जयवंतराव शिंपी गटाचा माजी आमदार के. पी. पाटील यांना पाठिंबा; आजरा येथे मेळावा
आजरा, वृत्तसेवा :
आजरा तालुक्याचे ज्येष्ठ नेते व कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह आगामी विधानसभा निवडणुकीत राधानगरी विधानसभा मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आमदार के. पी. पाटील यांना पाठिंबा जाहीर केला आहे. आजरा येथे शिंपी गटाच्या कार्यकर्त्यांच्या झालेल्या मेळाव्यात हा निर्णय घेण्यात आला आहे. यावेळी बोलताना माजी आमदार के. पी. पाटील म्हणाले, पुरोगामी विचार सुदृढ करण्यासाठी महाराष्ट्राच्या विधानसभेवर महाविकास आघाडीचा झेंडा फडकवूया. माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी म्हणाले, राज्यात महाविकास आघाडीचे सरकार येण्यासाठी माजी आमदार के. पी. पाटील यांना साथ देऊया.
स्वागत व प्रास्ताविक करताना युवा नेते अभिषेक शिंपी म्हणाले, आमच्या राजकीय वाटचालीत जिल्ह्याचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील आमच्या पाठीशी ठाम उभे आहेत. त्यामुळे त्यांचे नेतृत्व मोठे करण्यासाठी आम्ही त्यांनी दिलेल्या निर्णयाशी बांधिल आहोत. माजी आमदार के. पी. पाटील पुढे म्हणाले, राज्यातील महायुतीचा प्रवाह जातीवाचक आहे, ही धर्मांध शक्ती वाढू नये यासाठी राहुल गांधी, शरद पवार, उद्धव ठाकरे प्रयत्न करत आहेत. त्यामुळे साऱ्यांनी त्यांच्या पाठीशी ठामपणे राहण्याची गरज आहे. राज्यात सध्या अनागोंदीचे वातावरण निर्माण झाले आहे, त्यामुळे राज्याच्या भवितव्याचा विचार करून निर्णय घेण्याची गरज आहे. काँग्रेसच्या विचारांचे पाईक म्हणून गेली अनेक वर्ष जयवंतराव शिंपी कार्यरत आहेत. आजरा शहर व तालुक्यात अनेक जाती-धर्माचे लोक एकत्र राहतात. या सर्वांना पुढे घेऊन जाण्याचे काम शिंपी यांनी केले आहे. राजकारणामुळे काही मतमतांतरे निर्माण झाली आहेत पण सारे मतभेद विसरून एक दिलाने पुन्हा काम करूया. कोल्हापूर जिल्ह्याला बंटी पाटलांसारखे डोळस नेतृत्व लाभलेले आहे. भविष्यकाळात अभिषेक शिंपी यांना आजरा तालुक्यात राजकीय बळ देण्यासाठी अग्रेसर राहीन. त्यांच्यावर कोणताही अन्याय होणार नाही याची काळजी घेतली जाईल. सध्याचे विद्यमान आमदार दहा वर्षांपूर्वी आमदार झाले त्यावेळी त्यांच्या नावावर वीस गुंठे जमीन होती. आत्ता त्यांच्या मालकीची शेकडो एकर जमीन आहे. पाटगावच्या धरणामुळे भुदरगड तालुका सुजलाम सुफलाम झाला आहे. मात्र हा प्रकल्प थेट अदानीलाच विकण्याचे षडयंत्र विद्यमान आमदारांनी केले. विद्यमान आमदारांना कोणतेही सामाजिक भान नाही, केवळ टक्केवारी व कमिशन वर पोसलेले हे आमदार आहेत, त्यामुळे अशा आमदाराला थोपवणे ही काळाची गरज आहे.
जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष जयवंतराव शिंपी म्हणाले, आमची भूमिका नेहमी स्पष्टपणे असते. माझ्या कारकिर्दीमध्ये साखर कारखाना सुस्थितीत चालला होता. बिद्री साखर कारखानाही के. पी. पाटलांच्या नेतृत्वात आदर्शवत सुरू आहे. राज्याला पुढे घेऊन जाणारा विचार महाविकास आघाडीकडे आहे. जिल्ह्याचे नेते सतेज उर्फ बंटी पाटील यांची शक्ती के. पी. पाटील यांच्याबरोबर आहे, त्यामुळे के. पी. पाटील यांचा विजय निश्चित आहे. केंद्रात मोदी व राज्यात फडणवीस यांच्या कार्यपद्धतीमुळे राज्य मागे पडले आहे त्यामुळे महा विकास आघाडीचे राज्य येण्यासाठी साऱ्यांनी हातभार लावूया. यावेळी बाबाजी नाईक, विलास पाटील, विश्वास जाधव, किरण कांबळे, विक्रम पटेकर, संकेत सावंत, मुकुंद तानवडे, के. जी. पटेकर, सुधीर जाधव, सचिन शिंपी, अहमदसाब मुराद, मंजूर मुजावर, आसिफ सोनेखान, बशीर इंचनाळकर यांच्यासह आजरा जिल्हा परिषद मतदार संघातील शिंपी यांचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
=========================
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब...
(संपर्क : 7410168989)
==========================