नवी दिल्ली (वृत्तसंस्था) :
दिल्लीविरूद्धच्या सामन्यात धडाकेबाज कामगिरी करत मुंबई इंडियन्सने आयपीएल कारकिर्दीत सहाव्यांदा अंतिम फेरीत प्रवेश केला. इशान किशन (५५*), सूर्यकुमार यादव (५१) आणि हार्दिक पांड्या (३७*) यांच्या फटकेबाजीच्या जोरावर मुंबईने २०० धावांपर्यंत मजल मारली होती. या आव्हानाचा पाठलाग करताना मुंबईच्या गोलंदाजांनी दिल्लीचं कंबरडं मोडलं. जसप्रीत बुमराहने १४ धावांत ४ बळी घेत संघाला ५७ धावांनी विजय मिळवून दिला. ट्रेंट बोल्टनेही ९ धावांत २ बळी टिपत विजयात मोलाचा वाटा उचलला.
नाणेफेक जिंकून दिल्लीने प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतला. कर्णधार रोहित पहिल्याच चेंडूवर पायचीत झाला. डी कॉक-सूर्यकुमार यादव जोडीने चांगली भागीदारी केली. क्विंटन डी कॉक ४० धावांवर झेलबाद झाला. त्याने ५ चौकार आणि १ षटकार लगावला. तर सूर्यकुमार यादव अर्धशतकानंतर लगेचच ५१ धावांवर माघारी परतला. कायरन पोलार्ड (०), कृणाल पांड्या (१३) देखील लवकर बाद झाले. त्यानंतर इशान किशन-हार्दिक पांड्या जोडीने तुफान फटकेबाजी करत मुंबईच्या संघाला मोठी धावसंख्या उभारून दिली. किशनने ३० चेंडूत नाबाद ५५ धावा केल्या. हार्दिकने १४ चेंडूत नाबाद ३७ धावा केल्या.
२०१ धावांच्या विशाल आव्हानाचा पाठलाग करताना पहिल्या षटकातच दिल्लीला दोन धक्के बसले. पृथ्वी शॉ आणि अजिंक्य रहाणे दोघेही शून्यावर माघारी परतले. दमदार फॉर्मात असलेला शिखर धवनही शून्यावर त्रिफळाचीत झाला. त्यामुळे दिल्लीची अवस्था शून्य धावांवर ३ गडी बाद अशी झाली. कर्णधार श्रेयस अय्यर (१२) आणि ऋषभ पंत (३) देखील स्वस्तात तंबूत परतले. त्यानंतर मार्कस स्टॉयनीस आणि अक्षर पटेल जोडीने काही काळ संघर्ष केला. स्टॉयनीसने लढाऊ वृत्ती दाखवत ४६ चेंडूत ६५ धावांची खेळी केली. अक्षर पटेलनेही फलंदाजीत दम दाखवत ४२ धावांची जोरदार खेळी केली. पण अखेर त्यांना ५७ धावांनी पराभव स्वीकारावा लागला.
बातमी व जाहिरात करिता संपर्क
विकास न्यूज
सत्याचे प्रतिबिंब....
9049969625
No comments:
Post a Comment