हरिभाऊ सारखा सर्वसामान्य कार्यकर्ता पोहोचला आजरा साखर कारखान्याच्या सभागृहात....
आजरा वृत्तसेवा :
आजरा शेतकरी सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचा निकाल मंगळवारी जाहीर झाला. या निकालात राष्ट्रवादी प्रणित रवळनाथ शेतकरी विकास आघाडीने बाजी मारत 19 जागा जिंकल्या. या आघाडीच्या अनुसूचित जाती जमाती प्रतिनिधी गटातून पेरणोली तालुका आजरा येथील हरी कुंडलिक कांबळे हे विजयी झाले. या विजयाच्या निमित्ताने तालुक्यातील सर्वसामान्यांचा हरिभाऊ आजरा साखर कारखान्याच्या सभागृहात पोहोचल्याने सर्वसामान्यांमध्ये समाधानाची भावना निर्माण झाली आहे.
न्यायाची चाड आणि अन्यायाची चीड असणारे हरिभाऊ आजरा तालुक्यातील अनेक आंदोलन व मोर्चामध्ये नेहमीच अग्रभागी असतात. अनेकांना न्याय मिळवून देण्यासाठी त्यांची नेहमीच धडपड सुरू असते. आजरा साखर कारखान्याच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत हरिभाऊंची प्रश्नांची सरबती ठरलेली असायची. शेतकऱ्यांच्या प्रश्नावर नेहमीच पोटतिडकीने बोलणं ठरलेला असायचं. कुणाचा पाठिंबा मिळो अथवा न मिळो न्यायासाठी हरिभाऊ यांची एकला चलो रे ची भूमिका ठरलेली असायची. या परिस्थितीत आजरा साखर कारखान्याची निवडणूक जाहीर झाली. यासाठी हरिभाऊ यांनी अर्ज दाखल केला. कोणत्याही परिस्थितीत निवडणूक लढवण्याचा निर्धार त्यांनी केला होता. यातच राष्ट्रवादी काँग्रेसने आपले पॅनल तयार करत हरिभाऊ यांना पॅनल मधून अनुसूचित जाती जमाती गटातून संधी दिली. विरोधात साखर कारखान्याचे विद्यमान संचालक व मातब्बर नेता असतानाही हरिभाऊ कोठेही डगमगले नाहीत. मिळालेल्या संधीचं सोनं करत हरिभाऊ यांनी पक्षाच्या नेत्यांच्या बरोबर पायाला भिंगरी बांधत प्रचार केला. एक सर्वसामान्य कार्यकर्ता निवडणुकीला उभे आहे, त्यामुळे मतदारांनी देखील मताचं भरभरून दान हरिभाऊ यांच्या पारड्यात टाकले. तब्बल 10 हजार 356 मते मिळवत 1 हजार 341 मतांनी मातब्बर उमेदवारांचा पराभव करून हरिभाऊ आजरा साखर कारखान्याच्या सभागृहात पोहोचले आहेत. हरिभाऊ सारख्या सर्वसामान्य कार्यकर्त्याला मिळालेली मते ही राष्ट्रवादीच्या सर्व विजय उमेदवारात सर्वाधिक मते आहेत. हरिभाऊच्या या विजयामुळे सर्वसामान्य लोकांचा लोकशाही वरील विश्वास आणखीनच दृढ झाला आहे. आत्तापर्यंत हरिभाऊ जसे सर्वसामान्यांसाठी कार्यरत होते, तसेच आगामी काळात ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी सुद्धा ते कार्यरत राहतील यात शंका नाही.
---- ----- -----