Sunday, October 13, 2024

"सर्फनाला"मुळे आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात हरितक्रांतीचे नवे पर्व सुरू : आमदार प्रकाश आबिटकर; सर्फनाला जल प्रकल्पातील पाण्याचे पूजन संपन्न

"सर्फनाला"मुळे आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात हरितक्रांतीचे नवे पर्व सुरू : आमदार प्रकाश आबिटकर; सर्फनाला जल प्रकल्पातील पाण्याचे पूजन संपन्न
आजरा, वृत्तसेवा :

 आजरा तालुक्याच्या पश्चिम भागातील जनतेचे सर्फनाला प्रकल्प पूर्ण व्हावा हे गेल्या 25 वर्षाचे स्वप्न होते. यावर्षी या प्रकल्पात पाणीसाठा केल्यामुळे जनतेचे हे स्वप्न सत्यात उतरले आहे. या सर्फनाला प्रकल्पामुळे आजरा तालुक्याच्या पश्चिम भागात हरितक्रांतीचे नवे पर्व सुरू होणार आहे, असे प्रतिपादन आजरा भुदरगड राधानगरीचे कार्यसम्राट आमदार प्रकाश आबिटकर यांनी केले. ते आजरा तालुक्यातील पारपोली येथे सर्फनाला जल प्रकल्पात यावर्षी प्रथमच साठा करण्यात आलेल्या पाण्याच्या पूजन प्रसंगी बोलत होते. आमदार प्रकाश आबिटकर यांच्या हस्ते सर्फनाला प्रकल्पातील पाण्याचे  पूजन करण्यात आले. 
 गेली 25 वर्ष रखडलेल्या सर्फनाला प्रकल्पात यंदा प्रथमच करण्यात आलेल्या पाणीसाठ्याचे पूजन कार्यक्रमात प्रकल्पग्रस्त व लाभ क्षेत्रातील वीस गावातील नागरिक मोठ्या उत्साहाने सहभागी झाले होते. सुरुवातीला खेडगे गावातून डोक्यावर मंगल कलश घेऊन महिला मिरवणुकीने प्रकल्प स्थळावर आल्या. यामध्ये लेझीम पथक व वारकरी दिंडी देखील सहभागी झाली होती. जलसंपदा विभाग मध्यम प्रकल्प विभाग क्रमांक दोन कोल्हापूरचे कार्यकारी अभियंता रोहित बांदिवडेकर यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना प्रकल्पाच्या आतापर्यंतच्या कामाचा आढावा घेतला. तसेच ते म्हणाले, या प्रकल्पाची चौथी सुप्रमा प्रस्तावित आहे. गेल्या तीन वर्षात आमदार प्रकाश आबिटकर यांच्यामुळे प्रकल्पाच्या कामकाजाला गती प्राप्त झालेली आहे. अद्यापही जी कामे अपूर्ण आहेत पुढील वर्षापर्यंत ती सर्व कामे शंभर टक्के पूर्ण करण्यात येतील. हा प्रकल्प पूर्ण करण्याचे संपूर्ण श्रेय आमदार प्रकाश आबिटकर यांनाच द्यावे लागेल. आमदार प्रकाश आबिटकर पुढे म्हणाले, प्रकल्पग्रस्तांचे जे काही प्रश्न आहेत ते सर्व सोडवण्याची जबाबदारी आपण घेत आहोत. सर्फनाला प्रकल्प पूर्ण होण्यासाठी साऱ्यांचेच योगदान महत्त्वाचे राहिले आहे. या प्रकल्पामुळे आता हिरण्यकेशी नदी बारमाही वाहू लागणार आहे. यामुळे अडवलेले पाणी शेतापर्यंत जाण्यासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. सर्फनाला, धामणी, नागणवाडी हे रखडलेले प्रकल्प पूर्ण करून पाणी देण्याच्या पुण्याईची काम केले. याचे समाधान मला आयुष्यभरासाठी मिळणार आहे. पाणी पुजण्याच्या निमित्ताने अनेकांच्या आयुष्यात आयुष्यभरासाठी दिवाळी निर्माण झाली आहे. कॉ. संपत देसाई म्हणाले, प्रत्येक प्रकल्पात धरणग्रस्त व लाभधारक शेतकरी यांच्यात नेहमी संघर्ष असतो. मात्र सर्फनाला पाणी पूजनासाठी धरणग्रस्त व लाभधारक एकत्र येऊन पाणी पूजन केले हे कौतुकास्पद आहे. या प्रकल्पाच्या कृतीसाठी प्रशासकीय यंत्राचे काम देखील कौतुकास्पद आहे. आता पाणी प्रत्यक्ष शेतापर्यंत जाण्यासाठी नियोजन करण्याची गरज आहे. रणजीत पाटील म्हणाले, आमदार प्रकाश आबिटकर यांनी केलेल्या प्रचंड विकास कामामुळे आजरा तालुक्यातील जनता 2024 च्या निवडणुकीत ही त्यांच्या पाठीशी ठाम राहणार आहे. यावेळी प्रकाश शेटगे, सुरेश मिटके, अमर ढोकरे, संतोष पाटील, अशोक मालव, प्रकाश कविटकर यांनी मनोगत व्यक्त केले. यावेळी राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष मुकुंद देसाई, भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष सुधीर कुंभार, माजी सभापती उदयराज पवार, स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे तानाजी देसाई, जी.एम. पाटील, राजेंद्र सावंत, साळगाव चे सरपंच धनंजय पाटील, दाभिलचे सरपंच युवराज पाटील, पेरणोलीच्या सरपंच प्रियांका जाधव, भारती डेळेकर, प्रियांका शेटगे, डॉ. संदीप देशपांडे, विजय थोरवत, संतोष भाटले, जितेंद्र भोसले, आनंदा कुंभार, रणजीत सरदेसाई, अश्विन डोंगरे, जलसंपदाच्या उपविभागीय अभियंता स्वाती उरुणकर, दीपक तोलगेकर, विश्वजीत देशमुख, कनिष्ठ अभियंता प्रकाश येसणे, सुशील पाटील, संजय यादव यांच्यासह विविध गावातील संस्थांची पदाधिकारी नागरीक महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते. नंदकुमार निर्मळे यांनी सूत्रसंचालन केले. शिवसेना तालुकाप्रमुख संजय पाटील यांनी आभार मानले.
=======================   
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय 
विकास न्यूज 
सत्याचे प्रतिबिंब......
(संपर्क : 7410168989)
==========================

No comments:

Post a Comment

कोल्हापुरी चप्पल्स बाबत गैरसमज पसरवू नयेत : जिल्हाधिकारी अमोल येडगे

कोल्हापूर, विकास न्यूज नेटवर्क : कोल्हापूर जिल्ह्याच्या लौकिकाचा अविभाज्य भाग असलेल्या कोल्हापुरी चप्पलांविषयी काहीही गैरसमज कि...