात आपण ताठ मानेने उभे आहोत. गणेशोत्सवानंतर शक्तिपीठ विरोधातील लढा आणखी तीव्र केला जाईल. हजारो एकर शेती उद्योजकांच्या घशात घालण्यासाठी शेतकऱ्यांकडून शेती काढून घेण्याचे षडयंत्र रचले जात आहे. गरज नसलेल्या शक्तीपीठ विरोधात ताकतीने सर्वजण एकसंघ राहू या.

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांनी कष्टाने सिंचनाखाली आणलेल्या जमिनी चोरांना देणार नाही. केवळ जमिनी जाणाऱ्यांना नव्हे तर अनेक शेतकऱ्यांना शक्तीपीठ महामार्गाचा फटका बसणार आहे. या शक्तिपीठाच्या माध्यमातून अनेक प्रश्न निर्माण होणार आहेत. शक्तिपीठामुळे कोल्हापूर शहरासह ग्रामीण भागाला महापुराचा फटका बसणार आहे. शक्तिपीठच्या माध्यमातून इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये उत्खनन करून बॉक्साइड तस्करी करण्याचा डाव आहे. 800 किलोमीटरच्या रस्त्याला 32 हजार कोटीची गरज असताना विनाकारण एक लाख सहा हजार कोटी किंमत दाखवून 70 हजार कोटी वाटून घेण्याचा राज्यकर्त्यांचा डाव आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टसाठी आमचा बळी का? अदानींनी गडचिरोलीत अडीच हजार एकर जंगलात उत्खनन केले आहे, हे खनिज वाहतुकीसाठी शक्तीपीठाचा अट्टा सुरू आहे. देशातील उद्योगपतींचे लाड करण्यासाठी शेतकऱ्यांचा बळी दिला जात आहे. कोणत्याही परिस्थितीत शक्तिपीठ महामार्ग होऊ देणार नाही.

विजय देवणे म्हणाले, शक्तिपीठाच्या समर्थनात सरकारने जमा केलेले सातबारा हे बाधित शेतकऱ्यांचे नाहीत. झोपडपट्टीवर बुलडोजर चालवणारे शेतमजुरांना चिडणारे आणि गोरगरीब यांच्या जमिनी काढून घेणारे हे सरकार आहे. अदानी अंबानीच्या पैशाचा मोह या सरकारला आहे. जिल्ह्याचे नेते मंत्री हसन मुश्रीफ यांनी शक्तिपीठाच्या संदर्भात आपली नेमकी भूमिका स्पष्ट करावी. सर्व कार्यकर्ते व शेतकऱ्यांनी जागी राहून पुढील लढाईला तयार राहावे. कॉ. संपत देसाई म्हणाले, शेतकऱ्यांचा शक्तिपीठाला विरोध आहे. आमदार शिवाजीराव पाटील हे शक्तिपीठ चंदगड तालुक्यात नेऊन शेतकऱ्यांना उध्वस्त करत आहेत. शक्तिपीठ विरोधी आंदोलन चिरडण्याचे काम सुरू आहे. या शक्तीपीठाला बारा जिल्ह्यातून विरोध सुरू आहे. सध्याच्या सरकारचे धोरण शेतकरी विरोधी आहे. शक्तीपीठ रद्द झाल्याशिवाय शेतकरी गप्प बसणार नाही.

कॉ. संजय तर्डेकर म्हणाले, शक्तिपीठ महामार्गामुळे अनेक गावांचे विभाजन होणार आहे. भागाच्या विकासासाठी रेल्वे मार्गांचे जाळे व्हावे. तानाजी देसाई म्हणाले, शेती उध्वस्त झाली तर लोकांनी जगायचे कसे? शक्तिपीठ महामार्गाचे सर्वेक्षण सर्वांनी हाणून पाडावे. राजेंद्र गड्डयान्नावर म्हणाले, मुख्यमंत्री फडणवीस यांच्या ड्रीम प्रोजेक्टचे स्वप्न साऱ्यांनी मिळून धुळीस मिळवूया. राहुल देसाई म्हणाले, आम्ही विकासाच्या आड नाही मात्र शेतकऱ्यांच्या उरावर बसून विकास नको. सुनील शिंत्रे म्हणाले, आम्हाला शक्तिपीठ नको तर कर्जमाफी द्या. यावेळी कॉ. सम्राट मोरे, शिवाजी गुरव, अमर चव्हाण कॉ. अतुल दिघे, संभाजी सरदेसाई यांनी मनोगत व्यक्त केली. यावेळी मुकुंद देसाई, अंजना रेडेकर, प्रकाश पाटील, उमेश आपटे, विद्याधर गुरबे, गोपाळ पाटील, सत्यजित जाधव, दिग्विजय कुराडे, अभिषेक शिंपी, संभाजी पाटील, शामराव देसाई, प्रकाश वास्कर, रियाज शमनजी, प्रभाकर कोरे, रवींद्र भाटले, संजय सावंत, नौशाद बुड्ढेखान, प्रभाकर खांडेकर, सुभाष देसाई, रणजीत देसाई, विक्रम देसाई, अनिल फडके, अल्बर्ट डिसूजा, धनाजी राणे, सचिन घोरपडे, कॉ. संजय घाटगे, राजू होलम, शांताराम पाटील, किरण कांबळे, संकेत सावंत, उत्तम देसाई, आरिफ खेडेकर, निवृत्ती कांबळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झाले होते.
==================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...