उत्तूरच्या नवजीवन विद्यालयात टीव्ही बंदची शपथ...; पालकांनी केले दोन तास टीव्ही बंद !
उत्तूर वृत्तसेवा :
विद्यार्थ्यांचे अभ्यासाकडे होणारे दुर्लक्ष, वाढता सोशल मिडियाचा वापर, सांयकाळी टीव्ही पाहण्याचे वाढते प्रमाण यामुळे अभ्यासाच्या वेळी मुले अधिक टीव्ही पाहत असल्याचे उत्तूर (ता. आजरा) येथील नवजीवन विद्यालयाच्या शिक्षकांच्या निदर्शनास आले. त्यामुळं शाळा व्यवस्थापन समितीच्या अध्यक्षा सुरेखा परीट यांचे अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सांयकाळी दोन तास टीव्ही बंद हा उपक्रम राबविण्याचा निर्णय घेण्यात आला. याला पालकांनी प्रतिसाद देत दोन तास टीव्ही बंद ठेवले.
यानुसार मुख्याध्यापक रवींद्र येसादे यांच्या मार्गदर्शनाखाली इयत्ता १ ली ते ७ वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना शपथ देऊन सांयकाळी ७.३० ते ९.३० वाजेपर्यंत टीव्ही बंदचा निर्णय घेण्यात आला. दिंगबर कुंभार यांनी विद्यार्थ्यांना शपथ देऊन अधिक टीव्ही पाहण्यामुळे होणारे दुष्परिणाम यांची माहिती दिली. शपथ घेतल्यानंतर विद्यार्थ्यांनी टीव्ही बंद केल्याचा अभिप्राय व फोटो पाठवून उपक्रमाला चांगल प्रतिसाद दिला. यावेळी विमल कुराडे, परशराम चव्हाण यांनी मनोगते व्यक्त केली. स्वागत आशाताई साळवेकर यांनी केले. सुत्रसंचालन मंगल कोरवी यांनी केले. रेश्मा आजगेकर यांनी आभार मानले .
आम्हांला टीव्ही पाहू नाही दिला..., दिग्वीजय पाटील (पालक)
सांयकाळी टीव्ही वरील मालिका पाहण्यासाठी टीव्ही सुरू करण्याचा प्रयत्न केला पण शाळेत शपथ घेतली असल्याने मुलगीने टीव्ही सुरु करू दिला नाही. यामुळे दोन तासात चांगला अभ्यास होऊ शकतो हे समजले .
उपक्रमाचे स्वागतच; टीव्ही केली बंद..., किरण आमनगी (सरपंच उत्तूर)
नवजीवन विद्यालयाने घेतलेला निर्णय स्वागतार्ह आहे. टीव्ही बंद मुळे पालक वर्ग मुलांच्या शिक्षणाकडे अधिक लक्ष देतील. प्रथमतः गावचा नागरिक म्हणून मी प्रथम माझा टीव्ही बंद करून मुलांच्या अभ्यासासाठी वेळ दिला.
----- ----
No comments:
Post a Comment