निपाणी (प्रतिनिधी) :
महाराष्ट्रात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे बेळगाव जिल्हा प्रशासनाच्या सुचनेनुसार निपाणी शहर पोलिसांच्या वतीने रविवारी मध्यरात्रीपासून निपाणी मुरगुड रोडवर नाकाबंदी केली जाणार आहे. ही नाकाबंदी निपाणी मुरगुड रोडवर देवचंद कॉलेज समोर करण्यात येणार असून मुरगूडच्या दिशेने निपाणी शहरात येणाऱ्या वाहनांसह प्रवाशांची तपासणी होणार आहे. ही माहिती निपाणी शहर पोलिस ठाण्याचे उपनिरीक्षक अनिलकुमार कुंभार यांनी दिली. विशेष म्हणजे शनिवारी पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर कोगनोळी टोलनाका येथेही प्रशासनाने नाकामध्ये करून तपासणी सुरू होती. आता त्यापाठोपाठ निपाणी शहराला जोडणाऱ्या दुसऱ्या सीमेवरही कडक बंदी राहणार असल्याने आता निपाणी शहराकडे महाराष्ट्रातून येणारा प्रवेश अडचणीचा ठरला आहे. या मार्गावर असलेल्या तपासणी चौकी अंतर्गत प्रवाशांची आरोग्य तपासणीसह येणार्या वाहनांच्या कागदपत्रांचीही तपासणी होणार आहे. यावेळी वाहनातील प्रवासी वर्गाला सर्दी, ताप, खोकला असल्यास त्या प्रवाशाला निपाणी शहरात कोणत्याही अटीवर प्रवेश दिला जाणार नाही. शिवाय महाराष्ट्रातील वाहन व प्रवासी असल्यास त्या प्रवाशाने किमान ७२ तासांपूर्वी आपली कोरोनाची टेस्ट केल्याचे प्रमाणपत्र दाखवणे अनिवार्य आहे.
बातमी व जाहिरात क्षेत्रातील विश्वसनीय
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब.....