आजरा (प्रतिनिधी) :
आजरा तालुका भारतीय जनता पार्टीच्या वतीने महावितरणच्या वाढीव वीजबिलाच्या निषेधार्थ संभाजी चौकात वीजबिलांची होळी करण्यात आली. तसेच राज्यातील महाविकास आघाडी सरकारचाही निषेध करण्यात आला. वाढीव वीजबिले माफ करण्याची मागणी यावेळी करण्यात आली. याबाबतचे निवेदन महावितरणचे सहाय्यक अभियंता दयानंद कमतगी यांना निवेदन देण्यात आले.
यावेळी बोलताना तालुकाध्यक्ष सुधीर कुंभार म्हणाले, कोरोनाच्या महामारीतील लॉकडाऊनमुळे शेतकरी, व्यापारी, सामान्य नागरिक संकटात आहेत. यातच अवकाळी पावसाने मोठे नुकसान झाले आहे. अशावेळी महावितरणने वाढीव वीजबिले देऊन सार्यांचीच चेष्टा चालविली आहे. वाढीव वीजबिलाबाबत सर्वांच्या भावना तीव्र आहेत. याचा विचार सरकारने करणे गरजेचे आहे. शेजारील राज्यात कोरोना काळातील वीजबिले कपात केलेली असताना राज्यातील महाविकास आघाडी सरकार मात्र वीजबिलाबाबत मुग गिळून गप्प बसले आहे. यातून त्यांचे सर्वसामान्यावरील बेगडी प्रेम दिसून येते. आर्थिक पिळवणूक झालेली असल्यांमुळे वाढीव वीजबिले पूर्णतः माफ करण्यात यावी असेही कुंभार म्हणाले. आंदोलनात भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष अशोक चराटी, महादेव टोपले, नगरसेवक आनंदा कुंभार, बाळ केसरकर, नाथ देसाई, सचिन इंदूलकर, शैलेश मुळीक, उदयराज चव्हाण, दीपक बल्लाळ, अजित हरेर, राजेंद्र कालेकर, श्रीपती यादव यांच्यासह भाजपचे कार्यकर्ते सहभागी झाले होते.
(फोटो : आजरा येथे वाढीव वीजबिलांची होळी करताना भाजपचे कार्यकर्ते)
No comments:
Post a Comment