वारणानगर (प्रतिनिधी) :
वारणानगर (ता. पन्हाळा) येथील श्री.वारणा महिला उद्योग समूह, वारणा बझार व श्री. तात्यासाहेब कोरे वारणा सह साखर कारखान्याच्या अध्यक्षा श्रीमती शोभाताई विलासराव कोरे (वय ७७) यांचे सोमवार (दि. १२) रोजी पहाटे सोलापूर येथे निधन झाले. श्रीमती शोभाताई कोरे या गेली काही दिवस आजारी होत्या. सोलापूर येथे असणाऱ्या कन्या व जावई यांच्या हॉस्पीटलमध्येच त्यांच्यावर उपचार सुरू होते. वारणा समूहाचे संस्थापक वारणा खो-याचे भाग्यविधाते सहकारमहर्षी तात्यासाहेब कोरे, वारणा साखर कारखान्याच्या अध्यक्षा स्व. श्रीमती सावित्रीआक्का, यांच्या कार्याचा, संस्कारांचा वसा व वारसा समर्थपणे श्रीमती शोभाताई कोरे यानी चालवत सहकार, शिक्षण, महिला सबलीकरण या क्षेत्रात आदर्श कार्य केले. महीला उद्योग व शिक्षण क्षेत्रात सर्वाना मार्गदर्शक ठरलेल्या शोभाताई कोरे या वारणा समूहात आईसाहेब या नावाने सर्वत्र परिचीत होत्या. वारणा बँकेचे चेअरमन निपून कोरे, आमदार विनय कोरे यांच्या त्या मातोश्री होत. श्रीमती शोभाताई कोरे यांच्या निधनाने वारणा समूहासह परिसरावर शोककळा पसरली आहे.