Thursday, March 6, 2025

अपुऱ्या पाणी पुरवठ्याच्या निषेधार्थ आजरा शहरवासीयांचा 11 मार्च रोजी आजरा नगरपंचायतीवर महामोर्चा

आजरा, विकास न्यूज नेटवर्क :

आजरा शहर व उपनगराला सध्या अपुरा व अनियमितपणे पाणीपुरवठा होत आहे. याच्या निषेधार्थ आजरा शहरवासीयांच्या वतीने मंगळवार (दि. 11 मार्च) रोजी आजरा नगरपंचायतीवर महामोर्चा काढण्यात येणार आहे. याबाबतचे निवेदन आजरा रहिवासी अन्याय निवारण समिती व शहरातील नागरिकांच्या वतीने आजरा नगरपंचायत प्रशासन व तहसीलदार कार्यालय आजरा यांना देण्यात आले आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, आजरा शहर व उपनगरांना स्वच्छ, मुबलक व नियमित पाणीपुरवठा  व्हावा यासाठी आजरा रहिवाशी अन्याय निवारण समिती व शहरातील नागरिकांच्या वतीने वेळोवेळी नगरपंचायत प्रशासनाला निवेदने देण्यात आली आहेत. 1 जानेवारी व 3 फेब्रुवारी रोजी झालेल्या आंदोलनावेळी शहराचा पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत नगरपंचायत प्रशासनाने लेखी पत्र दिलेले होते. मात्र त्यानुसार नगरपंचायत प्रशासनाने कार्यवाही केलेली नाही. त्यानंतरही 27 फेब्रुवारी रोजी झालेल्या बैठकीत सांगण्यात आले की, ज्या ठिकाणी नवीन पाईपलाईन चे काम पूर्ण झाले आहे त्या ठिकाणी 2 मार्चपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल असे सांगण्यात आले. त्यावर अन्याय निवारणच्या कार्यकर्त्यांनी किमान 4 मार्च पर्यंत तरी पाणीपुरवठा सुरळीत करावे, असे सांगितले. त्यावेळी प्रशासनाच्या वतीने 4 मार्चपासून पाणीपुरवठा सुरळीत करण्यात येईल असे तोंडी आश्वासन देण्यात आले. परंतु अद्यापही आजरा शहर व उपनगरातील पाणीपुरवठा सुरळीत झालेला नाही. यामुळे शहरवासीयांच्यात तीव्र संताप असुन जन आक्रोश उफाळून आला आहे. यामुळे पाणी पुरवठ्या संदर्भात प्रशासनाच्या वेळ काढू धोरणाचा निषेध करण्यासाठी 11 मार्च रोजी महामोर्चा काढण्यात येणार आहे. शहरातील नागरिक व अन्याय निवारण समितीने पाणीपुरवठ्यासंदर्भात दिलेल्या अर्जांना प्रशासनाने केराची टोपली दाखवलेली आहे, याचाही निषेध करण्यात आला आहे. हा महामोर्चा छत्रपती संभाजी चौक ते आजरा नगरपंचायत कार्यालय असा काढण्यात येणार असल्याचेही निवेदनात सांगण्यात आले आहे.

निवेदनावर अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष परशुराम बामणे, कोल्हापूर जिल्हा बँक संचालक सुधीर देसाई, राष्ट्रवादी तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई, शिवसेना शहर प्रमुख विजय थोरवत, माजी सभापती उदयराज पवार, कॉ. संपत देसाई, रवींद्र भाटले, रणजीत देसाई, पांडुरंग सावरतकर, गौरव देशपांडे, जोतिबा आजगेकर, दिनकर जाधव, मिनीन डिसोजा, बडोपंत चव्हाण, वाय. बी. चव्हाण, अमित सामंत, विक्रमसिंह देसाई, रशीद पठाण, मुस्ताफ खेडेकर, संतोष डोंगरे यांच्यासह शहरवासीयांच्या सह्या आहेत.
=====================

No comments:

Post a Comment

आजरा नगरपंचायत सार्वत्रिक निवडणूक उमेदवार निहाय मिळालेले मतदान...

आजरा, विकास न्यूज नेटवर्क : आजरा नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुकीत नगराध्यक्ष पदासाठी सहा तर नगरसेवक पदासाठी 57 उमेदवार रिंगण...